Tuesday, 29 January 2019

धोरण...📚

धोरण...📚
धरणीच्या उदरातून
हे असं कोणतं रोपटं उगवलंय
की लोक हिरीरीने 
त्यास खतपाणी घालत आहेत
अंजारताहेत आणि गोंजारत आहेत..!!
बहुतेक त्या रोपट्याची
अजून जात निश्चित झाली नाही
म्हणूनच लोक त्यावरून भांडत आहेत..
कमी अधिक प्रमाणात पाणी सांडत आहेत
आणि पुन्हा पुन्हा माती उकरून काढत आहेत..!!
प्रत्येकजण खेचू पाहत आहे
आपल्या जातीत त्या रोपट्यास
पण त्यांना माहीत नसावे बहुतेक
उद्या हेच रोपटे
झाड बनून कसली फळं देणार आहे?
रसाळ गोमटी?
की विषारी निपजणार आहेत?
की मातीत जन्मलेल्या ह्या रोपट्यास
खतपाण्याचा अतिरेक
पुन्हा मातीत मिसळणार आहे..?
रोपट्याचा बाबतीत
माणसाचं नेमकं धोरण तरी काय आहे..??
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment