Showing posts with label सुधाकारी काव्य. Show all posts
Showing posts with label सुधाकारी काव्य. Show all posts

Monday, 7 August 2017

|| धागा विश्वासाचा ||

|| धागा विश्वासाचा ||
=============
श्रावणाचा मास | माहेरची आस
भेटण्या भावास | धावे मन..!!

राखीचे बंधन | पुनवेचा सण
नारळ अर्पण | सागरास..!!

औक्षण सिंधूचे | औक्षण भावाचे
नाते विश्वासाचे | दृढ होई..!!

रेशमी धाग्यात | बद्ध भाऊराया
रक्षण कराया | सिद्ध होई..!!

अर्पिता नारळ | शांत होई जळ
मिटे खळखळ | सागराची..!!

प्रेमाचे प्रतीक | भाऊ रत्नाकर
मायेची घागर | बहिणाई..!!

धागा रेशमाचा | अतूट प्रेमाचा
धागा विश्वासाचा | बांधू सारे..!!
****सुनिल पवार...✍🏼

Friday, 22 April 2016

|| मी पाहिलयं ||

|| मी पाहिलयं ||
=◆=◆=◆=◆=◆=
मी पाहिलयं माणसांना
वाऱ्यावर फिरताना..
दिशाहीन मज करून
दिशा दर्शक बनताना..!!

मी पाहिलयं त्या आप्तांना
साखरेचं घोळताना..
रक्ताच्या नात्यासही
तराजूत तोलताना..!!
मी पाहिलयं मित्रांना
मैत्रीस असे जागताना..
हाताचं राखून सारं
प्रत्येकाशी वागताना..!!
मी पाहिलयं त्या प्रेमाला
क्षिताजात रंगताना..
सरड्याच्या कातडीचे
रंग तेच भंगताना..!!
मी पाहिलयं आरशाला
नित्य नव्याने नटताना..
भरल्या विश्वासाचा पारा
अकस्मात तड़कताना..!!
🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार....

Thursday, 31 December 2015

II मॅसेजची खीर II

II मॅसेजची खीर II
=●=●=●=●=●=
जेथे जातो तेथे
तो त्याच्या सांगाती
मोबाईल हाती
दिसतसे..!!

किती लीन दिसे
सदा खाली मुंडी
काय बरे धुंडी
स्क्रीनवर..!!
हात जसा जोड़ी
अंगठे तो मोडी
लागलीया गोडी
चाँटिंगची..!!
सदा समाधीत
दिसतसे ध्यान
झुकलेली मान
रात दिन..!!
ऐसा तो सज्जन
मोबाईल वीर
मॅसेजची खीर
वाटतसे..!!
***सुनिल पवार...

Monday, 3 August 2015

|| मी स्वच्छंद ||

|| मी स्वच्छंद ||
==========
पटलं राहावे
नाही तर जावे
कशास ते हवे
वाद फूंका..!!


नको ते नियम
नाही जे कायम
नकोच तो यम
एडमिन..!!

होतात हो चुका
माणसाच्या लेका
कशा मग हेका
धरावा तो..!!

नको मज बंध
मन हे स्वच्छंद
मिळे जो आनंद
घेत जातो..!!
****सुनिल पवार...

Wednesday, 8 July 2015

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (५)

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (५)
**************************
 २५)
पाळाल मनात
यशाची आसक्ती
प्रयानांची सक्ती
असावीच..!!
*****************
२६)
काय कमावले
काय गमावले
मोजमाप झाले
यशाचे ते..!!
×××××××××××
२७)
असावे मन ते
समाधानी नित्य
जाणून घ्या सत्य
यशाचे ते..!!
××××××××××
२८)
यशाचे निकष
लावावे ते कसे
मन माझे फसे
स्तुतीत का..!!
××××××××××
२९)
असतो का तोच
यशवंत एक
क्षेत्र ती अनेक
संधीतुनी..!!
××××××××××
३०)
नको हाराकिरी
यश मिळवण्या
मिळेल साधण्या
पुन्हा संधी..!!
×××××××××सुनिल पवार.........

