Thursday, 24 November 2016

स्पर्श करून


स्पर्श करून..
स्पर्श करून किनाऱ्यास
लाटे दूर कुठंवर जाशील?
ओलावा मम मनातला
सांग कसा घेऊन जाशील।
मनसागरात उगाच
किती वेळ घुटमळशील।
तू जितकी दूर जाशील
तितकी अधिक तळमळशील।
आज जरी ओहटीस तू
उद्या भरतीस असशील।
इतके मात्र निश्चित
तू किनाऱ्यावर थडकशील।
--सुनील पवार.

|| मुक्तीचा साक्षात्कार ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| मुक्तीचा साक्षात्कार ||
===============
आज ती जरा
चिडलेली वाटली..
लखलखणाऱ्या दिव्यावर
काजळी दाटली..
म्हणाली,
नको संसार नको मायाजाल
मुक्ती हवी मला..
इतकं सगळं करून
साधं कौतुक नाही कुणाला..??

हसलो मी म्हणालो
नाकारलंय कोणी..?
तू पात्रच आहेस कौतुकाला..
मी कधी अडवलंय तुला..?
मुक्तच आहेस तू तुझ्या घरात
बांधलंय का कधी मी
कोणत्या चौकटीला..?
चल, माझंही अनुमोदन आहे तुला..!!
नको पेटवू चूल सुट्टी दे कामाला..
जेवण बाहेरून मागवू
बोल आणखी काय हवंय तुला..?
काळजी नको मुलांची
पैसे देऊ खाऊला..
मी बाहेरच जेवतो, दे सुट्टी डब्याला..
नको संसार नको मायाजाल
कारण
मुक्ती हवीय तुला..!!
आता अधिकच चिडली
म्हणाली,
काही हाड आहे का जिभेला..?
म्हणे पैसे देऊ मुलांना
मग मी आई कशाला..?
काही नको बाहेरचं
उगाच आमंत्रण आजाराला..
माझ्याशिवाय सांगा
कोण बघणार तुम्हाला..?
तुमच्या आनंदात खरा
आनंद मिळतो मला..!!
मी हसलो पुन्हा
म्हणालो, ठीक आहे
तुझी तू मुक्त आहेस
माझं अनुमोदन आहे तुला..
पण खरं सांगू
आपणच बांधून घेतलंय
आपल्याला..
प्रेमाच्या धाग्यात
कधी न सुटण्यासाठी..
अन आखून घेतलीय
चौकट सामंजसपणाची
तशी आवश्यक असतेच म्हणा
संसाराचा फोटो सुंदर दिसण्यासाठी..!!
आता
हसली ती गालात
जणू
मुक्तीचा साक्षात्कार झाला..
मिटून गेला विरोध
उत्साही संचार झाला..
वाहून घेतले स्वतःस
पुन्हा आपल्या कामाला..
विसरली देहभान
विसरली साऱ्या जगाला..
उडून गेली सारी काजळी
अन
दिवा लख्ख तेजाळला..!!
****सुनिल पवार....✍🏽

|| कधीतरी ||

|| कधीतरी ||
=========
मोत्याची सर होऊन
नुसतंच
गळ्यात मिरवत
पडून राहण्यापेक्षा
कधीतरी हो
यत्किंचित
हळुवार तलम पीस..
अन घे अनुभूती
स्वच्छंद उडण्याची
वाऱ्यावर होऊन स्वार
घाल गवसणी गगनास..!!

येशील पुन्हा खाली
अवचित जमिनीवर
तेव्हा कदाचित
तुडवली जाशील नकळत
पायदळी
वा उचलून घेईल कुणी
हळुवार
जपेल कोणी मनाच्या पुस्तकात..
इतके मात्र निश्चित सांगेन
कळेल मग तुझे तुलाच
नाही रंजन काहीच
मोत्याच्या मिरवण्यात
पण
गंमत आहे खरी ती
पिसाच्या उडण्यात..!!
***सुनिल पवार.....✍🏽😊

समजून घे जरा

🌺समजून घे जरा🌺
============
आशेच्या झुल्यावर
झुलावे तरी किती..
गुलाबाने काट्यावर
फुलावे तरी किती..!!

