Tuesday, 27 October 2015

II समतेची ठेव II

II समतेची ठेव II
==========
होय त्या दगडातही माझा देव आहे..
अनेक नावे परी ईश्वर एकमेव आहे..!!

करू दे ना मला माझी पूजा शांततेत..
तुला सांग आता कशाचे भेव आहे..!!

शांतीचाच पाठ पढवतोस ना रे तु ही..
अंतरात सांग कोणासाठी चेव आहे..!!

काय साध्य होणार रे उडवून रेवड़ी..
जीवन तुझेही तसच उडती रेव आहे..!!

नाही असरदार ते जातीय विष तुझे..
हृदयी माझ्या समतेची ती ठेव आहे..!!
**********सुनिल पवार.........


Monday, 26 October 2015

|| चांद ||

|| चांद ||
======
नभीच्या चंद्रा तू
ढगाआड़ रहा..
माझ्या सवे आहे
माझा चांद तू पहा..!!

तू खेळ नभात
एक माझ्या अंगणात..
चंद्र तोच आहे
का तुझ्याही मनात..!!

नजरेत भरून आहे
ओठी तीच बात..
कोजागिरी दिनी
उजळली चांद रात..!!
*****सुनिल पवार.....

|| एक लाट आठवणीची ||

|| एक लाट आठवणीची ||
=================
त्या पावलावर पाऊल उमटवत
मी सहज वाळुत चालु लागलो..
आठवणीच्या असंख्य लाटांशी
मी संवाद नवा साधू लागलो..!!


विचारले मी,
किती वेळ थड़कणार असे
निर्जीवशा भग्न किनाऱ्यावर..
किती बांधाल घर नवे
कोसळणाऱ्या त्याच वाळुवर..!!

किती ठोठवाल हृदयाचे दार
कितीदा व्हाल प्रेमात लाचार
प्रश्न असेच मनी हजार
वाळुच घर ते कुठवर टिकणार..!!

उत्तरल्या लाटा,
नसेना का तमा त्या कठोर किनाऱ्यास
लाटा मनाच्या नित्य थड़कणार..
भरून ओलावा मन मनाचा
पुन्हा किनाऱ्यास लुभावु पाहणार..!!

कधी ओहटी तर कधी भरती
लाटांच प्रेम अबाधित राहणाऱ..
एक लाट आठवणीची
हृदया समीप येऊन थडकणार..!!
:
एक लाट आठवणीची
हृदया समीप येऊन थडकणार..!!
******सुनिल पवार.....

|| पुरस्कार वापसी ||

|| पुरस्कार वापसी ||
=============
पुरस्कार वापसीवरुन
आता साहित्यकारांत जुंपली..
जखमी झाला कोण
अन कोण काढतोय खपली..!!


आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी
अशीच अवस्था आहे
प्रत्येक दृष्टीकोनाची एक
अजब व्यवस्था आहे..!!

तर्क वितर्क फारच भारी
कुणाच कुत्र कुणाच्या दारी
विद्वानांच्या भन्नाट विद्वतेने
डोक भणभणतय च्यामारी..!!

मढ़याच्या टाळूवर जसे
लागलेत स्वार्थाचे डोळे..
भांडत बसले बोके आपसात
अन माकड़ करतयं भलते चाळे..!!
*******सुनिल पवार.....

Friday, 23 October 2015

|| धर्म म्हणावा का ||

|| धर्म म्हणावा का ||
=============
धर्म म्हणावा का म्हणावी गुळाची ढेप
कारण प्रत्येक मुंगळा घेतोय त्यावर झेप..!!

चिकटुन बसतोय असा ना सुटणार तो कधी..
सुटण्यासाठी केली ना धडपड त्याने साधी..!!

जीव घालवतील पण जाणार नाही खोड..
धर्माचा गुळ म्हणतात आहे फार गोड़..!!

अगाध त्यांच्या विचारांना नाही कसली तोड़
आपण राहावं चिकटून अन दुसऱ्यास म्हणाव सोड..!!

****सुनिल पवार......

|| मी सांभाळतो माझी मड़की ||

|| मी सांभाळतो माझी मड़की ||
===================
उंगली निर्देशाने सांग
तू कुठे साव ठरतो..
स्वतःकडची चार बोटं
तू कसा काय विसरतो..!!


