धाडू कुणास मी आर्जव पत्र..
सुट्टीचा आनंद उपभोगणाऱ्या मनाला
आज मात्र तुझी उणीव भासतेय।
तुझ्याशिवाय बालपण अधुरे
याची प्रकर्षाने जाणीव होतेय।
मित्र सवंगडी सारेच दुरावलेत
खोड्या, दंगामस्ती मौन झालीय।
रोजचा अभ्यास आणि गृहपाठ
आता सर्वच जणू गौण झालंय।
ऑनलाईन अभ्यास आहे
पण त्याला वर्गातील गोडी नाही।
नजर चुकवून सहज केलेली
मागच्या बाकावरची खोडी नाही।
वह्या सुद्धा अजून कोऱ्या आहेत
पेन पेन्सिलला विराम लागलाय।
खाकी कव्हराची तर बातच नाही
दप्तर सुद्धा धूळ खात पडलंय।
तसे गणवेशाचे अप्रूप नव्हते कधी
पण तोही कुठे मळत नाही।
अन् त्यावरून मिळणारा प्रसाद
आता आईकडून मिळत नाही।
आता पावसाळाही सुरू झालाय
पण शाळा अजूनही बंद आहे।
कोरोना नावाच्या बागुलबुवामुळे
सुट्टीचा आनंद हिरावला आहे।
कधी बदलणार हे घरकोंडीचे चित्र
कधी सुरू होणार शाळेचे सत्र।
कोण घेईल दखल ही मनाची?
धाडू कुणास मी आर्जव पत्र।
--सुनील पवार..

No comments:
Post a Comment