Tuesday, 31 March 2015

II नको आरसा हात कंकणास II

II नको आरसा हात कंकणास II
*******************************
किलकिला एक दरवाजा स्पर्धेचा
लोटू पाहती सारेच आत त्याला..
दिसे एक कवडसा जो प्रतिभेचा
पाहण्यास मग जो तो धडपडला..!!

एक कवडसा अंधार बाकीचा
बंधिस्त सारे इवल्या प्रकाशात..
का झापडे ही अशी डोळ्यांना
ना पाहिले कधी उत्तुंग आकाशात..!!
बागड रे जरा तू मुक्त स्वच्छंद
नको होवूस असा विषयात बंधिस्त..
नाही एकच रे तुझा तोच प्रांत
नको बाळगू तू शब्दांची भ्रांत..!!
उधळ मोती तू मुक्त प्रतिभेचे..
दे झुगारून बेगड्या बंधनास..
नजर फिरव तू जरा चहुओर
नको आरसा हात कंकणास..!!
*********सुनिल पवार....

II कैफ II

II कैफ II
**********
होऊ दे मोकळे, कुंतल रेशमाचे जरा..
बिखरू दे बेधुंद, गंध मोगऱ्याचा जरा..!!

खेळू दे मन पाखरास, मुक्त बटेशी जरा..
लाजू दे मुख चंद्रमा, गोड खळीचा जरा..!!

उमलू दे पाकळ्या, पुष्प अधराच्या जरा..
टीपू दे रस मधुर, मुख कमलाचा जरा..!!

मिटू दे पापण्या, मीन लोचनाच्या जरा..
उतरू दे साक्षात, ध्यास स्वप्नांचा ज़रा..!!

निनादू दे झंकार, मधुर कंकणाचा ज़रा..
घुमू दे नादरव, श्वास श्वासांचा ज़रा..!!

तापू दे अग्नीरस, तप्त कर्णात ज़रा..
पेटू दे देह कुंड, उष्ण चेतनांचा ज़रा..!!

लाभू दे उन्माद, कंपित कायेस जरा..
मोहरू दे फुलोरा,कुंद कळीचा जरा..!!

समरसू दे ग देह,बाहू पाशात जरा..
सजू दे चांद राती, कैफ यौवनाचा जरा..!!
****************सुनिल पवार.......

II आरसा आणि मन II

II आरसा आणि मन II
***********************
लोक मला म्हणतात..
माणसाचं मन आरशा सारख असावे..
सुंदर नितळ..
पाहिल्यावर प्रसन्न असे भासावे...!!

बर मानल मी तुमचं..
पण शक्य कसे व्हावे..?
आरसा आणि मन..
एका साच्यात कसे बसवावे..?
आरसा स्थिर..
तर मन अस्थिर..
आरसा दृष्य...
तर मन अदृष्य...
आरसा उथळ..
तर मन खोल..
तुम्ही जस सजवणार..
आरसा तसं दाखवणार..
मग त्याने एखाद्याच
अंतर्मन कसे समजणार...??
कस व्हाव हे शक्य....??
करेल का कोणी भाष्य..??
********सुनिल पवार....

।। एक जग स्वनाचे ।।

।। एक जग स्वनाचे ।।
******************
भावनेने गुंफलेले एक जग स्वप्नांचे
प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते
मनोवांच्छित मनोरे रचता
मन मुक्त भरारी घेत असते...!!

स्वप्नांच्या ह्या आगळ्या विश्वात
स्वप्नवत एक परी असते
वास्तवात असो वा नसों
स्वप्नात अधिक खरी असते..!!
वेडे असते ना हे मन
स्वप्नांना हवा देत असते
पतंग जशी वाऱ्यवरची
हिंदोळ्यावर विहरत असते..!!
तुटते कधी दोर स्वप्नांची
मनाची पतंग नकळत भरकटते
म्हणातात लोक काळ जखम भरते
तरीही..स्वप्न मात्र स्वप्नच ठरते..
स्वप्न मात्र....स्वप्नच ठरते...!!
*******सुनिल पवार.......

