Thursday, 31 August 2017

|| पावसा ||

|| पावसा ||
=======
तू अमर्याद कोसळून गेल्यावर
मी तुझ्यावर कवन लिहायला घेतले..
काल गारठले होते शब्दंशब्द
तू वळताच बघ कसे सहज पेटले..!!

किती गोंजारले होते मी तुला
तू पहिल्यांदा भेटीस आलास जेव्हा..
तू घेतला विराम काही काळ
अन जीव ओलावला होता माझा तेव्हा..!!
आता नव्हती निकड इतकी तुझी
तरी तू बेसुमार कोसळला..
ठाऊक होतेच तू कोसळशील कधीतरी
तरीही तुला झेलण्यास हात कमीच पडला..!!
तू येतोस तुझ्या अश्रूंचा गोतावळा घेऊन
त्यात मी ही जातो चिंब भिजून..
तुझ्या अश्रूत जाते सृष्टी थिजून
अन आठवणींचा कोंब येतो रुजून..!!
कळतंय मला तू शोधत असतोस
तुझा विसर्ग
पण आम्हीच असतो स्वार्थात दंग..
कळला ना कधीच आम्हास निसर्ग
मग अटळ आहेच ना एखादा बाका प्रसंग..!!
***सुनिल पवार...✍🏼😊

Tuesday, 29 August 2017

|| कधीतरी ||

|| कधीतरी ||
=========
कोसळणाऱ्याला
थोपवण्याचं कसब
जमायला हवे
कधीतरी..
न जमले तर
कोसळणाराच बनून
पाहायला हवे
कधीतरी..!!
***सुनिल पवार...✍🏼😊
🌸सुप्रभात🌺शुभ सकाळ🌸

Sunday, 27 August 2017

|| प्रश्नचिन्ह ||

|| प्रश्नचिन्ह ||
=========
जागो जागी डोकावतोय
प्रश्नचिन्ह..
अन
उत्तरे मात्र त्याची
मिळतात भिन्न..
का होतंय असं प्रत्येक वेळी
कळेना
पण
मन मात्र होतंय छिन्नविछिन्न..!!

आता खोडावा वाटतो
हा नाहक प्रश्नचिन्हांचा भडिमार
अन डकवावा म्हणतो त्यावर
नवा पूर्णविराम..
पण मी खोडतो
कोणी दुसराच चिकटवतो पुन्हा
आणि
क्षणाचाच ठरतोय विराम..!!
विचारांच्या मापातही
आता
डोकावू लागलंय खंडीभर पाप..
कळेना
कोणता बसवावा चाप..?
आव किलोचा
अन भाव केवळ ग्राम..
सांगा
कुणाचा अन कोणता..?
मी पुजावा आता शाळीग्राम..!!
***सुनिल पवार...✍🏼

Saturday, 26 August 2017

|| असे हे थेंब ||

*हायकू*
*=====*
|| असे हे थेंब ||
==========
असे हे थेंब
झर झर झरले..
दुःख हरले..!!१!!

दुःख हरले
जल हे ओसरले
जलद झाले..!!२!!
जलद झाले
पुनश्च पाझरले
थेंब झेलले..!!३!!
थेंब झेलले
मन दरवळले
सुमन झाले..!!४!!
सुमन झाले
वाऱ्याने झुलवले
मोद भरले..!!५!!
*सुनिल पवार*..✍🏼😊

Friday, 25 August 2017

|| भाव भुकेला ||

|| भाव भुकेला ||
===========
तो असतो
माझ्या मन मंदिरात
तरी मी
शोधत फिरतो मंडपात..
इथला राजा, तिथला राजा
कार्यकर्त्यांची मजा
अन हतबल प्रजा
कारण
तो नसतो कधीच त्यांच्यात..!!

मी
बसवतो त्यास घरात
आणि
मागतो त्याकडे वरदान
पण तो
काहीच देत नाही..
डेसीबलच्या गदारोळात
बहुतेक
त्याला ऐकूच येत नाही..!!
मी
बक्कळ करतो रोषणाई
आणि
भव्य दिव्य आरास
जिकडे तिकडे लखलखाट
मोदक लाडूचा घमघमाट
सगळाच श्रीमंती थाट..
पण
तो भूलत नाही कशास
त्यास सारेच असते ज्ञात
बेगडी भाव, केवळ बडेजाव
भक्तीचा भुकेला तो
मग कसा रमेल लाडू मोदकात,
आणि
कसा रमेल तो बेगडी बनावटी उत्सवात..??
***सुनिल पवार...✍🏼

|| क्षण काळजातला ||

|| क्षण काळजातला ||
=============
जेव्हा
काळजात
गोठून गेलेला क्षण
कधी
डोकावणाऱ्या
कवडशाने विरघळतो..
तेव्हा
मी माझा न राहतो
नकळत
वाहत जातो..!!
**$p..✍🏼😊


Monday, 21 August 2017

|| वक्त ||

|| वक्त ||
======
पास बैठे थे हम
और
वक्त गुजरता गया..
मगर
ठहर जाए जो वक्त
वह लम्हा
अब तक ना आया..
वक्त यू ही
गुजरता गया..
पास बैठे थे हम
और
वक्त गुजरता गया..!!
***S p...✍🏼😊

|| नक्षत्रांचे देणे ||

|| नक्षत्रांचे देणे ||
===========
पावसाने तिला
मनमुराद भिजवावे..
अन
मी तिला
कौतुके न्याहळावे..!!


