क्षणभराचे प्रेम वेडे..
क्षणभराचे प्रेम वेडे
किती प्रश्न घेऊन आले।
मोह फुलांचे मोहक
देही काटे लेवून आले।
धुंद परिमळ तयांचे
क्षण बेधुंद करून गेले।
नजरेचे शर विखारी
हृदयास भेदून गेले।
हे प्रेम तरी कसले
नाही कुणास कळले।
क्षणभराचे प्रेम वेडे
किती प्रश्न घेऊन आले।
अल्लड नदी जैसे
वळणावळणावर वळत गेले।
अंततः तेच पाणी
सागरात विलीन झाले।
ते ही मिटून गेले
ज्याने सर्वस्व वाहून नेले।
क्षणभराचे प्रेम वेडे
किती प्रश्न घेऊन आले।
पृथ्वीचे सूर्यावरती
तर चंद्राचे पृथ्वीवर जडले।
चंद्रच्या तेजाळ मुखड्याने
चांदण्यांस वेड लावले।
मग निशा सजते कुणासाठी
हे काजव्यास कुठे कळले।
क्षणभराचे प्रेम वेडे
किती प्रश्न घेऊन आले।
ज्यांनी प्रेम केले
त्यांना ते छळत गेले।
जे वंचित राहिले
ते ही तसेच जळत राहिले।
खाक झाले कैक प्रेमी
नवनवे येत राहिले।
क्षणभराचे प्रेम वेडे
किती प्रश्न घेऊन आले।
--सुनील पवार..