Tuesday, 24 March 2015

।। शाप ।।

।। शाप ।।
***********
आपलाच शाप आता
आपणास भोवतोय..
कुऱ्हाडीचा दांडा कसा
गोतास काळ ठरतोय...!!

अनेक खस्ता खाऊन
ज्या बाळास पाळतोय
तोच बाळ आता
माय बापास छळतोय..!!
ज्या नारीच्या पोटी
नर जन्म जो घेतोय..
त्याच नारीचा नराधम
गळा आता घोटतोय..!!
साता जन्माच्या सोबतीची
वचने जो देतोय..
पहिल्या जन्मातच भार्येला
दूर तो लोटतोय..!!
दरबारात देवाच्या जो
हार फुले चढवतोय..
कळ्या कोवळ्या उदरात
तोच आता खुडतोय..!!
असा कसा निर्दयी माणूस
का असा वागतोय..
रुचत नाही रे तुझे वागणे
मी निषेध व्यक्त करतोय..!!
**************सुनिल पवार......

।। बाप माणूस ।।

।। बाप माणूस ।।

बाप माणसाची कथा जरा विचित्र आहे
कथा कमी अन् व्यथाच जास्त आहे..
कुटुंबवत्सल जबाबदार अशी त्याची ख्याती..
वादळवाराही दिसतो त्याच्याच खांद्यावरती..!!

घामाची वस्त्रे स्वतःकडे राखून ठेवणारा तो
कुटुंबास मात्र तलम रेशमी पुरवत असतो..
बाप बिनदिक्कत फटके नेसून फिरत असतो
पण कुटुंब नेटके ठेवण्याकडे त्याचा कल असतो..!!

पाऊल घराबाहेर परंतु लक्ष घराकडे असते
सुरक्षेसाठी केवळ त्याचे नाव मात्र पुरेसे असते
तो असतो तेव्हा नसते भीती कधीच कुणाला
निश्चिंत होते कुटुंब अन् धन्यवाद देते त्याला ..!!

रडला नाही कधीच नाही अश्रु कधी ढाळले
आपल्याच हृदयात त्याने विशाल सागर पाळले..
तोच मेरू, तोच रवी तोच मंथनी स्वतः घुसळतो
कृपेचा सिंधु अतिविशाल रत्ने सुखाची उगळतो..!!

किती संकटे आली त्याने स्वतः लीलया झेलली
परंतु कुटुंबास ना कधी त्यांची झळ लागू दिली
वरून काटेरी पण आतून गोड गरा तो असतो
बाप माणूस फणसाच्या उपमेत चपखल बसतो..!!
--सुनिल पवार..✍️

Tuesday, 17 March 2015

II कहाणी अधुरी II

II कहाणी अधुरी II
****************
राजा बदलतो,राणी बदलते
कहाणी मात्र अधूरीच राहते..
प्रेम बदलले,प्रीत बदलते
रीत मात्र जुनीच राहते..!!

साज बदलतात,स्वप्न बदलतात
अर्ध्या रस्त्यात नकळत हरवतात..
दुःख बदलले,वेदना बदलतात
अश्रु मात्र डोळ्यातून तरळतात..!!

स्थळ बदलते,शहर बदलते
परिस्थिती जैसे तै राहते..
नजर बदलते, दृश्य बदलते
स्मृति पटलावर छबी राहते..!!

मन बदलते,माणसं बदलतात
दूर कुठे जाऊन वसतात..
वेळ बदलते, क्षण बदलतात
आठवणी मात्र मनात बसतात..!!
**************सुनिल पवार....

।। आयुष्य ।।

।। आयुष्य ।।
***********
आयुष्य तेच आहे
कधी बेधुंद..
कधी नेक आहे..!!
आयुष्य नेक आहे
कधी सोज्वळ
कधी फेक आहे..!!
आयुष्य फेक आहे
कधी वळण
कधी मेख आहे..!!
आयुष्य मेख आहे
कधी हस्त
कधी रेख आहे..!!
आयुष्य रेख आहे..
कधी रुक्ष
कधी सुरेख आहे..!!
आयुष्य सुरेख आहे
समजले ना समजले
शिकायचे बरेच आहे..!!
********सुनिल पवार.....

