Thursday, 29 November 2018

|| ओलावा ||

|| ओलावा ||
========
जेव्हा,
शब्दांचा ओलावा अपेक्षित असतो
तेव्हा,
नेमका कोरडेपणा वाट्यास येतो..
असा,
नेहमीच माझा अपेक्षाभंग होतो
अन्
ओलावा नकळत डोळ्यातुन उतरतो..!!
***सुनिल पवार....✍🏼

|| भरवसा ||

 || भरवसा ||
========
भरवसा हा
मांज्या आणि पतंगासारखा असतो..
जो मांज्या
पतंगाला उंच आकाशी उडवतो
तोच मांज्या
पतंगाच्या पतनास कारणीभूत ठरतो..!!
भरवसा हा
अनोळखी तोडतात तेव्हा
इतक्या वेदना होत नाहीत
जितक्या वेदना ओळखीने होतात..
मांज्याच्या खेचाखेचीत
पतंग मात्र छिन्न विच्छिन्न होतात..!!
***सुनिल पवार...✍🏼

Monday, 26 November 2018

|| प्रश्न ||

|| प्रश्न ||
======
आतासां घडत नाही कुठे
तसा संवाद खरा प्रेमाचा..
जगणेच झालंय व्यवहारी
हा दोष सांगा कोणाचा..??
प्रश्न वेळेचा असतो खरा
मात्र वेळ कोणाकडेच नसतो…
ही अनिच्छा म्हणावी की अनास्था
हा प्रश्न केवळ मनात उरतो..!!
***सुनिल पवार...✍🏼
👇🏽
"वळणावरच्या वाटा ५६", वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/story/FPZUE0SbxqVP…
अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा

Wednesday, 21 November 2018

|| हेच खरे ||

|| हेच खरे ||
========
वाटते नेहमी मनासारखे घडावे
पण तसे घडत नाही हेच खरे..
मानावा लागतो नियतीचा आदेश
झुकवावी लागते मान हेच खरे..!!
तसं कारण असते प्रत्येक कृतीमागे
संकेत असतात जीवनाचे हेच खरे..
सूत्र सारी त्या नियतीच्या हातातली
आपण असतो निमित्तमात्र हेच खरे..!!
असंतुष्टतेचा शाप स्वभावास भोवतो
लाभूनही मन भरत नाही हेच खरे..
मग कशास बरे मन कोसते मनास
सारेच खेळ असतात मनाचे हेच खरे..!!
आहे छबी हृदयात, वावरते ती आसपास
तरी भेटीचा असतो अट्टाहास हेच खरे..
जे लाभले मज क्षण तुझ्या भेटीचे खास
तेच जतन करावे आता मनात हेच खरे..!!
***सुनिल पवार....✍🏼
(आगामी "वळणावरच्या वाटा" मधून)

असे देखणे रूप

निळाईने झाकोळला
अथांग हा सागर..
नजरेला सुखावते
देखणी चंद्रकोर..!!
मोकळ्या केसांतून
धुंद वाऱ्याचा वावर..
गुलाबी ओठांना
मंद हसरी झालर..!!
छोटासा तीळ एक
वसतो हनुवटीवर..
सौम्य भावमुद्रा
अन् सोज्वळ नजर..!!
असे देखणे रूप
लावण्याचा बहर..
प्रसन्नता चेहऱ्यावर
जणू पहाटेचा प्रहर..!!

Friday, 16 November 2018

|| तुझा देव ||

|| तुझा देव ||
=========
तुला निमित्त हवं होतं
ते मी आता तुला दिलंय..
तू खुशाल बांध त्यावर
आपले मनोइच्छित आलंय..!!

तुझ्या काळजीचा गाभारा
केव्हाच साफ करून ठेवलाय..
अन् भरलेला तिमिर सारा
मी काळजात रोखून धरलाय..!!

आता उरकून घे तुझी पाद्यपूजा
स्मृतींची फुले वाहून घे त्यावर..
मी चढवला आहे मातीचा थर
माझ्या धूसर पाऊलखुणांवर..!!

