Tuesday, 29 January 2019

फुल्ली गोळा...❌⭕

फुल्ली गोळा...
फुल्ली गोळ्याच्या खेळाप्रमाणेच
तू आजवर खेळ खेळत आली..
मी मांडलेल्या हृदयाच्याशेजारी
तू फुल्ली आपली मारत आली..!!
एकसंध रेषांचा मेळ सांधण्यास
मी नेहमीच धडपडत राहिलो..
तुझ्या इच्छेचा मान राखता
मी माझंच मन मोडत आलो..!!
पेन एकच होतं दोघात
तरीही एकमत कधी झालं नाही..
तू फुल्लीवर अडून बसलीस
तुला गोळा कधी समजला नाही..!!
आता मलाच वाटतंय प्रकर्षाने
की हिसकावू घ्यावी फुल्ली तुझ्याकडून..
आणि मारत सुटावी ती कागदभर
अन् टाकावा हा खेळ समूळ मोडून..!!
पण जमत नाही मला अजूनही तसे
आणि खेळात मन रमतही नाही..
भिजून गेलाय कागद, फाटत आलाय
आता फुल्ली काय, गोळाही दिसत नाही..!!
***सुनिल पवार....✍🏼

डायरी..

डायरी...📚
नव्याच्या मोहापायी
तू जुनी डायरी फेकून देशील
पण सावधान
कदाचित पदरी निराशा पडेल
कारण नवी अजून कोरीच आहे
आणि जुन्यात बरेच अनुभव आहेत।
नव्याला वेळ लागेल भरायला
तसेच तुला ती कळायला
आता कुठे तुझी सुरवात होतेय
अजून बऱ्याच गोष्टी अंधारात आहेत
त्या सुद्धा हव्यात उजेडात यायला
तेव्हा कुठे काही अक्षरे उमटतील
पण ती तितकी प्रभावी नसतील
कदाचित त्यावेळी तुला
तीच जुनी पाने पुन्हा आठवतील।
--सुनिल पवार..✍️

कधी कधी..

कधी कधी..
प्रश्न साधेच असतात
अन् उत्तरेही सोपी असतात..
तरी ती देताना मात्र 
फारच कठीण भासतात..!!
प्रश्न बोलते करू पाहतात
अन् उत्तरं मौन राहतात..
शब्दांच्या या गूढ वागण्यात
मग अर्थाचे अनर्थ होतात..!!
***सुनिल पवार...✍️
🌞सुप्रभात❇️शुभ सकाळ🌞

धोरण...📚

धोरण...📚
धरणीच्या उदरातून
हे असं कोणतं रोपटं उगवलंय
की लोक हिरीरीने 
त्यास खतपाणी घालत आहेत
अंजारताहेत आणि गोंजारत आहेत..!!
बहुतेक त्या रोपट्याची
अजून जात निश्चित झाली नाही
म्हणूनच लोक त्यावरून भांडत आहेत..
कमी अधिक प्रमाणात पाणी सांडत आहेत
आणि पुन्हा पुन्हा माती उकरून काढत आहेत..!!
प्रत्येकजण खेचू पाहत आहे
आपल्या जातीत त्या रोपट्यास
पण त्यांना माहीत नसावे बहुतेक
उद्या हेच रोपटे
झाड बनून कसली फळं देणार आहे?
रसाळ गोमटी?
की विषारी निपजणार आहेत?
की मातीत जन्मलेल्या ह्या रोपट्यास
खतपाण्याचा अतिरेक
पुन्हा मातीत मिसळणार आहे..?
रोपट्याचा बाबतीत
माणसाचं नेमकं धोरण तरी काय आहे..??
***सुनिल पवार...✍️

