Thursday, 31 December 2015

|| मिटल्या पापण्यांतुनी ||

|| मिटल्या पापण्यांतुनी ||
=●=●=●=●=●=●=●=
तुझ्या घनपर्ण छायेत
घड़ीभर असा विसावतो मी
हिरव्या पानाच्या मायेत
दवबिंदु जसा समावतो मी..!!

नीरव निशेच्या कुशीत
चांदण्यात मुक्त विलासतो मी
देखोनी चंद्र नाभिचा तो
मुखचंद्रमा सुप्त अभिलाषतो मी..!!
रातराणीचा मदमस्त बहर
दरवळता धुंद नादावतो मी..
श्वास श्वासात विरुन
चैतन्य गंध जाणवतो मी..!!
ज्वर चढे रात्रीस असा
बेभान वारा जसा वाहतो मी
मिटल्या पापण्यांतुनी
स्वप्न सितारा पाहतो मी..!!
****सुनिल पवार...

II मॅसेजची खीर II

II मॅसेजची खीर II
=●=●=●=●=●=
जेथे जातो तेथे
तो त्याच्या सांगाती
मोबाईल हाती
दिसतसे..!!

किती लीन दिसे
सदा खाली मुंडी
काय बरे धुंडी
स्क्रीनवर..!!
हात जसा जोड़ी
अंगठे तो मोडी
लागलीया गोडी
चाँटिंगची..!!
सदा समाधीत
दिसतसे ध्यान
झुकलेली मान
रात दिन..!!
ऐसा तो सज्जन
मोबाईल वीर
मॅसेजची खीर
वाटतसे..!!
***सुनिल पवार...

Thursday, 24 December 2015

|| अवघाची देह ||

|| अवघाची देह ||
===========
अवघाची देह
दत्तमय व्हावा..
त्रिगुण त्रिमुर्ती
अंतरी वसावा..!!

घेवुनी जन्मले
ममतेचे सूत्र..
ब्रह्मा, विष्णु, शिव
अनुसूया पुत्र..!!
वैराग्याची मूर्ति
दिव्य देह धारी..
त्रिशूल डमरू
झोळी खांद्यावरी..!!
पुढे श्वान शोभे
मागे धेनु न्यारी..
पाषाणी बैसले
गुरु ध्यानधारी..!!
रुद्राक्षाच्या माळा
शोभे दिव्य गळा
करुणा सागर
देव भक्त भोळा..!!
ऐसे गुरु देव
दत्त दिगंबर..
कृपेची सावली
व्यापून अंबर..!!
विभूती अंगारा
तुमचा प्रसाद..
स्विकारतो देवा
द्यावा आशीर्वाद..!!
***सुनिल पवार...✍🏼

Wednesday, 23 December 2015

II खोलात की अंतात II

II खोलात की अंतात II
=●=●=●=●=●=●=●
माझ्याच वेदनेचे वादळ
उध्वस्त करते मनास माझ्या..
आवरू पाहतोय आवरे ना
आठवणीत जे वाहातंय तुझ्या..!!

आशंकांचे काळे ढग
व्यापून राहतात अंगणात माझ्या..
काहूरांचा पाऊस थमेना
आठवणीत जो बरसतोय तुझ्या..!!
अनंत प्रश्नांचे अनुत्तरीत कोंब
फुलतात नाहक अंतरात माझ्या..
किती खुडपले खुडपेंना
आठवणीत जो तो रुजतोय तुझ्या..!!
विचारांच्या झाल्या चिखलात
मी उभा असा एकांतात माझ्या..
खोलात की अंतात कळेना
आठवणीत कोण ओढतोय तुझ्या..!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
**********सुनिल पवार......

|| बोलणार नाही ||

|| बोलणार नाही ||
=●=●=●=●=●=
काहीच तसे बोलणार नाही
मी शब्द उगा तोलणार नाही..!!
नको वाजवु तू पुंगी मदारी
नाग बहिरा डोलणार नाही..!!
किती करशील वेडे बहाने
मी मन तुझे मोडणार नाही..!!
का लपवतेस भांडे सुखाचे
मी विष त्यात घोळणार नाही..!!
जाणतो मी भावना मनाच्या
उगाच त्यास टटोलणार नाही..!!
हवे कोणास दाखले कशाचे
मी संदर्भ तसे जोड़णार नाही..!!
◆◆◆◆◆◆◆◆●◆◆◆◆
******सुनिल पवार......

Friday, 18 December 2015

|| पुनश्च मी सज्ज ||

|| पुनश्च मी सज्ज ||
=●=●=●=●=●=●=
त्या शब्दांच्या चक्रव्यूहात
मी स्वतःच फसत जातो
वेदनेच्या दलदलीत धसत जातो
लढतोय जणू स्वतःशीच
अभिमन्युस घेवून पाठीवर
पुन्हा मागे न येण्यासाठी..!!


रीते करतोय शब्द भंडार
चढवून कवच कुंडल भावनांचे
नसलेल्या प्रक्तानाच्या लक्तरांचे
लढतोय कोणत्या दिव्यत्वाशी
कर्णास घेवून पाठीवर
नसलेलं औंदर्य जपण्यासाठी..!!