वाऱ्याच्या
अलगुजी स्वरांवर
तिने
मनमुक्त थिरकावे..
टपटपणाऱ्या थेंबाचे
संगीत
सुरेल व्हावे..!!

हे
नक्षत्रांचे देणे
मी
ओंजळीत घ्यावे..
तरु वल्लीच्या
मिलनाने
मग
पावसाळे धुंद व्हावे..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| नियमावली ||

|| नियमावली ||
==========
या दुनयेची
नियमावली
जी बंदिस्त करते
माझ्या मनास..
मी सांगावे
तरी कोणास..
किती करावे
ते प्रयास..
एक मनाचा
हा ध्यास..
बनून राहतो
केवळ आभास..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| गे बाय ||

|| गे बाय ||
=======
कशात काय
अन फाटक्यात पाय..
लक्ष नको देऊ
तू खेळ गे बाय..!!


फॅशन झालीय हल्ली
कोट आणि टाय..
वरलिया रंगास अशी
भुलू नको गे बाय..!!

मौनातील शब्द
तसा निर्बुद्ध नाय..
वाचाळ त्यांची बुद्धी
जरा वाचून घे बाय..!!

फुकटची मिळते ग
उधळलेली राय..
तू उगाच त्यात
फसू नको गे बाय..!!

उखळलेल्या दुधास बघ
हळूच धरेल साय..
लागता मुखास मग
अमृत ठरेल गे बाय..!!
***सुनिल पवार...✍🏼😊

हायकू पावसाचे

हायकू पावसाचे.. 

मेघांची दाटी
आसमंतात झाली
चिंता ललाटी..!!

अल्लड वारा
बेधुंद निलाजरा
उडे निवारा..!!
मोहक दिसे
सौदामिनीचा लोळ
झाले कोळसे..!!
पाऊस वेडा
भिजवून चालला
नयन कडा..!!
साचले पाणी
जलाशय भोवती
कोरडी वाणी..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| ही दुनिया ||

|| ही दुनिया ||
========
ही दुनिया रंगबिरंगी
छंदी फंदी
स्वच्छंदी आनंदी
कुठे
ओसंडून वाहणारी
तर कुठे
आलेली मंदी..!!

ही दुनिया झुललेली
फुललेली
गर्दीने गजबजलेली
कुठे
गंधित दरवळलेली
तर कुठे
घामेजलेली
हतबल कोमेजलेली..!!
ही दुनिया अर्थाने भारलेली
तारलेली
दिलाशाने मारलेली
कुठे
पोटं भरलेली
तर कुठे
खपाटीस गेलेली
भूक मेलेली..!!
ही दुनिया एक वसाहत
माणसांची
रेंगणाऱ्या किड्यांची
कधी
धडपड जगण्याची
तर कधी
केवळ
वाट पाहणे मरणाची..!!
**$p..✍🏼

|| मर्म ||

|| मर्म ||
=====
मी नाही
"जात"
म्हणून
मी गेलो नाही
मोर्च्यांत..
फुललेल्या ह्या गर्दीत
मी
"माणूस" शोधतोय
माणसात..!!

मला नाही
"धर्म"
तरी मी
चुकवत नाही
कर्म..
माणसातल्या माणसाचे
मी
जाणू इच्छितो
मर्म..!!
***$p..✍🏼

Tuesday, 15 August 2017

II पहाटेचा आल्हाद II

🌸 सुप्रभात 🌸
=========
पहाटेचा आल्हाद
त्यात
मोत्यांची बरसात..
देखोनी,
हरपते मन
अन
हरपते भान..
ओले रस्ते
त्यांची
वळणदार कमान..
हिरवे सुंदर
नटलेले रान..
जणू
निसर्गाने थाटले..
रंगाचे दूकान..!!
*चकोर* ✍🏼

|| उजेड ||

|| उजेड ||
======
मी नाही म्हणत उगाच
कोणाचं काही चुकतंय..
आपलंच नशीब म्हणायचं
जे जागोजागी हुकतंय..!!


तसं राहायच नसतं म्हणा
अवलंबून अती नशिबावर..
मात करतो तो दिवस
रात्रीच्या गडद अंधारावर..!!