भूतकाळाची झापड़ं
तू कशापाई ओढतो..
आपल्याच बांधवाना
तू अकारण तोडतो..!!

झोपलेला उठेल पण
तू सोंग किती करणार..
सूर्य आला माथ्यावर
तू डोळे कधी उघडणार..!!

साप मरून पडलाय
तू भुई कशास ठोकतो..
फेकून दे ते कातड़
टिमकी कशास बडवतो..!!

उघड आता दार
तू कशास कड़ी लावतो..
अंधारात बसून सांग
कोणास उजेड दावतों..!!

भले असो मी अनाड़ी
तू कर रे PHD
समतेच भरून पाणी
मी सांभाळतो माझी मड़की..!!
******सुनिल पवार.....

|| अबोली बोलली ||

|| अबोली बोलली ||
============
अबोली बोलली अन
कर्ण तृप्त झाले
गोड तिच्या शब्दात
मन लुप्त झाले..!!


किती वेळ गेला
ना वेळेचे भान होते
तिच्या बोलण्यात जणू
सरितेचे उधाण होते..!!

भावनांची मुक्त पाखरे
हृदयी घर करीत होते
उत्स्फूर्त बोल तिचे
मन अधीर करीत होते..!!

बोलली ती तेच नेमके
माझ्या जे मनात होते
शब्द तेच काव्यात
मग उमटले क्षणात होते..!!
*****सुनिल पवार.....

|| सोड वल्कले ||

🌹विचार🌹पुष्प
==========
|| सोड वल्कले ||
🙏🌹🙏🌹🙏
जातीची तू सोड वल्कले
जीर्ण झाली फाटली कापडं
घे पेहराव नव्या युगाचा
का ओढतो तू उगा झापड़ं..!!


भाव तुझा तोच माझा
हवा कशास सांग दूजा
घे समतेचे आकाश कवेत
सरसावु दे वैचारिक भुजा..!!

कशास काढतो उणे धूणे
नाही साध्य त्यात रे काही
शब्द नुसतेच पेटतात इरेला
अन वाया जाते रक्ताची शाई..!!

जगा अन जगु दया
जगी जागव रे भूतदया
तू माझा अन मी तुझा
मूलमंत्र हाच मनी रुजवुया..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार.....

Monday, 19 October 2015

।। उपास-ना एक फार्स ।।

।। उपास-ना एक फार्स ।।
================
माते तुझा उपवास धरतो..
मला तर एक उपहास भासतो..
कड़क उपवास सांगुन सर्वत्र..
फळे वेफर भरपेट चापतो..!!


घरात नळाच पाणी मुश्किल..
बाहेर आम्हा बिसलेरीच लागते..
शोभेच्या ह्या उपवासाला मग..
अनवाणी मात्र फिरावे लागते..!!

स्त्री शक्तिची उपासना करतो..
स्त्रीयांना डोळे फाडून पाहतो..
सेटिंग साठीच उशिरा पर्यंत...
दांडियाचा अट्टाहास राहतो..!!

रंग बदलण्याच्या नवरंगात..
सरडयालाही आम्ही मागे सारतो..
बेगडी बेरंग उपास-ना मग..
बेमालूम एक फार्स ठरतो..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
******सुनिल पवार......

|| अब की बार ||



|| अब की बार ||
===========
अब की बार
सुरु होतील बार
बार मालकांची होईल
एंट्री दमदार..!!
अब की बार..


कंटकांचा वाढेल
पुन्हा रात्रीचा संचार
कृष्णकृत्यांस असेल
त्यांच बारचा आधार..!!
अब की बार..

नाचतील बारबाला
उड़तील नोटा अपार
वासनेच्या दलदलीत
होईल देहाचा व्यापार..!!
अब की बार...