आता वळून पाहू नको मागे
तिथे भिक्षुक दिसेल पायरीवर..
तुझा देव केवळ देवळात आहे
तू लक्ष त्यावर केंद्रित कर..!!
***सुनिल पवार...✍🏼

Monday, 12 November 2018

|| मी तो कृष्ण मुरारी नाही ||

|| मी तो कृष्ण मुरारी नाही ||
=================
तू असशील अवखळ राधा
पण मी तो कृष्ण मुरारी नाही..
तू स्वर कोमल अलगुजाचा
पण माझ्या ओठी बासरी नाही..!!

डोह उरात जरी कालिंदीचा
पण तीरावर ती रंगत नाही..
गोपाळांचा मेळा सभोवताली
पण सुदाम्याशी संगत नाही..!!

स्वप्न तलम मोरपीसी नयनी
पण मोरपीस मस्तकी नाही..
अडीज अक्षरांचे प्रेम वेडे
पण शब्द माझे पुस्तकी नाही..!!

कोण देतो ते दाखले कशाचे
याचे देणेघेणे कोणास नाही..
कोण राधा अन् कोण कृष्ण?
याचे भान आता प्रेमास नाही..!!
***सुनिल पवार...✍🏼

Friday, 9 November 2018

|| दिवाळी ||

|| दिवाळी ||
========
रंग रूपाने काळी
तू अवसेला येते दिवाळी
लोक तुझे स्वागत करतात
तुला पाहायला
लक्ष लक्ष दीप उजळतात..!!

मीही तसेच करतो
तू दिसावी म्हणूनच
असावांच्या तेलात वाती भिजवून
अक्षाचे दीप पेटवण्याचा
मी केविलवाणा प्रयत्न करतो..!!

पण तरीही तू दिसत नाहीस
तुझ्या स्वरूपाचे आराखडे आखत
मी मलाच फसवत असतो
तू येतेस अन् निघूनही जातेस
पण तू येण्याआधी
आणि तू निघून गेल्यावरही
मागे तिमिर तसाच उरलेला असतो..!!
***सुनिल पवार...✍🏼

Monday, 5 November 2018

बांधली गाठ

मी पाहते हळूच उलघडून
अलबम तुझ्या आठवणींचा जुना..
अन् छबी तुझीच मोहक
नजरेत तरळते साजना..!!
मी चोरून भेटते नकळत
आपल्या भेटीच्या गोड क्षणांना..
अन् तूही दिसतोस तिथेच
क्षितीजात नवे रंग भरताना..!!
मी रमते, बागडते, खेळते
स्वप्नांच्या सुमधुर भावविश्वात..
अन् तूही असतोस सोबत तिथेच
भरून श्वासात, तनामनात, रोमरोमात..!!
मी रेखिते चित्र सुरेख वेडे
सुखी संसाराचे, तरल नात्याचे..
अन् तूच खुलवतोस मनाचा कॅनव्हास
घेऊन रूप हळुवार कुंचल्याचे..!!
मी धन्यवाद देते त्या विधात्यास
त्याने रीती ओंजळ भरली सुखाने..
जणू बांधली गाठ जन्मोजन्मीची
क्षणभराच्या अविस्मरणीय भेटीने..!!

दीपावली की शुभकामना ए

**Happy Diwali**
===============
दिलो की मुलाक़ात..
होठोपर मीठी बात..
उजाले की रात..
रिश्तो की सौगात..!!
आपनो का साथ..
ढेर सारा प्यार..
लाया है उपहार
दिवाली का त्यौहार..!!
**सुनिल पवार..✍🏼

|| दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ||

|| दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ||


====================
सजली निशा
आली सोन झळाळी..

चंद्र तारे सजले
पृथ्वीच्या भाळी..

दारावर तोरण
अंगणी सुंदर रांगोळी.
.
लक्ष दीप उजळीत
आली दिवाळी..!!
**सुनिल पवार....✍🏼