दोष त्या रात्रीचाही नसतो
की जी अंधार पांघरून येते..
मिटलेल्या डोळ्यांचे नेहमीच
उजेडाकडे दुर्लक्ष होते..!!

तसं दिसत नाही म्हणा
त्या कुट्ट काळ्या अंधारात..
पण डोकावले पाहिजे कधीतरी
आपल्या मनाच्या गाभाऱ्यात..!!

आशंका ही आपलीच असते
जी नित्य मनास छळत राहते..
अंधाराच्या या साम्राज्यात मग
काजव्यांचे सहज फावते..!!

कधीतरी मिटेल म्हणा
ह्या टीमटीमणाऱ्या काजव्यांचे साम्राज्य..
पण अंगिकारायला हवा उजेड
अन करायला हवा हा अंधार त्याज्य..!!
***सुनिल पवार....✍🏼

|| गजरा ||

|| गजरा ||
======
निशेच्या अंगणात
चंद्र
आला खेळायला..
अन
लुकलूकत्या चांदण्या
लागल्या
उगाच भाव खायला..!!

रातरणीने घेतला
धुंद
प्रहर सजवायला..
पण
माळलेल्या गजऱ्याची
नाही सर
मुळीच कशाला..!!
***सुनिल पवार...✍🏼😜

|| वाटप ||

| वाटप ||
=======
न जाणे
किती तपांचा अनुभव तुझ्या गाठीशी
पण तुला अजूनही कळत नाही
कुणाला किती थेंब वाटायचे..?
गरजवंताची तहान भागवायची
की जो मर्जीतला भेटला त्यावर लुटत सुटायचे..??
काही ठिकाणी तर तुझे दान झेलायला,
लोकांचे हात अपुरे पडतात
पण तुझे वाटप काही थांबत नाही..
अन मग विध्वंस होतो सत्कार्याचा
पण त्याचं सोयरंसुतक तुला वाटत नाही..!!
काही ठिकाणी तर
पसरलेले हात तशाच अवस्थेत राहतात
पण त्यांच्याकडे तुझं लक्षच नसते..
तू शिंतडल्यासारखे करतो केवळ
अन धार मात्र त्यांच्या डोळ्यास लागते..!!
कुणा मुखी लोणी
तर कुणाच्या नशिबी अंधार
असाच दिसतो तुझा बारभाई कारभार..
न जाणे तुझ्या राज्यात अशी
कोणाची निवडून आलीय सरकार..??
तुझ्या या विसंगत शिडकाव्याने सांग
मनाची होरपळ कशी शमणार..?
हतबलता आमची विसंबून राहण्याची
आणखी वेगळे दिवस तरी काय दाखवणार..??
--सुनिल पवार..✍
No photo description available.
लईभारी सखी, भारत जगताप and 13 others
8 Comments
96 Shares
Like
Comment
Share

|| भावाचा भाव ||

|| भावाचा भाव ||
===========
रक्षाबंधन दिनी
त्याने बांधून घेतली राखी
आपल्या बहिणीकडून..
दिली ओवाळणी वचनाची
अन् तो निघाला घरातून..!!
चार पावलं
चालतो न चालतो तोच
शेजारची कन्या सामोरी आली
तिच्या हातात
तशीच एक सुंदर राखी होती
तिने आशेने पाहिले त्याच्याकडे..
अन् त्यानेही पाहिले तिच्याकडे
तसेच तिच्या हातातील राखीकडे..!!
क्षणाचा खेळ होता सारा
बदलले क्षणात क्षणिक चित्र
आणि बदलला भावाचा भाव
बदलला त्याचा अविर्भाव
त्याने झटकन वळवली मान
जणू पहिलेच नाही तिला
अन् तो तसाच निघूनही गेला..!!
--सुनिल पवार..✍️
Image may contain: text that says 'भावाचा भाव|। रक्षाबंधन दिनी त्यानेबांधून घेतली राखी आपल्या बहिणीकडून.. दिली ओवाळणी वचनाची अन् निघाला घरातून..!! चार पावलं चालतो चालतो तोच शेजारची कन्या सामोरी आली तिच्या हातात तशीच सुंदर राखी होती भाव।। तिने आशेने पाहिले त्याच्याकडे.. अन् त्यानेही पाहिले तिच्याकडे |।भावाचा तसेच तिच्या हातातील राखीकडे. .!! क्षणाचा खेळ होता सारा बदलले क्षणात क्षणिक चित्र आणि बदलला भावाचा भाव बदलला त्याचा अविर्भाव त्याने झटकन वळवली मान जणू पहिलेच नाही तिला अन् तो तसाच निघूनही गेला..!! काव्यचकोर..'
190
People Reached
9
Engagements
5
3 Comments
Like
Comment
Share