तळीरामाच पाऊल
पडेल झोकदार
पोरबाळ उपाशी अन
सुटेल घरदार..!!
अब की बार..
***सुनिल पवार.....

|| हळद / कुंकु आणि करंडा ||

हळद..
नंदलाला रे नंदलाला
जाण जरा रुक्मिणीला..
पहिला मान असे हळदीला
ठावुक आहे का सांग तुला..!!
कुंकु बनुन मिरवते जरी
तुझ्या जगात सत्यभामा..
न बोलली कधी तुला हळद
सवारते तीच तुझ्या धामा..!!
अक्षता जशी सखी राधा
उधळीत फिरशी तिजसवे..
तू जाणलेस का कधीतरी
हळदीस तुझ्या काय हवे..!!
सुमन जशी वेडी मीरा
चरणात पडून नित्य राहते..
शिंपडून उदक नयनांचे
हळद तीज सामावून घेते..!!
अशीच कहाणी हळदीची
आहे का हो तुमच्या घरी..
तुमचाही करंडा करतो का हो
त्या लिलाधराशी अशी बरोबरी..!!
---सुनिल पवार...✍️

|| प्रेम जसे ||

|| प्रेम जसे ||
========
प्रेम जसे तिचे
तसेच प्रेम त्याचे
मोहरे जरी बदलले
घर तेच वेदनेचे..!!


एक क्षण सुखाचा
बाकी विरहाचा
जपून ठेवायचा
क्षण आठवणीचा..!!

फरक एक सूक्ष्म
न कोण जाणतो
कुठे घुसमटतो
कोण व्यक्त होतो..!!

प्रेम जसे तिचे
तसेच प्रेम त्याचे
हृदयाने हृदयास
समजून घ्यायचे..!!
***सुनिल पवार.....

Tuesday, 13 October 2015

II आई भक्तांची कैवारी II

II आई भक्तांची कैवारी II
================
माझ्या आईचे
आईचे आगमन झाले..
हर्ष उल्हासा
उल्हासा उधाण आले..
तिच्या पाऊली
पाऊली सुख चालत आले..
तिच्या चरणात
चरणात मन लीन झाले..!!


वाघ सिंहावर
सिंहावर बैसोनी आली..
निल मोरावर
मोरावर बैसोनी आली..
आई कोंबड्यावर
कोंबड्यावर बैसोनी आली..
आदि शक्तीची
शक्तीची स्थापना झाली.!!

वस्त्र आभूषणे
आभूषणे भरजारी..
पद्म, शंख चक्र
चक्र नि त्रिशुलधारी..
शोभे ललाटी
ललाटी मळवट भारी..
आई विराजली
विराजली दरबारी..!!

जागर करितो
करितो आई दरबारी
गोंधळ मांडतो
मांडतो आईच्या द्वारी
भंडारा उधळीतो
उधळीतो आईच्या पायी..
आई भक्ताची
भक्तांची हाय कैवारी..!!
*****सुनिल पवार....

|| कल्पना संकल्पना ||



|| कल्पना संकल्पना ||
==============
मी हाक तुला देतो
तू साद मला दे
मी गीत तुझे गातो
तू दाद मला दे..!!

मी शब्द फूल अर्पितो
तू दरवळ त्यास दे..
मी भावना तुज देतो
तू गहीवर खास दे..!!

मी सुर तुझे छेड़तो
तू साज नवा दे..
मी मुक्तछंदी न्हातो
तू अंदाज नवा दे..!!

मी लेखणीत बोलतो
तू कल्पना तीज दे..
मी कविता ही करतो
तू संकल्पना तीज दे..!!
****सुनिल पवार.....

Friday, 9 October 2015

|| जत्रा ||

|| जत्रा ||
======
किती बदलल्या काना मात्रा
गलित झाल्या शब्द गात्रा..
किती पुजू शब्दांच्या सूत्रा
जगात भरली कोरडी जत्रा..!!


का कुरवाळतो मी शब्दाला
काय मोल त्या भावनेला..
गहीवर तोच मनाचा माझा
कधी भावला कुठे कोणाला..!!

काय फलित मम शब्दांचे
कशास होते त्यांस जुळवले..
शब्द शब्द हा फोडतो टाहो
शब्द कुणाचे कुणी पळवले..!!

हौशे गवशे नवशे सारेच
शब्द जत्रेत लीलया रुळले..
का मज मग शब्दांनीच छळले
माझ्याच नावास असे गाळले..!!
*******सुनिल पवार......

|| सांग ना रे वाऱ्या ||

|| सांग ना रे वाऱ्या ||
==============
मन गुंतले कोणात
कोण आहे मनात..
सांग ना रे वाऱ्या
निरोप तिच्या कानात..!!