।। टेलिफोन (landline) ।।


।। टेलिफोन (landline) ।।
***********************
मी टेलिफोन (landline)
माझी ऐका कहाणी..
माझ्याच दुर्दशेची आता
गाते मी गाणी..!!

वाणी माझी ऐकण्या कधी
आतुर होते सारे..
कळले नाही मजला कसे
कुठून सुटले वारे..!!

होते जरी कळकट. तरी
तोरा होता भारी..
वजन होते शब्दास माझ्या
प्रत्येकाच्या घरी..!!

ज्याच्या घरी घरोबा माझा
रुबाब त्याचा भारी..
तब्बेत कधी बिघडे माझी
चीडचीड तो करी..!!

दिवस कसे मजेत होते
हवेत जसे चालले..
न जाणे कुठून मधेच
मोबाइल हे आले..!!

नकोशी झाले कोणास मी
जाडी म्हणून हिणवले..
खिश्यात घेऊन मोबाइल मग
ज्याने त्याने मिरवले..!!

आधीच (मो)बाईल त्यात
स्पर्शाने नादावले..
माझ्या नाशिबी आता जीणे
अडगळीचे आले..!!
*******सुनिल पवार..
 

Thursday, 12 March 2015

।। दवबिंदु ।।

||:::: दवबिंदू ::::||
**************
पहाटेचे दव बिंदु,मला नेहमीच प्रेरणा देतात..
जीवनाचे सांर जणू,क्षणात सांगुन जातात..!!
क्षण भंगुरशा आयुष्यात,कसे तेजस्वी चमकतात..
नभीच्या चांदण्या जणू,पृथ्वीवर विसावतात..!!
काही क्षण का होईना,हर्षाचे मोती उधळतात..
छोटेसे जीवन आपले,सफल करून जातात..!!
******सुप्रभात****शुभ सकाळ**********
_______________________सुनिल पवार___

Wednesday, 11 March 2015

II रम्य बालपण II

II रम्य बालपण II
*************
रम्य त्या बालपणात
मन असते माणसात..
स्वच्छंद अशा जीवनात
एका नव्या विश्वासात..!!

नसतो कोणताच स्वार्थ
ना असते कसली भ्रांत..
विशाल जग प्रेमाचे
करते सहज पदक्रांत..!!
नसतात किंतु मनात
मन गुंतते खेळण्यात..
दोन घडिचा रुसवा
विसरे सारे हसण्यात..!!
लाभते सौख्य नित्य
रम्य बालपण पाहण्यात..
ना रस मोठेपणात
पाहतात सर्व पाण्यात..!!
********सुनिल पवार...

Thursday, 5 March 2015

II प्रेमाची साक्ष II

II प्रेमाची साक्ष II
**************
तिचे अन माझे
नाते जरा वेगळे..
तिने मनात ठेवावे
अन मी सांगावे सगळे..!!

तिची निरोपाची भाषा
माझा आग्रह खासा..
तिचा नन्नाचा पाढा
अन माझा दीर्घ उसासा..!!

तिची नाजूक अदा
माझा रांगड़ा बाणा..
तिचा बहाना शहाणा
अन माझा वेडेपणा..!!

तिचा चोरटा कटाक्ष
माझा अंदाज रुक्ष..
तिचे मिठीत विसावणे
देते प्रेमाची साक्ष..!!
********सुनिल पवार.



Wednesday, 4 March 2015

II होळीच्या सणाला II

II होळीच्या सणाला II
============
इतकेच करा मित्रहो,
यंदा होळीच्या सणाला..
आ वासून उभा दुष्काळ
जपा पाण्याच्या थेंबाला..!!

नको पिशव्यांचा मारा
घाला प्लास्टिकला आळा..
नको विरजण आनंदाला
रंग नैसर्गिक उधळा..!!
निसर्गाची कास धरा
शेण्या गोवऱ्याच जाळा..
चुकवा आरिष्टाचा फेरा
-हास जंगलाचा टाळा..!!
करा विचार वेगळा..
निसर्ग नियमावली पाळा..
सुज्ञ आहात तुम्ही सारे
थोपवा दुष्काळी झळा..!!
*********सुनिल पवार....