औट घटकेचा बहर
सखे समजून घे जरा..
शब्दांच काय वेडे
कर नजरेने इशारा..!!
****सुनिल पवार...✍🏽😊

Friday, 18 November 2016

|| अबोला ||

🌺तिच्यातली ती🌺
=============
|| अबोला ||
=●=●=●=
मी सहज काही म्हटलं
तिने मनावर घेतलं
अबोल्याशी सोयरीक
नातं कुठून जडलं..?


मी उत्तर दिलं केवळ
अन लागली उन्हास झळ..
चंद्र मांडे कैफियत
की नभी भरले काजळ..!!

मी केला जरा खुलासा
सावलीस मिळो दिलासा..
झुळकीने मात्र केला
वावटळीस आपलासा..!!

मी निशब्द झालो आता
निशेचा जणू चाहता..
चांदणी बोले काजव्याला
दिवा मालव रे आता..!!
***सुनिल पवार...
 

(लाव्हा)


💝तिच्यातील ती💝
==============
(लाव्हा)
=●=●=
अंगभर हिरवळ पांघरलेल्या
तिच्या मनाचे पदर
मी कुतूहल म्हणून
उलघडत गेलो..
एक एक करत
सरकवत आवरण
मी हृदया समीप येऊन ठेपलो..!!

जाणवले तेव्हाच मनाला
हिरवळ केवळ वरवर
वास्तवात
बोजड मुळांनी
अंतःकरण पोखरलेली..
रक्त मांसास चटावलेली
ती मुळं
मिळेल ती जागा व्यापून
काळजात थेट रुतलेली..!!
मी
हलवले केवळ हृदयास
अन उसळला सुप्त लाव्हा
त्याच बोजड मुळाखाली
तिने महत्प्रयासाने थोपवलेला..
अन
पाहिला एक दगड अनामिक
लाव्ह्यात सहज वाहताना
काही कळते न कळते तोच
क्षणात होता विरघळलेला..!!
****सुनिल पवार....✍🏽

|| तिच्यातील ती ||


|| तिच्यातील ती ||
============
तिला आवडते
सजायला सवरायला
अन मला
तिला पाहायला..
ती
पाहते आरशात
अन
प्रश्न करते मला..!!

ती
मिरवते समारंभात
मग्न
तिच्या विश्वात
अन
मी पाहतो तिला
बसून एकांतात
ठेवणीतला प्रश्न
ठेवून
तसाच मनात..!!😊
***सुनिल पवार...✍

|| आठवणी ||

|| आठवणी ||
=========
वर्धाक्याचा शाप
नसला जरी आठवणींना..
तरी
काळाच्या ओघात
आठवणी
धूसर होत जातात..
अन
हे ही तितकेच खरे
की,
कालच्या झाल्या धूसर
आठवणी
पुन्हा नव्याने उजळ होतात..
अहो आठवणी अशाच असतात
तुमच्या काय
अन माझ्या काय
सर्वांच्या सेम असतात..!!😊
****सुनिल पवार....✍🏽

II रुसलेल्या नशीबास II

🌺सुप्रभात🌺
==========
रुसलेल्या नशीबास,
ज़रा हसवावं म्हणतो..
रोजच मला फसवतं,
सत्य दाखवावं म्हणतो..!!


जीवनाच्या नाण्याला,
दोन बाजू असतात..
हे पटत नाही त्याला,
ज़रा पटवावं म्हणतो..!!
***सुनिल पवार

II वेदनेच्या मंचावर II

II वेदनेच्या मंचावर II
==============
तूझे मन लुभावें म्हणून
मी काहीच लिहीत नाही..
माझ्या वेदनेच्या मंचावर
तुझं फरमाईशी गीत नाही..!!


नुसतीच वादळं आहेत सारी
रो रो करत घोंगावत येणारी..
मंद वाऱ्याच्या झुळकीच असं
कोणतंही संगीत नाही..!!

कल्लोळ आहे केवळ भावनांचा
दाहक देहास जाळणारा..
तुझ्या तारांकित मैफिलीच्यापरी
रोषणाई झगमगीत नाही..!!

भिजवून घेतलेत शब्द जरा
ओघळणाऱ्या दमट थेंबातून..
तू समजते तसे भिजलेले ते
पावसाच्या सरीत नाही..!!
*****सुनिल पवार....✍🏽

Monday, 14 November 2016

|| सुख ||

|| सुख ||
■■■■■
सुखाच्या मागे
मी
सैरावैरा धावलो
दमलो
अवचित विसावलो
त्या झाडाखाली..
उन्हाच्या काइलीत
मिळाली छाया,
एक झुळुक वाऱ्याची
तेव्हा जाणले
वास्तवात
सुख आहे खरे
त्या जळणाऱ्या दिव्याखाली..!!