पिंगा नको घालू
तू नुसता भोवताली.
काळीज माझं होतय
नित्य वरखाली..!!

खेळू नको बटेशी
तू काळ्या भोर नभाशी
माझ्या मनाचा पाऊस
लढतोय पापण्यांशी..!!

उडवु नको अवेळी
तू मोहक पदरपिसारा..
बेभान होते मन
पाहुन तो नजारा..!!

दरवळू दे गंध
तू वाह मंद धुंद
दोन प्रीत फुलांचा
पसरु दे सुगंध..!!
*******सुनिल पवार.....

।। एका निवांत वेळी ।।

।। एका निवांत वेळी ।।
==============
एका निवांत वेळी..
रात्रीच्या प्रहरी..
तरळला चांद..
स्मृती पटलावरी..!! 


स्वच्छंद निरागस..
अवखळ पारस..
स्पर्शिला मनास..
भिडला हृदयास..!!
रोमांचित नजारा..
चांदण पसारा..
प्रेमाच्या धारा..
चिंब करी अधारा..!!

यौवनाचा उन्माद..
मनी घाली साद..
पाखरु नादान..
भरू पाहे उड़ान..!!

वाऱ्याच्या आवेग
मनाचा वेग
रोखावा कैसा
दौडला अश्वमेघ..!!
****सुनिल पवार....

Tuesday, 6 October 2015

|| मौनाचा संवाद ||

संवाद मनाचा...
बोलायचे नाही
भेद खोलायचे नाही
मनाचे गुपित 
मनात ठेवायचे काही..!!
हसायचे नाही
व्यर्थ रुसायचे नाही..
मनाच्या चकव्यात
नाहक फसायचे नाही..!!
टाळायचे नाही
प्रश्न पाळायचे नाही..
प्रेमातले प्रेम
तुला कळायचे नाही..!!
ठरवतो काही
अन् घडतेय काही..
मौनाचा संवाद
उगाच बोलतोय काही..!!
--सुनिल पवार...✍️

Monday, 5 October 2015

II अभिमन्यु II

II अभिमन्यु II
=========
अभिमन्यु कोवळा सुकुमार..
पार्थ पुत्र वीर रणझुंजार..
भेदुन चक्रव्यूह गाजवी रण..
छोट्या चणीचा रणधुरंदर..!!


चक्रव्यूह भेद शिकुन उदरात..
मजविला हाहाकार कौरवात..
मारण्या त्या एक विरास..
तुटून पड़ती कौरव एकजात..!!

निःशस्त्र झाला ना डगमगला..
एकटा पडला तरीही लढला..
अभिमन्यु चक्रव्यूहात फसला
लढता लढता धाराशाही पडला.!!

संकेत युद्धाचे न पाळले कुणी
निःशस्त्र वीरास निर्दये मारला..
निपचित पडला बाल धनुर्धर
जयन्द्रथे लत्ता प्रहार केला..!!

भेद जाणीला परी न सुटला
परतीचा तो मार्ग खुंटला..
अभिमन्यु तो वीर धनुर्धर
अधूऱ्या विद्याचा बळी ठरला..!!
********सुनिल पवार....

|| धर्म ||

|| धर्म ||
======
धर्म तुझा काय आहे
का जनमाणसात पाहे..
करशील कर्म निःकाम
सुहास सर्वदूर वाहे..!!


फिरू नकोस परिघात
कुपमंडूक घोळक्यात..
बघ विशाल आकाश
लक्ष तारे भरून त्यात..!!

जागव दृष्टिकोण व्यापक
सोड कल्पना भंपक..
नको मनात विकल्प
रुजव माणुसकीचा संकल्प..!!
*****सुनिल पवार...

|| भारत मातेचा लाल ||

|| भारत मातेचा लाल ||
===============
भारत मातेचा लाल
मूर्ति लहान पण किर्ती महान..
कणखर त्यांच्या नेतृवाचा
आम्हा भारतीयांस सार्थ अभिमान..!!
  जय जवान जय किसान
अतुल्य अमोघ दिला नारा..
श्रेय देऊन श्रमिकांस सारे
एक केला प्रवाह सारा..!!