Monday, 2 March 2015

।। भावनेच्या वेदना ।।

।। भावनेच्या वेदना ।।
*******************
समजू नका कोणी मज कवी
शब्दात भावनेच्या वेदना मांडतो..
ज्याला शब्द भावतात
तो त्यास कविता समजतो..!!

मग मीच मनात हसतो
नकळत विचार करतो..
भावनेच्या ह्या विश्वात..
साला वेदनेचा बाजार भरतो..!!
जितकी वेदना खोल जास्त
जनमनात तोच शब्द बसतो..
वेदनेच्या ह्या भूलभुलय्यात
मग मी ही नकळत फसतो..!!
लिहतो नव्या जोमाने
वेदनेस पुन्हा पुन्हा कुरवाळतो..
आले सुख चालून कधी
मी त्याला सुद्धा टाळतो..!!
सवय झाली आता मला
मी हात वेदनेकडे पसरतो..
शब्दांच्या ह्या माया नगरीत
मी निखळ जगणेच विसरतो..!!
************सुनिल पवार....

II सांग ना II

II सांग ना II
****************
ए सांग ना..
तुझ्या माझ्या नात्याचे नाव तरी काय..??
कधी म्हणते हाय, तर कधी म्हणते बाय..!!
तुझे असे वागणे मला काही पटत नाही..
अन हृदयाच्या धडधडीला, शब्दही फुटत नाही..!!
भेटतेस कधी वाटेवर, खूप काही बोलतेस..
माझ्या प्रश्नाला मात्र, तू अबोल होऊन टाळतेस..!!
कळलंय मला आता, तू माझ्यावर भाळतेस..
दूर निघून जातेस तेव्हा, हळूच मागे वळतेस..!!
संकेत ते मानाचे अबोल, नकळत मजला कळले..
उत्तर मज मिळाले सखे, डोळ्यांनी व्यक्त केले..!!
**********************सुनिल पवार....

।। बेधडक बोल मराठी ।।

।। बेधडक बोल मराठी ।।
=================
आज गातोय गोडवे फार,
फसवीच परी भाषेची वाढ..
रेटणार नाही जिव्हा उद्या,
फुटेल तिज इंग्रजी हाड..!!


श्रद्धाळु आमच्या मनात रुजतो,
अंधश्रद्धेचाच पगडा गाढ़..
नमस्कारास करून बाय बाय,
हाय हेल्लोचचं वाढलयं फ्याड..!!

माय मरो आणि आंटी जगो,
ही वृत्तीच करतेय सारा बिघाड..
घरची भाकर बेचव झाली,
अन बर्गर आता लागतोय ग्वाड..!!

संस्कृती राहिली दिवसापुरती,
आता स्टेटसचे वाढले लाड..
पोकळ झाला मानाचा वाङा,
अन बोनसाय झाले बोलके झाड़..!!

न्यूनगंड जे वाढले मनात,
समूळ सारे उपटून काढ..
बोल प्रथम बेधड़क मराठी,
अभिमानाचे मग झेंडे गाड..!!
*****सुनिल पवार....✍🏽

।। आयुष्यावर बोलू काही ।।

।। आयुष्यावर बोलू काही ।।
*********************
काय असते आयुष्य..?? 
आयुष्यावर बोलू काही..
डोहात तयाच्या उतरून 
भेद भाव खोलू काही..!!

आयुष्य ते कोणाचे 
खुले पुस्तक असते जसे..
तर कोणाचे आयुष्य ते 
मुखवट्यात वसते जसे..!!

आयुष्याच्या पुस्तकात 
क्षणा क्षणाचे असतात धड़े..
आयुष्य वाचणारेही 
असेच काही भासतात वेडे..!!

आयुष्य असते कोणासाठी 
निव्वळ ते उधळणे
कोणासाठी तेच आयुष्य 
असते केवळ जळणे..!!