मी समजलो सुख
शीतल वाऱ्याला
अन
गोठलो
शिरशिरी आली अंगाला
एक कवडसा
आला आधारा
तेव्हा जाणले
वास्तवात
सुख आहे खरे
त्या जळणाऱ्या दिव्याखाली..!!
****सुनिल पवार.....😊

|| ज़रा गौर करो ||

|| ज़रा गौर करो ||
===========
खुशियोका प्याला
बिखर गया जमीन पर..
चीख-चीख के कह रही सच्चाई
ज़रा गौर करो नमी पर..!!


पानी तो है कुए में
मगर पेहरा बड़ा सख्त है..
बेबस है आम यहाँ
बाकी सब मस्त है..!!

कट रही है जिंदगी कतार में
अब हाथो में है पेट यहाँ..
काले गोरे का भेद नहीं
ठंड कमरे में लेटा हैं शेठ वहां..!!

पल भर का चैन कभी
हमें भी दे कोई उधार में..
रोज मर्रा की जिंदगी में
आश्वासक कोई सुधार दे..!!

आएंगे अच्छे दिन कभी
इसमें कोई शक नहीं..
आखिर की सोच हमारी
साला अपना इसमें लक नहीं..!!
*****सुनिल पवार...✍🏽

II क्षण सोनेरी II

II क्षण सोनेरी II
==========
खुललेल्या कळीने
आज
सहज विचारले भ्रमराला..
कसं रे जमत तुला
हळुवार फुंकर मारायला..??
जाणवते
तुझ्या फुंकरीची जादू
अन
हृदय लागते धडधडायला..
पाकळी मिटता मिटेना
जणू
निद्रानाश जडलाय निशेला..!!


हसला भ्रमर
म्हणाला,
तू श्रेय देत आहेस खरी मला
पण
मी आहे केवळ निमित्ताला
मी खुलतो तुझ्या सहवासात
सारे गुपित दडलेय त्यात
चल मिटून घे आता पापण्या
हृदयावर जरा ठेवून हात
मी असेन तुझ्या आसपास
मग जाणवतील तुला
मिटल्या पापणीतील
हे क्षण सोनेरी
तसेच असतील खास..!!
*****सुनिल पवार....

|| नाती ||

|| नाती ||
======
असतात काही नाती
हळुवार गुंफलेली..
मनाच्या वेलीवर
सुंदर फुल फुललेली..!!


काटेरी विश्वात
मखमल बहरलेली..
दग्ध मनावर
मोरपीस फिरलेली..!!

भावनेच्या गुंत्यात
रेशमी तरल ठरलेली..
फसव्या ह्या विश्वात
साधी सरळ बसलेली..!!

असतात अशी नाती
संयोगे जुळलेली..
आली जरी वादळे
किंचित न ढळलेली..!!
***सुनिल पवार...✍🏽
 

Wednesday, 9 November 2016

|| सेल्फी मनाचा ||

|| सेल्फी मनाचा ||
============
आज,
सेल्फीचा मोह
मनाला झाला..
तोंडाचा चंबू करून
एक सेल्फी घेतला..
अन
हसत धरला
माझ्या समोर
मन म्हणालं
बघ ना
सेल्फी मी काढला..!!

मी पाहिला सेल्फी
पुन्हा पुन्हा
परंतु
मला न कुठेच
मनाचा चेहरा दिसला..
मग
प्रश्न केला मनाला
कुठे आहे रे सेल्फी..?
नक्की काढला होता
का मोबाईल बिघडला..
का येडा बनवतोस मला..?
सांग तरी
उत्सुक आहे मी आता
तुझा सेल्फी बघायला..!!
हसले मन
म्हणाले.
आरं येडा का खुळा..
सेल्फीत यायला
का माणूस समजला मला..?
तू म्हणशील
तर दिसेनही कदाचित
पण
आधी तुला ठरवावे लागेल
नेमके कसे हवे
मी दिसायला..!!
*****सुनिल पवार....

|| दुसरी बाजू ||

|| दुसरी बाजू ||
==========
कळतंय मला
तू मांडतोस तुझ्या शब्दांतून
माझ्या मूक वेदनेची सल
दिसतेय मला
त्यामागची तुझी कणव..
भिडतेय ती तुझ्या शब्दांतून
लोकांच्या हृदयापर्यंत
मी ही करतेय रे
भरभरून तुझं कौतुक
पण
सांगावसं वाटतंय रे
त्यामध्येही आहे अजूनही
बरीचशी उणीव..!!