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (४)

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (४)
*****************************
१९)
रुजव मनात
प्रयत्नाचे झाड
यश फळ गोड
लागे त्यास..!!
****************
२०)
नको विसंवाद
जग सकारात
यश जीवनात
हमखास..!!
*****************
२१)
यश कृष्णकृत्यी
औट घटकेचे
जीवन काट्याचे
बाकी जान..!!
******************
२२)
यशाच्या वाट्यात
भागीदार सारे
मतलबी वारे
माणसात..!!
*****************
२३)
पचवता विष
अपयशाचे ते
दालन खुलते
यशाचे ते..!!
******************
२४)
सोडता आळस
मिळवाल यश
होईल ते वश
प्रयत्नाने..!!
******************सुनिल पवार.........

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (३)

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (३)
*****************************
१३)
होवू द्या सुरेल
जीवनाचे गाणे
यशाचे तराणे
साधनेने..!!
***************
१४)
लढण्याआधी का
हरला असा तू
अपयशास तू
वरले का..!!
****************
१५)
अचूक निर्णय
नेतो यशाकडे
कशास साकडे
देवापाशी..!!
*************
१६)
नसावी मस्तकी
यशाची हवा ती
जपावीत नाती
प्रत्येकाने..!!
***************
१७)
नशा ही यशाची
गर्वास पाळते
मनास जाळते
निष्कारण..!!
***************
१८)
जपून तू टाक
प्रथम पाऊल
लागेल चाहूल
यशाची ती..!!
****************सुनिल पवार.....


II यशापयश सुधाकरी षष्ठक II (2)

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (2)
*****************************
७)
व्यर्थ होती भीती
अपयशाची ती
झाले प्रयत्नांती
यश खुले..!!
**************
८)
मार्ग तो यशाचा
खडतर जरी
संयम तू उरी
राख जरा..!!
***************
९)
खचू नको मना
अपयशाने तू
बाधा आणी किंतु
यशामध्ये..!!
***************
१०)
यशापयशाचा
करू नको बाऊ
नसे ते टिकाऊ
जीवनात..!!
***************
११)
होईल सुकर
मार्ग तो यशाचा
काटा आळसाचा
दूर सार..!!
***************
१२)
प्रयत्नांचे बळ
पंखात भरावे
नभी विहारावे
यशाच्या त्या..!!
****************सुनिल पवार.........

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (१)

II यशापयश सुधाकरी षष्ठक II (१)
*************************
 १)
खचु नको तू
येता अपयश
मिळेल ते यश
प्रयत्नाने..!!
************
२)
प्रयत्नाची जोड
करील सुकर
गाठण्या शिखर
यशाचे ते..!!
*************
३)
अपयशा मागे
यश लपलेले
मज दिसलेले
प्रयत्नाने..!!
*************
४)
प्रयत्नाची कास
मनात विश्वास
गाठण्या नभास
योशोदायी..!!
*************
५)
निश्चित मनास
ना भीती कशाची
कास प्रयत्नाची
यश देई..!!
**************
६)
लंगडी सबब
झाकण्या नको ती
यशास तुझ्या ती
दूर नेई..!!
**************सुनिल पवार.....


Monday, 13 April 2015

II विठू माउली II

II विठू माउली II
****************
काया वाचे तन
पांडुरंगी ध्यान
द्यावे वरदान
मजलागी..!!

तूच माझी तृष्णा
तूच माझी भूक..
आहे सर्व सुख
भजनात..!!
अंतरी वसावा
विठू पांडुरंग
घड़ो नित्य संग
पांडुरंगा..!!
विसर न व्हावा
तुझा कधी देवा..
देह हां पडावा
चरणाशी..!!
******सुनील पवार...