आयुष्य नटते कोणासाठी 
उज्वल दिव्य प्रकाश..
तर आयुष्यात कोणाच्या 
केवळ तिमिर तोच भकास..!!

बोलू तरी किती आयुष्यावर, 
आयुष्याचे रंग हजार
आयुष्यावर असते 
आपल्या सर्वांचीच मदार..!!

आयुष्य देते कोणास दीक्षा, 
कोणास कधी करते शिक्षा..
नित्य करावा त्याचा अभ्यास, 
आयुष्य जशी एक परीक्षा..!!
***सुनील पवार...

II आठवणीचे चांदणे II

II आठवणीचे चांदणे II
*********************
आठवणीचे चांदणे अंगणी पडले
विखुरले मन अवचित हुळहुळले ..!!
नयनांनी ढगास आभाळात गाठले
गतस्मृतींत अवघे नभमंडळ उधळले ..!!
क्षणाने वेदनेस सहज कवटाळले..
भाळावर होते लालस बिंब उजळले..!!
मनाने मनात मूक संवाद साधले..
स्मृति पटला क्षण सोनेरी तरळले..!!
नियतीने आज समोर तुज धाडले
विस्कटल्या नात्यात मोती ओघळले..!!
***************सुनिल पवार.......

।। आम्ही पुरोगामी ।।

।। आम्ही पुरोगामी ।।
******************
आम्ही पुरोगामी,
आम्हास जातीची बिमारी
श्रद्धा अंधश्रद्धा
खेळे आमच्या दारी...!!
अतिथि देवो भवः
आमची संस्कृती ती न्यारी
ठावुक नसते अहो आम्हास
राहतो कोण शेजारी..!!
मन आमचे तसे संस्कारी
आमच्या परंपरा भारी
सुधारणा करू पाहता
आम्ही उगारतो तलवारी..!!
साधी राहणी उच्च विचारसरणी
आमची बैठक ही विचारी..
मुखात नाम देवाचे
अन वृत्ती व्यभिचारी..!!
मावळे आम्ही शिवबांचे
आमची बुलंद ही ललकारी..
निष्ठा आम्ही वाहतो मात्र
पैश्याच्या दरबारी...!!
फुले आंबेडकरांचे विचार
म्हणतो पोहचवु घरोघरी..
पण पोटात एक अन ओठात एक
वाढवे जातीयतेची दरी..!!
कुठे आहे हो पुरोगामी
कुठे भेटेल तो सांगा तरी..?
लांब कशाला कुणी जाता
शोधून पहा बरं अंतरी..!!
🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽
******सुनिल पवार......

II कविता फक्कड II

II कविता फक्कड II
*******************
तुम्ही लिहली म्हणून घेतली
कविता फक्कड लिहायला..
म्हटलं काय हरकत आहे
प्रयत्न करून पाहायला..!!

भावनाचा करताच पुकारा
लागल्या लगबग जमायला..
गोतावळा तो त्यांचा पाहुन
डोके लागले घुमायला..!!
निवडु तरी कसा कोणाला
मार्ग नाही कळायला..
आवाज दिला प्रथम प्रेमाला
अन लागला तोल ढळायला..!!
मग पुकारले हळूच श्रृंगाराला
ये ग सये तू सजायला..
मढवली तीज अलंकारात
ती लागली मुरडत लाजयला..!!
म्हटलं घ्यावे जवळ वेदनेला
लागला धग तो जाणवायला..
हळवं भारी मन हो तीचं
ती लागली डोळे पाणवायला..!!
मग हास्या म्हणाली गमतीनं
येऊ का मी जवळ बसायला..
दोन मिनिटं ना स्थिर बसलो
ती लागली फिदीफिदी हसायला...!!
मधेच विडंबना उठून केकटली
येऊ का मी पायधुळ झाडायला..
चिमटे काटे भाले घेवून
ती लागली वाभाडेच काढायला..!!
पुरता फसलो धपकन पडलो
लागलो होतो मी रांगायला..
कवितेन घडवल रामायण सांर
हे वेगळ नको आता सांगायला..!!
*****************सुनिल पवार...