तू दाखवतोस ती
निर्विवाद आहे
नाण्याची एक बाजू
परखड आणि सत्य..
पण पाहिलीस का कधी
त्याच नाण्याची दुसरी बाजू
पाहशील तर कळेल तुजही
त्याविना आहे रे सारेच मिथ्य..!!
वाईट वाटून घेऊ नको तू
सत्य जरा कडवट आहे
पुरुषांच्या अधिसत्तेत
स्त्री ची नित्याची परवड आहे..
मग वादळ प्रेमाचं असो
वा असो साहनभूतीचं
वाळूच्या आधारात
झाडाची निश्चित पडझड आहे..!!
आता हेच बघ ना,
माझ्याच वेदनेच्या भांडवलावर
तू तात्काळ प्रसिद्धीस येतोस
सर्वत्र तुझा उदो उदो होतो
स्त्री उदार मतवादी म्हणून
जो तो तुलाच नावाजतो..!!
फायदा तुझा होतो
पण माझं काय..?
मी मात्र अजूनही त्याच
निराशेच्या खोल गर्गेत
वेदनेशी झगडतेय
आपल्या अस्तित्वाशी लढतेय
सल मिटता मिटत नाही
खंत अजून तशीच आहे
चारचौघात मिरवणारा
माझा सखा, मित्र, हितचिंतक
अंधारात तसाच वर्चस्वास हपापलेला
केवळ एक पुरुष असतो..!!
***सुनिल पवार...✍🏽

Monday, 7 November 2016

|| शल्य ||

|| शल्य ||
======
जगाला भुरळ पाडणाऱ्या
त्या गुलाबाला
काही दुःख असावे
असे जराही वाटले नव्हते..
दवबिंदूंनी बहरलेल्या
त्या पाकळ्यांच्या अंतरात
अश्रू बेमालूम जसे
लपले होते
ते ही
पाकळी गळता गळता
उमगले होते..!!

तसे नव्हतेच कधी
त्या गुलाबास
शल्य
कुठल्याच काट्याचे..
मात्र
कुरवाळणाऱ्या हातांनीच
केले होते घात
हळुवार उमलणाऱ्या
नाजूक नात्याचे..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| वेदना ||

|| वेदना ||
=======
सहज बोलता बोलता
बोलली ती
वेदनेने भरलेल्या
ह्या वेदनेच्या घरात
तुला
वेदनेशिवाय
काही मिळणार नाही..
मी ही हसून म्हटले
याच वेदनेच्या डोहात
अंतरबाह्य
डुबक्या मारल्याशिवाय
हृदयाचा तळ
तसाही कोणाला
कळता कळणार नाही..!!

ती किंचितशी हसली
म्हणाली,
सगळे शब्दांचे खेळ आहेत..
ऐकलेस कधी.?
वेदनेशी नाते
हसत कोणी जुळवले आहे..?
आणि निव्वळ शब्दांनी
तरी कुठे कधी
वेदना मिटली आहे..?
मी पुन्हा हसलो
म्हणालो,
तू तरी मला कधी
नीटसे पाहिले आहे..?
पाहिले असतेस तर
जाणले असते
ह्या हास्यामागची खरी प्रेरणा
कोण आहे..
आणि शब्दांचं म्हणशील तर
इतकंच सांगेन
माझ्या ह्याचं शब्दांनी
किंचित का होईना
तुझ्या ओठी
हास्य पेरलेलं आहे..!!
***सुनिल पवार...✍🏽

II ती II

II ती II
====
डोईवर ठेवून घडा
ती 
अनेक  दगड चुकवत
भविष्याचा माग काढत
वर्तमानात चालत असता
अचानक एका वळणावर
तिची भेट
सहहृदयी
संवेदनेशी झाली
अन 
ती 
नखशिखांत भिजली
कारण 
यमु
नेचा डोह उचंबळून आला 
आणि
तिच्या डोईवरचा तो घडा 
आता
नकळत
 फुटला होता..!!
***$p....
 

