Thursday, 1 June 2017

|| पान ||

|| पान ||
======
आता
येईल तो
भिजवायला
आणि
ती ही
भिजून जाईल..
सुकलं जीर्ण
पान एकेक
दिशाहीन पुरात
वाहून जाईल.!!
***सुनिल पवार...✍🏽

|| सुख ||

|| सुख ||
======
जे दुर्लभ आहे
ते अकस्मात सापडावे
या सारखं
दुसरं सुख नाही..
जसा
उन्हात पाण्याचा शिडकावा..
रिमझिम पाऊस
तसाच सुखद भासणार..
स्वप्नाविन जीवन
जीवन कोण समजणार..?
आणि
दुःखाला कवटाळून
ते किती काळ तग धरणार..?
छोटे का होईना
क्षण आनंदाचे
येथेच्छ उपभोगावे..
मरणा नंतर
सांगा
काय शेष उरणार..?
***सुनिल पवार..✍🏽

|| अंदाज ||

|| अंदाज ||
========
ती :
तू घेऊ नको अंदाज
तुला तो तसा लागणार नाही..
काठावर बसून केवळ
तळ डोहाचा उमगणार नाही..!!

तो :
अंदाज नाही ग,
पण अवलोकन करतोय काही..
आणि
डोहाचं म्हणशील तर
समजू नको तो अंतरात नाही..!!
ती :
असेल ही कदाचित
पण
मोहास, डोह मी म्हणणार नाही..
आणि काय भरवसा..?
तो आणखी कुठे वळणार नाही..??
तो :
वळणावर तू बोलू नको
सागरास ते जमणार नाही..
अल्लड नदीची धार तू
तुजविण त्यास करमणार नाही..!!
ती :
शब्दाच्या तुझ्या जाळ्यामध्ये
मी सहजासहजी गावणार नाही..
बांध मनाचा अतुट संयमी
ती सागरासही मिळणार नाही..!!
तो :
जाळं म्हणून हिणवू नको
यासम दुसरा साज नाही..
शब्दांच्या या नजाकतीचा
तुजला खरा अंदाज नाही..!!
****सुनिल पवार...✍🏽

|| श्वेत रंग ||

|| श्वेत रंग ||
=========
भावतो मनास
श्वेत रंग..
आवडतो मला
त्याचा संग..
सर्व रंगात तो
सहज मिसळतो..
लोक म्हणतात त्यास
शांतीचा रंग..
तरीही त्यांस
कुठे हो तो कळतो..?

शांत संयमी
त्याची
बुलंद ललकारी..
शाश्वत, आश्वासक
प्रकाशकारी..
ज्यात मिसळतो
त्याच्या होऊन जातो..
तरीही आपले
अस्तित्व तो टिकवतो..!!
लोक शोधतात
रंगात धर्म..
पण मला
भावते त्याचे कर्म..
खरा योगी
तोच शोभून दिसतो..
कारण
जहाल,मुजोर रंगासही
तो
लीलया मवाळ करतो..!!
***सुनिल पवार.....✍🏽

|| आयुष्याची गणितं ||

|| आयुष्याची गणितं ||
==============
आयुष्याची गणितं
जरा,
निराळीच असतात..!!
काही किचकट
तर काही,
सहज सुलभ भासतात..
कधी कधी ती,
क्षणात सुटल्या सारखी वाटतात..
पण अचानक,
काही समीकरणे बदलतात..
आणि
सर्वस्व उणे होते
मात्र काही सेकंदात..!!

आयुष्याची गणितं
जरा,
निराळीच असतात..!!
जोडलेले उणे होतात..
उणे झालेले,
पुन्हा जोडले जातात..
गुणाकाराच्या अपेक्षेत
भागाकार वाट्याला येतात..
आणि
सरते शेवटी,
केवळ शून्य पदरात पडतात..!!
आयुष्याची गणितं
जरा,
निराळीच असतात..!!
****सुनिल पवार....✍🏽

II दृष्टिकोन II

II दृष्टिकोन II
=========
कितीही निरभ्र असू दे आकाश
न भावणार ते कधीच मनास..
लुकलुकणारे तारे नसतील जर त्यात 
तर काय अर्थ उरतो जीवनास..??


आभाळाचंही
व्हायला हवं आकाश कधीतरी..
तरच रंगत वाढेल
सूर्य, चंद्राच्या लपंडावाची..
घ्यायला हवी
थोडी उसंत मनाने..
तीच असेल सुरवात नव्या रुजवातीची..!!

देणं
आभाळाचं असो वा आकाशाचं
घेणं मात्र आपलंच असायला हवं..
मग भरलेलं असो वा असो रितं
लेणं मनाचं शोभून दिसायला हवं..!!

आभाळ काय अन आकाश काय
एकाच मनाचे ते दोन कंगोरे
भरलेलं कधी रितं होणार
अन
रितं हे कधीतरी भरणार
इतकं मात्र निश्चित
दृष्टिकोन मनाचा दिशा तयास देणार..!!

***सुनिल पवार...

II ए ऐक ना II

(हसना मना है)
😆🤣😆🤣
II ए ऐक ना II
========

ऐक ना..
बरेच काही
तुला
सांगायचे आहे ग
पण
कळत नाही
तू ऐकणार कधी..??
मी
वाट पाहतोय
अजूनही
त्या दिवसाची
अन
विचार करतोय
च्या मारी
कानातला इयर फोन
तू काढणार तरी कधी..??
****सुनिल पवार....✍🏽🤣

|| ओझं ||

|| ओझं ||
======
पडला पाऊस
तर
निःशंक  पडू दे..
आला पूर
तर
 स्वागत होऊ दे..
वाहून गेल्या आशा,आकांक्षा
तर
विना तक्रार  वाहू दे..
तसे
दुःखाचे ओझेचं ते सारे
किमान
हलके तरी  होऊ दे..!!

***सुनिल पवार...