Monday, 5 November 2018

बांधली गाठ

मी पाहते हळूच उलघडून
अलबम तुझ्या आठवणींचा जुना..
अन् छबी तुझीच मोहक
नजरेत तरळते साजना..!!
मी चोरून भेटते नकळत
आपल्या भेटीच्या गोड क्षणांना..
अन् तूही दिसतोस तिथेच
क्षितीजात नवे रंग भरताना..!!
मी रमते, बागडते, खेळते
स्वप्नांच्या सुमधुर भावविश्वात..
अन् तूही असतोस सोबत तिथेच
भरून श्वासात, तनामनात, रोमरोमात..!!
मी रेखिते चित्र सुरेख वेडे
सुखी संसाराचे, तरल नात्याचे..
अन् तूच खुलवतोस मनाचा कॅनव्हास
घेऊन रूप हळुवार कुंचल्याचे..!!
मी धन्यवाद देते त्या विधात्यास
त्याने रीती ओंजळ भरली सुखाने..
जणू बांधली गाठ जन्मोजन्मीची
क्षणभराच्या अविस्मरणीय भेटीने..!!

No comments:

Post a Comment