Friday, 13 June 2014

।। घाव ।।



।। घाव ।।
रक्ताळले फुल कसे..
काट्यांचे डाव होते..
गंधाळल्या सुमनास त्या..
नात्याचे घाव होते..!!

अंधारल्या राती कशा..
चांदण्याचे गाव होते..
चमचमत्या वस्तीस त्या
बदनाम नाव होते..!!

पांढर पेशात कुठे..
सारेच साव होते..
उजळल्या माथ्यात त्या..
वासनेचे लीलाव होते..!!

फुलाच्या माथी का..
बाजारी भाव होते..
खरीदारांच्या दुनयेत का..
तुझेही नाव होते..!!
*चकोर*

Thursday, 12 June 2014

II सावित्री II

II सावित्री II
बांधते गाठ सात जन्माची..
तुझ्या रक्षणार्थ रे सत्यवाना..
अपेक्षित मज नाही काही..
बस जाण मनाची रे भावना..!!

विशाल वट वृक्ष जसा तू..
चालते वाट तुझ्या पावली..
फिरते नित्य तुझ्या भोवती..
जशी सोबती तुझी सावली..!!

साथ आपली जन्म जन्मांतरी..
समजू नको मज अबला नारी..
शक्ती तुझी मी अर्धांगिनी..
कदर जाण रे आता तरी..!!

सोडविले प्राण यम पाशातून..
जगी वंदनीय मी सावित्री..
मातीत माझ्या जन्म तुझा..
मी सावित्री मी धारित्री..!!
*चकोर*

Tuesday, 10 June 2014

।। कोकण पहाट ।।




।। कोकण पहाट ।।

कोकणाची रम्य पहाट..
अविस्मरणीय असा थाट..
सुस्वर मंजुळ तान..
पाखरांचा किलबिलाट..!!

डोंगर माथ्याचा घाट..
खोल नदीची वाट..
वाहे झुळझुळ पाणी..
सुंदर झऱ्याचा खळखळाट..!!

जास्वंद अबोलीची मोट..
नका लावू गालबोट..
खेळे तुळस अंगणात..
सवे मंजुळा भरभराट..!!

पाहण्या सर्व थाट..
घेई भास्कर तो भेट..
झाला चाफ्याचा वर्षाव..
सजली केशर पाऊलवाट..!!
*चकोर*

।। वार ।।



।। वार ।।
फुलांच्या संगतीने काट्यांचे वार होते..
गंधाळल्या जखमेवर लवणाचे खार होते..!!

बोललो ना मी काही शब्द धार धार होते..
मूक माझ्या भावनेला शब्दांचे मार होते..!!

जपले जे अजुनही थोड़े ना फार होते..
नकाराचे गळ्यात मी मिरवले हार होते..!!

परतीच्या मार्गातले बंद झाले दार होते..
मनावर तुझ्या माझ्या बेबनाव भार होते..!!

कोलमडले झाड उरले आता पार होते..
विसावलो जिथे शारीर तिथे गार होते..!!
*चकोर*

।। स्वप्न ।।




।। स्वप्न ।।
स्वप्न होते जे पाहिले..
का अधुरेच राहिले..
फुलांच्या त्या वाटेवर..
मी काट्यांना साहिले..!!

लावून आस जीवास..
का लाविलास ग फास..
सत्य समजलो ज्यास..
तो होता केवळ भास..!!

वचन दिले तू मला..
ना जागली तू त्यास..
भुललो मी मृगजळास..
धरिला ग व्यर्थ ध्यास..!!

राहुदे मज भ्रमात..
रमते जग हे वेड्यात..
पडायचे नाही मज पुन्हा..
बेगडी प्रेमाच्या बेड्यात..!!
*चकोर*

।। आड रस्त्यावर ।।



।। आड रस्त्यावर ।।
नव्हते काही मनात..
अवचित सारे घडले..
मन कोड्यात पडले..
आड़ रस्त्यावर सखीस..
आज पावसाने गाठले..!!

त्रेधा तिरपिट उडाली..
संकोच मना वाटले..
डोळा पाणी दाटले..
आड़ रस्त्यावर सखीस..
आज पावसाने गाठले..!!

धुंद वारा वेडावला..
थेंब थेंब बिलगले..
अंग अंग शहारले..
आड़ रस्त्यावर सखीस..
आज पावसाने गाठले..!!

घेतले पदर आडोसे..
सारेच फोल ठरले..
मन काळजीने घेरले..
आड़ रस्त्यावर सखीस..
आज पावसाने गाठले..!!

लावण्य मुक्त सजले..
भान माझे हरपले..
स्वप्न नयनी वसले..
आड़ रस्त्यावर सखीस..
आज पावसाने गाठले..!!
*चकोर*