नीती अनीतीच्या पारड्यात
जोखतोय नात्यांचे कांगोरे
पिटतोय आशंकांचे धिंडोरे
नरो वा कुंजरोवा जपत
धर्मास घेवून पाठीवर
कुरुक्षेत्री रण जिंकण्यासाठी..!!

ही कोणती अघोरी तपस्या
शोधतेय तिमिरात भक्ष
वेधू पाहतेय आंधळे लक्ष
भळभळत्या जखमेस पूसत
अश्वत्स्थामास घेवून पाठीवर
अंधार लपेटुन घेण्यासाठी..!!

गलितगात्र जरी आयुधे
गीतेस ठेविले स्मरणात
स्पुल्लिंग भरून मनात
करून शंखनाद पुनश्च मी सज्ज
श्रीकृष्णास घेवून पाठीवर
समरांगणी लढण्यासाठी..!!
******सुनिल पवार....

Monday, 14 December 2015

|| मी मूक ||

मी मूक..
पटत नाही मनास
की कागदावर वेदना मांडावी।
म्हणूनच ठरवलंय
मार्गातल्या खुंट्यानेच जीवनास गती द्यावी।
कोणी किती मारायचे ओरखडे
भरून पापाचे घड़े।
वाळू तर निसटते हातातून
पण त्याच पंक्तित दिसतात खडे।
घायाळ मनावरचे
शोषून घेतो जो तो रक्त।
बहुतेक रक्त पिपासु दिसतात
अहिंसेचे निस्सीम भक्त।
ही कोणाची पिल्लावळ म्हणावी
जी दिखाव्याची वळवळ करतेय।
तसे देणेघेणे कोणास नाही
पण मतलबाची चळवळ दिसतेय।
मी लज्जित झालो मूक झालो
पाहुन तयांची थोर थेरे।
आता वाटतेय बंद करावी मी
माझ्याच मनाची संवेदनशील दारे।
--सुनिल पवार..

Saturday, 12 December 2015

II मुर्खांचा दरबार II

II मुर्खांचा दरबार II
=============
भासवती स्वतःस ते
बिनीचा शिलेदार..
पाहिला असाच मी
मुर्खांचा दरबार..!!

ना पेलविले कधी
यत्किंचित शब्दहार..
मिरवले गळ्यात तेच
अभिमानाचे हार..!!
दृष्टीभ्रम होता तो एक
प्रकाशाचा संचार..
अंतरी वाहतोय कुट्ट
ओसंडून अंधार..!!
घेतात तोंडसुख ते
फेकती शब्दांगार..
अभिव्यक्तीचा कोडगा
चेततो शृंगार..!!
स्वानुभव म्हणती त्यांचा
दांडगा अपार..
खाती गटांगळ्या घेत
काडीचा आधार..!!
वाटतात तयांस त्यांचेच
थोर उच्च विचार..
करू इच्छितो मी ही त्यांना
कोपरातून नमस्कार..!!
******सुनिल पवार....

Tuesday, 8 December 2015

|| कैफियत मनाची ||

|| कैफियत मनाची ||
==============
रोजच येते आठवण जरी,
ना बोलणार काही..
होवोत किती यातना मनास,
मौन खोलणार नाही..!!

त्या क्षणांच्या चकव्यात पुन्हा,
ना फसणार काही..
माझ्या मनाच्या चौकटीत,
मीच बसणार नाही..!!

लाभेना का सुख स्वर्गीय,
ना उपभोगणाऱ काही..
वाळवंटाची तृषा माझी,
थेंबाने अशी भागणार नाही..!!

असोत कितीही मतभेद मनाचे
ना भेद राहणार काही..
कळतील कधी भाव मनाचे
नाउमेद मी होणार नाही..!!
******सुनिल पवार....

Monday, 7 December 2015

|| सरिता ||

|| सरिता ||
πππππππ
दूर किती राहशील
परतून तू येशील..
आठवांच्या पावसात
तू चिंब चिंब न्हाशील..!!

फुटेल जेव्हा पालवी
तव कोरड्या मनाला..
आवेगाने दौडशील
तू सामावण्या क्षणाला..!!

तटस्थपणा माझा ग
नाही तुज जमणार..
रुक्षपणाचे सोंग तू
किती काळ धरणार..!!
सागराची आर्त गाज
ना व्यर्थ कधी जाणार..
जरी दूर सरिता तू
सागरास मिळणार..!!
****सुनिल पवार.....

|| भरला घड़ा ||

|| भरला घड़ा ||
■◆■◆■◆■◆■
काय अर्थ उरतो हो बेताल बोलण्याला..
नसे धरबंध कुठे तो त्यांच्या वागण्याला..!!
ते एकजात कर्मठ अंध सारेच धर्माचे
ना दृष्टिकोण काही त्यांच्या पाहण्याला..!!
ओकतात गरळ नित्य रसाळ वाणीतून
अमृत मानु कसे मी, त्यांच्या सांगण्याला..!!
सछिद्र रांजण एक एक सडक्या मातीचे
प्रत्येक भरला घड़ा घेतला फोडण्याला..!!
येतील रावण कैक सीता हरण्यास नित्य
प्रत्यंचा ओढली मी, ती नाभी भेदण्याला..!!
किती जन्म झाले ना कळलेच कोणाला
एक नवा आयाम मिळो त्यांच्या जगण्याला..!!
*****सुनिल पवार.......

|| तू अन मी ||

|| तू अन मी ||
=========
तू बंदिस्त सिद्धांतात
मी मुक्त आसमंतात..!!