बाप…

बाप…

आईवर लिहत राहिलो आयुष्यभर
पण बाप बिचारा उपेक्षित राहिला..
भविष्यासाठी खस्ता काढता
त्याचा जन्म प्रतीक्षेत गेला..!!
तो स्वतः तळपता सूर्य झाला
ही सृष्टी खरी त्यानेच फुलवली..
परी भावली आम्हास सावली
अन् बाप न झाला कधीच माऊली..!!
तो बरसणारा प्रसंगी पाऊस झाला
पण एकही टिपूस ना डोळ्यात दिसला..
आम्हा वाटली ती लोभस वसुंधरा
अन् बापावर शिक्का अवकाळी बसला..!!
त्याला ना मिळाली उपाधी कसली
तरी न त्याला खंत कसली..
आम्ही मातेची पावले वंदली
पण त्याने आपली चप्पल झिजवली..!!
त्याच फाटक्या चपलेतून पाहता
नजरेपलीकडचे खरे जग दिसते..
वरवर भासणाऱ्या ओंडक्याच्या देही
काळीज सुगंधी चंदनाचे वसते..!!
तो झाला कधी वारा, भक्कम निवारा
त्यानेही सोसल्या आयुष्यभर कळा..
पण नऊ महिन्याच्या लेखाजोख्यात
बापाचा तक्ता कोराच राहिला..
======बापाचा तक्ता कोराच राहिला..!!
***सुनिल पवार…✍️

मौसम...

मौसम...
जरा हौले हौले
तू चल री हवा..
ऐसी जल्दी में
तू चली कहाँ..
ठहर जा जरा
पल दो पल यहां..
कितना हसीन है
यह मौसम जवाँ..!!
***सुनिल पवार...✍️

ही वेळ....⏳

ही वेळ....
ही वेळ
म्हणजे क्षणाचा खेळ
समजले तर
तू जमवून घे मेळ..!!
आज तुझी
तर उद्या त्याची होईल..
ठेव स्मरणात
जळ वाहून जाईल..!!
***सुनिल पवार...✍️

चला येताय का….

चला येताय का..

कोणी पेटवला हा वणवा
कोण विझवेल आता त्याला..?
राळ उडवण्याचा नादात
हेच समजले ना कोणाला..!!

भावनांची कोरडी लाकडे
जो उठला तो घेऊन आला..
पेटलेल्या शब्द पालित्यांचे
योगदानही देऊन गेला..!!

आपापल्या परीने प्रत्येकाने
त्याचा केवळ उहापोह केला..
आरोप प्रत्यारोपांचे इंधन सांडले
अन् पराकोटीचा दाह झाला..!!

कुठे माफीनाम्याचे पाणी
खलित्यातून कोण टाकून गेला..
तर बहिष्काराची माती त्यावर
कोणी सहजच ओढून गेला..!!

तरी धगधतोय हा वणवा
जणू जागतोय आपल्या ब्रिदाला..
अहो कबड्डीचा खेळ रंगलाय
चला येताय का संमेलनाला..!!
--सुनिल पवार..✍️

हरकत नाही..

हरकत नाही..
बोलायला हरकत नाही
पण निव्वळ
औपचारिकता म्हणून 
तू बोलू नको..
हृदयातून निघालेल्या
माझ्या शब्दांना
तू केवळ
मस्तकातून तोलू नको..!!
हा मेळ आहे
भावनांचा
तू केवळ त्याला
तुझा खेळ समजू नको..
आज तुझी आहे
तर उद्या माझी असेल
पण येणारच नाही
तशी वेळ
असे तू समजू नको..!!

आरक्त चंद्र...

आरक्त चंद्र..

ती म्हणाली,
बघ ना चंद्र ढगांनी झाकोळला..
मी म्हणालो,
ही चंद्रमुखी पाहून तोही लाजला..!!

ती म्हणाली,
आता काय म्हणावे या दृष्टिभ्रमाला..
मी म्हणालो,
अगं वेडे, प्रेम तर म्हणतात याला..!!

आता ती लाजली अन् मौन झाली,
ओंजळीत झाकून घेतले मुखाला..
मी म्हणालो,
ये बघ ना आरक्त चंद्र किती मस्त तेजाळला..!!
--सुनिल पवार..✍️

मला पतंग व्हायचं आहे..

मला पतंग व्हायचं आहे..
तू म्हणालीस,
तुला पतंग व्हायचं आहे
मनाच्या आकाशात मुक्त विहारायचं आहे..
पण तुझा पतंग तर त्यांनी केव्हाच केलाय
आणि दोरही त्यांच्याच हातात आहे..!!
तुला ते उंच उडवतील
पण वाऱ्याच्या हवाली करतील
त्यांच्या इशाऱ्यावरच तुला वळावे लागेल..
तुझ्यातीलच कोणीतरी कापेल तुझा मांजा
अन् उडण्याच्या तुझ्या स्वप्नांना
क्षणात सुरुंग लागेल..
कंन्नीच्या बेडीचा अर्थ तेव्हा तुला कळेल..!!
म्हणूनच
तू पतंग होऊ नको
कोणाच्या हातातील बाहुली बनू नको..
तुला बनायचंच असेल काही
तर तू स्वतः स्वयंसिद्ध हो
लोक खो घालतील पण तू लक्ष देऊ नको
जरा स्पष्टच बोलतोय तू रागावू नको..!!
***सुनिल पवार...✍️

दोर तू पतंग मी...