चालत असता
एका वळणावर
तिची भेट
सहहृदयी
संवेदनेशी झाली..
अन
भिजली ती
यमुना डोहात
तिच्या डोईवरचा
तो घडा
नकळत आता
फुटला होता..!!
***$p....✍🏽

|| बिलोरी आरशात ||

बिलोरी आरशात..


पाहशील जेव्हा कधी
बिलोरो त्या आरशात..
सखे सलज्ज होशील
मज आणता मनात..!!

नजर झुकेल तुझी
अलवार अशी खाली..
भेटेल तुज तिथेच
आठवण माझी ओली..!!

बंध गळून जातील
दूर होतील कनात..
तुजसवे असेन मी
धुंद गुलाबी क्षणात..!!
--सुनिल पवार..

|| जळमटं ||

|| जळमटं ||
========
ठाऊक असतीलचं ना??
जळमटं
हो तीच
सुंदरशा भिंतीस
बेरंग करणारी..
जरासं दुर्लक्षिता
भिंतच व्यापणारी..!!

चिवट असतात तशी
जळमटं
कितीही झाडू फिरवा
झाडूलाही बधत नाहीत..
हाताची तर बातच सोडा
काळं केल्याशिवाय
कधी सोडत नाहीत..!!
पण
नसतात सर्वच कोटगी
जळमटं
मात्र बारकाईनं
ती पाहावी लागतात..
नको झाडू, नको स्पर्श
हळुवार फुंकरीत
सहज निघून जातात..!!
भिंतीवरच्या जळमटांच
तसे भिंतीला ग्रासने
काही नवे नसते..
मात्र कोनाड्यातल्या
काळोखाला
उजेडाचे दान हवे असते..!!
तरच लगाम राहील
जळमाटांवर
निदान आळा तरी बसेल..
अन्यथा
प्रभावाखाली जळमटाच्या
प्रत्येक भिंतीचे सौंदर्य मात्र
कायमचं हरवेल..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| निसर्ग खेळ ||

हायकू....
|| निसर्ग खेळ ||
===========
देखणा साज
वाटेत हरवला..
झरा आटला..!!१!!
कोरड्या वाटा
लुप्त पाऊलखुणा
ओलाव्याविना..!!२!!
शिशीर घाला
बहर ओसरला..
पाचोळा झाला..!!३!!
सुटला पीळ
विलग झाली वेल..
निसर्ग खेळ..!!४!!
झडली पानं
मुकले सावलीला..
सल झाडाला..!!५!!
***$p...✍🏽

Tuesday, 1 November 2016

|| सांगायलाच हवं असं नाही ||

|| सांगायलाच हवं असं नाही ||
===================
सांगायलाच हवं
असं नाही..
न सांगताही कळतंय
बरंच काही..!!

आता हेच बघ ना,
त्या पोगोळ्यातूनओघळणारा
एक एक थेंब
सांगू पाहतोय
त्यामागची अबोल वाणी..
टप, टप, टप,
मनाच्या पानावर खेटून
क्षणात विरलेल्या,
त्या दवबिंदूची कहाणी..!!
सांगायलाच हवं
असं नाही..
न सांगताही कळतंय
बरंच काही..!!
तू सांगणार नाहीस पण
कथन करताहेत
थेंब अन थेंब
त्यांच्या उष्ण वाहण्याचे
खरे कारण..
मातीशी जोडलेले अबोल नाते
अन मनाच्या पुस्तकात जपलेले
हळुवार प्रेमाचे
ते तरल मोरपीसी पान
उलघडून दाखवतेय सजल अंतकरण..!!
सांगायलाच हवं
असं नाही..
न सांगताही कळतंय
बरंच काही..!!
सुखाच्या भाऊगर्दीत
तुला चोरून भेटलेला
माझा एकांत
स्पष्ट जाणवतोय मनाला..
अन दिसून येतेय
ती उमडणारी आठवणीची लाट
मुदतीच्या ओहोटी नंतर
आतुर
भेटण्या किनाऱ्याला..!!
सांगायलाच हवं
असं नाही..
न सांगताही कळतंय
बरंच काही..!!
****सुनिल पवार....✍🏽