Tuesday, 29 January 2019

बाप…

बाप…

आईवर लिहत राहिलो आयुष्यभर
पण बाप बिचारा उपेक्षित राहिला..
भविष्यासाठी खस्ता काढता
त्याचा जन्म प्रतीक्षेत गेला..!!
तो स्वतः तळपता सूर्य झाला
ही सृष्टी खरी त्यानेच फुलवली..
परी भावली आम्हास सावली
अन् बाप न झाला कधीच माऊली..!!
तो बरसणारा प्रसंगी पाऊस झाला
पण एकही टिपूस ना डोळ्यात दिसला..
आम्हा वाटली ती लोभस वसुंधरा
अन् बापावर शिक्का अवकाळी बसला..!!
त्याला ना मिळाली उपाधी कसली
तरी न त्याला खंत कसली..
आम्ही मातेची पावले वंदली
पण त्याने आपली चप्पल झिजवली..!!
त्याच फाटक्या चपलेतून पाहता
नजरेपलीकडचे खरे जग दिसते..
वरवर भासणाऱ्या ओंडक्याच्या देही
काळीज सुगंधी चंदनाचे वसते..!!
तो झाला कधी वारा, भक्कम निवारा
त्यानेही सोसल्या आयुष्यभर कळा..
पण नऊ महिन्याच्या लेखाजोख्यात
बापाचा तक्ता कोराच राहिला..
======बापाचा तक्ता कोराच राहिला..!!
***सुनिल पवार…✍️

No comments:

Post a Comment