जरी मेणाहुन मऊ स्वभावे
देशहितास्तव बनले लोह
भयकंपित शेजारी शत्रु
आला शरण मावळला द्रोह..!!

शत शत नमन तुम्हास शास्त्री
कर्तुत्व तुमचे अतिविशाल..
हृदयी तेवत ठेवू चिरंतर
तुमच्या विचारांची दिव्य मशाल..!!
*****सुनिल पवार....

|| साबरमतीच्या संता ||

|| साबरमतीच्या संता ||
===============
|| साबरमतीच्या संता ||
===============
साबरमतीच्या पूज्य संता
तुज पूजते जरी जनता..
नाव तुमचेच घेवून बापू
राज्य करतोय गब्बर नेता..!!
तत्व तुमची सर्व महान
परी नेत्यांनी केली लहान..
जयंती पुरतीच हो अहिंसा
हिंसेविना कुठे हलते पान..!!
जपतोय आता जो तो बापू
कृपया गैरसमज नसावा..
नोटांवरचा तुमचा फ़ोटो
तिजोरीतच नित्य वसावा..!!
हे ही तितकेच खरे बापू
इथे तुम्हालाच प्रथम मान..
तुम्हास खिशात ठेऊन म्हणतात
मेरा भारत महान..मेरा भारत महान..!!****सुनिल पवार....

|| याज्ञसेनी ||

|| याज्ञसेनी ||
=========
नाही समजली कोणा द्रौपदी
दुषणे अशी मग का लावली..?
खोडण्या तुमचे आरोप सारे
तुमच्यात आज उभी ठाकली..!!


पांचाल नरेश कन्या म्हणुनी
जन पुकारती मज पांचाळी..
पाच पतींची पत्नी म्हणुनी
तुम्ही हीणवली मज पांचाली..!!

दूषण मी मग कोणा लावू
भिक्षा समजून जीने वाटले..
ऐकुन बोल त्या मातेचे
उभे आभाळ जणू फाटले..!!
नियती घेई कसली परीक्षा
वाटली मज समजून भिक्षा
दोष माझा काय होता
कसली करता तुम्ही समीक्षा..!!

वरले मी ज्यास मनाने
ना प्रेम खरे त्या अंगी रुजले
नाही मजला कधी समजले
शब्द माझे कोणी पूजले..!!

होते जरी पाचांची पत्नी
समजे कोण मज संपत्ती..
विरोध माझा व्यक्त केला
तरी का हो तुम्हा आपत्ती..!!

वस्त्रास हात घाले तो पापी
पूत तुम्ही का तसेच प्रतापी
कुलटा ठरवून मोकळे होती
मदतीस ना येती कदापी..!!

व्यथित होऊन त्या शेऱ्याने
फिरते उरात घेऊन अग्नि
भस्म होईल जो छेडेल मज
ठेवा ध्यानी..
मी द्रौपदी, मी याज्ञसेनी..!!
******सुनिल पवार......

|| त्या क्षणाचा ||

|| त्या क्षणाचा ||
==========
त्या क्षणाचा मोह भुलवितो...
हिंदोळ्यावर मना झुलवितो..!!

बोलतेस तू बोल ऐसे
ह्रदय तार झंकारते जैसे
देह भान मी विसरतो
तृप्त कर्ण तरी आसुसतो..!!
त्या क्षणाचा मोह भुलवितो...ss

मारता तू मिठी आवेगे
पुलकित रोम होते जागे
बंध मनाचा हलके उसवतो
प्रेम भाव मनी प्रसवतो..!!

त्या क्षणाचा मोह भुलवितो..ss
द्वैत अद्वैत खेळ जरी हा
गंधित धुंद सुगंधा परी हा
परिमळ तो रोमांच फुलवितो
श्वास तुझा श्वासात मिसळतो..!!
त्या क्षणाचा मोह भुलवितो...ss

मिलनाचे फलित काय ते
ओढ़ तुझी मम जीवा लावते..
आठवणीत त्या नित्य राहतो
वाट तुझी क्षण क्षण पाहतो..!!
त्या क्षणाचा मोह भुलवितो...ss
हिंदोळ्यावर मना झुलवितो..!!
******सुनिल पवार......