दोर तू पतंग मी...
मज भावतो तुझा संग
तू दोर मी पतंग..
तुजसवेच खुलतो 
निल नाभचा रंग..!!
विहारता गगनात
मनी उठतात तरंग..
तू होतोस ढाल
मी खेळते जंग..!!
लावू नकोस पेच
स्वप्न होईल भंग..
उडून जातील रंग
सुना पडेल भांग..!!
अवघाची हा प्रपंच
नांदो सदा अभंग..
दोन जीव परी
एक व्हावे अंग..!!
**सुनिल पवार..✍️

का...

का...
का करतेस निराश
दाखवून मज आस..
तोडून अबोल पाश
तू बोल दिलखुलास..!!
का बदलते विधान
वळवून आपली मान..
अधरांच्या पाकळ्यांतून
उमलू दे हसू छान..!!
का छळतेस जीवास
फुंकून त्यात प्राण..
सोडून नयन बाण
कर पुन्हा गं निष्प्राण..!!
***सुनिल पवार...✍️

भान..

भान..
जर जाणच नसेल
तर भान राखण्यात काय अर्थ..
चाळणीत पाणी भरण्याचे
खेळ सारे दिसतात व्यर्थ..!!
खुंटलेल्या वाहण्याला
नदी कोणी म्हणत नाही..
अन् डबक्याच्या आटण्याने
दुःखात कोणी कण्हत नाही..!!
नुसतंच खिडकीत बसून
फारतर न्याहाळता येईल केवळ..
पण एकरूपता अनुभवण्यासाठी
जावे लागते पावसाजवळ..!!
दाह कळण्यासाठी
सूर्यास धारण करावे लागते..
तसे शीतलता जाणण्यासाठी
चांदण्यात थोडे भिजावे लागते..!!
मानण्यावर सारं असतं
तर असमाधान कुठे दिसलं नसतं..
खर तर भावनांचं सर्व समाधान
हे कृतीशिवाय विफल असतं..!!
***सुनिल पवार...✍️

कवडसे...

कवडसे...
अंधारल्या हातांनीच असे
कितीतरी वेचले कवडसे..
तरीही वाटत नाही मनास
तिमिराचे साम्राज्य बदलेलसे..!!
कधीपासून लागलेय ग्रहण
राहू केतू कुंडलीतून सुटत नाही..
काजव्यांचा नुसताच हैदोस
अंधार फिटता फिटत नाही..!!
वाटले वाढेल कलेकलेने चंद्र
अन् होईल पुनव प्रकाशित..
पण अवसेच्या दाट पगड्यात
सबुरी बनली केवळ सुभाषित..!!
बसवून पाहिले चारही दिशेला
मी स्वच्छ परिवर्तित आरसे..
तरीही नुसतेच डोळे दिपले
पण बदलले नाही काही फारसे..!!
कितीही हलवा दगड गोटे
पाझर प्रकाशा फुटणार नाही..
शेवटी स्वतःच जळल्याशिवाय
अंधार फिटता फिटणार नाही..!!
***सुनिल पवार...✍️

काय आहे चेहऱ्यात...

काय आहे चेहऱ्यात..

तू विचारले म्हणून सांगतो
की काय आहे चेहऱ्यात..
एक पारद आरसा
लपलेला दिसतो त्यात..!!

चेहऱ्याचा चेहरा
काळा की गोरा
अनेक हावभाव
अंतरमनाचा ठाव
दिसून येतो चेहऱ्यात..!!

सुखामागचे दुःख
अन् दुःखामागचे सुख
अनामिक भूक
मनाची रुखरुख
बरोबर की चूक
दिसून येते चेहऱ्यात..!!

मौनाचे बोल
प्रेम प्रतारणेचा झोल
उथळ की खोल
अनमोल की कवडीमोल
दिसून येते डोळ्यात
सारेच काही असते चेहऱ्यात..!!
***सुनिल पवार...✍️