तू प्राजक्त अंगणात
मी आसक्त सुमनात..!!

तू असते संभ्रमात
मी हरवतो प्रेमात..!!

तू मोहरते मनात
मी आतुरल्या क्षणात..!!

तू बोलतेस मौनात
मी उत्साही वदनात..!!

तू रती एक साक्षात
मी लुब्ध मदनबाणात.!!
****सुनिल पवार....

|| करणी ||

|| करणी ||
=======
करणी माणसाची ती
अन दोष देवाला
त्यांचा असतो तो धर्म
अन आमचा नावला..!!


कोण दगड म्हणतोय
कोण शिव्या देतोय
कुठले संदर्भ जोडून
मनाच्या ओव्या म्हणतोय..!!

कळत नाही त्याला
त्याचा तोल ढळतोय
दुसऱ्याच्या धर्मावर तो
आकसापोटी जळतोय..!!

सर्व धर्म समभाव
असही तोच म्हणतोय..
दुखणे मग कसले
तो कशाला कण्हतोय..!!

कसली ही मानसिकता
काय मिळवू पाहतेय..
दुहिच बीज नव्याने
मातीत रुजू पाहतेय..!!
*****सुनिल पवार.....

II आठवणीच्या पानास II

II आठवणीच्या पानास II
================
प्रत्येकाच्या मनात असतो
पाऊस दाटलेला..
आठवणीच्या पानास तोच
जलबिंदु खेटलेला..!!


आयुष्याच्या वळणावर एका
अनपेक्षित भेटलेला..
मनास उलथवणारा कधी
अलवार नटलेला..!!

अवीरत कोसळणारा जसा
इरेला पेटलेला..
मूक राहतो अवचीत तोच
हुंदका फुटलेला..!!

रेंगाळतो मन मनात तो
पाऊस निसटलेला..
पागोळ्यातुन ओघळलेला
मी ओंजळीत समेटलेला..!!
******सुनिल पवार.....

Sunday, 6 December 2015

|| एक सुर्य ||

|| एक सुर्य ||
★★★★★
जातियेतेच्या तिमिर सारा
मनमनात होता अंधार दाटला..
स्वयंप्रकाशीत एक सुर्य
अन्यायाने  पेंटून उठला...!!
दलदल होती जिकडे तिकडे
बहुजन होता गाळात रुतला..
कमळ फुलवले तयात लीलया
वंचितांस असा देव भेटला..!!
:
स्वयंप्रकाशीत एक सुर्य
अन्यायाने पेंटून उठला...!!
प्रवेश निषिद्ध होता मंदिरात
त्या देवासही निषिद्ध केला..
फेकुन वल्कले धर्माची बेगड़ी
समतेचा नवा पेहराव चढवला..!!
:
स्वयंप्रकाशीत एक सुर्य
अन्यायाने पेंटून उठला...!!
बामण होता डुबक्या मारत
पाण्यास दलित होता मुकला..
पेटविले पाणी चवदार झाले
धर्माभिमानी आपासूक् झुकला..!!
:
स्वयंप्रकाशीत एक सुर्य
अन्यायाने पेंटून उठला...!!
संविधान रूपी ग्रंथ लिहला
जातीयतेचा तिमिर मिटला..
एक नवा इतिहास घडला
समतेने सारा देश नटला..!!
:
स्वयंप्रकाशीत एक सुर्य
अन्यायाने पेंटून उठला...!!
🙏महामानवास विनम्र अभिवादन🙏
*****सुनिल पवार.....

Tuesday, 1 December 2015

|| अंधश्रद्धेचा पेढ़ा ||

|| अंधश्रद्धेचा पेढ़ा ||
=============
काय तर म्हणे लोकहो देव बाटला..
अंधश्रद्धेचा पेढ़ा त्याने लोकांमधे वाटला..!!

स्त्रीने स्पर्शिला म्हणत न्हाऊ माखु घातला..
थारा कसा मिळतो अशा अनिष्ट कृत्याला..!!

कोसायचे ना नरा तुझ्याही नापाक जन्माला..
तिच्याच उदरातून तू जन्म जो घेतला..!!

आदि शक्ती म्हणत तू बसतोस ना पूजेला..
अर्थ काय उरतो तुझ्या दुटप्पी वागण्याला..!!

पुरुषी अहंकाराची झापड़ तुझ्या डोळ्याला..
घाण्याचा बैल जसा सजतोय मात्र पोळ्याला..!!

देव भक्तीचा भुकेला नसे थारा दूजेपणाला..
उन्मत्त तुझ्या कृत्याने तो देव असेल लाजला..!!

*****सुनिल पवार.....