Tuesday, 1 September 2020

निरोप तुमचा घेतो

 निरोप तुमचा घेतो..

निघालोय मी
आता निरोप तुमचा घेतो।
पुढच्या वर्षी नक्की येईन
असे वचन तुम्हास देतो।
यंदा डीजेचा गदारोळ नव्हता म्हणून
उंदीर मामाही निःचिंत दिसले।
सुपाएवढे कान माझे
भजन,आरतीनेच संतोष पावले।
हिडीस नृत्याला आळा बसला
उंचीची स्पर्धा कुठे दिसली नाही।
इवले नेत्रही सुखावले माझे
ते मिटण्याची पाळी आली नाही।
डिजिटल का होईना पण
तुम्ही मनोभावे माझे दर्शन घेतले।
बाजारू स्वरूप कुठेच नव्हते
ह्या गोष्टीचे अधिक कौतुक वाटले।
तसे ठाऊक आहे मला
हे सर्व भीतीपोटी निपजलंय।
संकट आलंय वाडी वस्त्यांवर
म्हणून स्वतःस घरी कोंडून घेतलंय।
पण विश्वास बाळगा मनात
आलं संकट दूर होणार आहे।
स्वच्छतेची कास, पर्यावरण रक्षण
हेच तुम्हास तारक ठरणार आहे।
मनी आशा बाळगतो की,
हाच भक्तिभाव पुढच्या वर्षी दिसेल।
तुमच्या सुदृढ मनाचा मोरया नाद
माझ्या हृदयास येऊन भिडेल।
|| बोला गणपती बाप्पा मोरया||
--सुनील पवार..✍️

No comments:

Post a Comment