Friday, 29 April 2016

|| सैराटी खैराट ||

|| सैराटी खैराट ||
=◆=◆=◆=◆=◆=
बहरलायं रानावनात
मुक्त सैराटी खैराट..
लुसलुसीत पानांचा
सुप्त काटेरी थरथराट..!!


टपलेत ते ठेकेदार
अलगद कापाया मान..
मनाच्या गाभाऱ्यात
कसले हे थैमान..!!

रसरसल्या भट्टयाची
आच अशी ओंडक्यात..
रंगलेल्या काताचा
हुंदका भरून त्यात..!!

चघळतोय समाज
चवीने मानाचा विडा..
रंगल्या मुखाने गातोय
कवने सैराटी पीड़ा..!!

वस्ती पाड्यावर झाला
असा सैराटी शिरकाव..
रुतलेल्या काटयास मना
तूच दूर भिरकाव..!!
****सुनिल पवार....

|| शाईचा पदन्यास ||

|| शाईचा पदन्यास ||
=============
आठवतात का
त्या बालपणीच्या चुका
त्या चुकलेल्या मात्रा
त्या वेलांटया, तो काना..
आईने बाबांनी
हात धरून दिलेले धड़े
अन
करुन दिलेल्या सुधारणा..!!

गिरवणं पाटीवर होते
मात्र
मनात ठसले जात होते..
पाण्याच्या एका थेंबात
चुकीचे फ़ुसले जात होते..!!
पुढे पाटी सरली
पेन्सिल वही आली
चुका खोडायला
खोडरबराची जंत्री
लाभली होती..
कधी लीलया खोडता आली
कधी पानंच फाटली होती..!!
पेन्सिलही नंतर मागे सरली
पानाच्या दिमतीला पेन आले..
चुकांचे दिसणे तितकेच ठळक झाले
खोडण्यास त्या रबरासही ना जमले..!!
आतासा
मी घेतोय आधार
त्या पांढऱ्या शाईचा
चुका लपविण्यास..
तरीही कळतात जगास
त्या चुका
दर्शवितो ठळकपणे उमटणारा
तो पांढऱ्या शाईचा
पदन्यास..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
****सुनिल पवार....

|| प्रीत पतंगा ||

|| प्रीत पतंगा ||
==========
दिव्याप्रती पतंगाची
प्रीत ही आगळी..
झेप घेई पतंग
दिवा पंख जाळी..!!

यातनांचे घर जरी
प्रीत ही जगावेगळी
समर्पणातले प्रेम
सिद्ध करी वेळोवेळी..!!
****सुनिल पवार...

Tuesday, 26 April 2016

|| पेन ||

|| पेन ||
=====
मी जपून ठेवलेत
ते जुने पेन
मनाच्या कप्प्यात..
आपलेसे वाटणारे
ते फाउंटेन पेन
बॉल पेन
नटत होते
सजत होते
रुबाबात खिशात..!!

गळायची कधी शाई
मी निब बदलून
वापरत होतो
संपली जरी रिफिल
बदलून
पेन तोच ठेवत होतो..!!
किती आपुलकी
होती त्या पेनात..
तीच चमक
तोच स्नेह
भरून
प्रत्येक मनात..!!
पण काळ बदलला
तसे पेनही बदलले..
उतरली त्यांची
किंमत अन
बंद झाले कायमचे
होते कधी मी
सहज खोललेले..!!
वाटतोय वहीलाही
नकोसा झालाय
आता
पेनाचा सहवास..
मनाच्या कोरडेपणावर
शब्दांचा अट्टाहास..!!
आता तर
वापरा आणि फेका
ही वृत्ती
अधिक बोकाळली..
पेनाची ती दिलदार वृत्ती
काळाच्या ओघात
नकळत झाकोळली..!!
🙏🌹🙏🌹🙏
****सुनिल पवार....

|| ह्या देशात ||

|| ह्या देशात ||
=◆=◆=◆=◆=
ह्या देशात
निरर्थक मुद्दे
असे
ऐरणीवर येतात..
अन वास्तविक
समस्या मात्र
वाटते
निरर्थक ठरतात..!!

पाणी टंचाईने
देशास ग्रासलय
हे कोणाच्या
गावीच नाय..
आमचा तरुण
बिसलेरी पित
आईपीएल
बघण्यात रमलाय..!!
लेक जळतेय
सुन सासुवास
सोसतेय
घरा घरात
माय अश्रु ढाळतेय..
अन आमच्या
मुक्त तरुणीस
मात्र हाजीअली
शनी चौथरा
महत्वपूर्ण
वाटू लागलाय..!!
उभा गाव जळतोय
दुष्काळी झळांनी
वस्ती स्थलांतरित
परागंदा झाली..
अन आमच्या
बातमीदाराची गाडी
TRP च्या
कुरुक्षेत्री
सिनेमेवाल्यांच्या
लफडयात अडली..!!
कुठला कोण
कन्हैयालाल
भाव खाऊन
जातोय
अफजलगुरु
दिना सोबत
महापुरुषांना
पूजतोय..
अन आमचा
विद्यार्थी युवक
त्या मागंन
मेंढरावानी पळतोय
टाळ्या पिटत
चकाट्या पिटतोय..!!
आमचा पुढारीही
सगळ्याच आघाड्यावर
लढताना दिसतोय..
सत्ताधारी विरोधकांना
अन विरोधक
सत्ताधारींना नडतोय..
गरीब हतबल
परिस्थितीशी झगड़तोय
अन समस्यांचा मुद्दा
पुन्हा पुन्हा
ऐरणीवर येतोय..!!
***सुनिल पवार....

|| अश्रुंच्या पुढे ||

|| अश्रुंच्या पुढे ||
==========
अश्रूंच्या पुढे
मनाचे बांध असतात..
परकीयांचे घाव
ते लीलया पेलतात..
आप्तांच्या घावाने मात्र
पुरते कोलमडतात..
अश्रुंचे पाट मग
नकळत वाहू लागतात..!!
****सुनिल पवार...

|| यादे ||

|| यादे ||
======
ना छुटेगा कभी
यादो का दामन..
वक्त चाहे करे
कितने भी सितम..
रहना दूर चाहो
ना कोई गम..
यादोमे अक्सर
रहोगे सनम..!!
***सुनिल पवार....

|| तुझ्या आठवणीत ||

|| तुझ्या आठवणीत ||
=◆=◆=◆=◆=◆=◆=💦
तुझ्या आठवणीत
दिवस सारा गेला..
अंधार दाटे मनात
अन...
रात्रीचा पसारा झाला..!!

जीव वेडा पिसा
ना भूक ना तहान त्याला..
वाटेवरच्या डोळ्यांना
नित्याचा नजारा झाला..!!
आशंकेच्या वादळाचा
मनी संचार झाला..
लाटेवर लाट थड़कते
अन..
उध्वस्त किनारा झाला..!!
****सुनिल पवार.....💦

Friday, 22 April 2016

II अंजनी पुत्र II

|| हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ||
==========================
अंजनीच्या पुत्रा केसरी नंदना..
भक्त तुझा भोळा करितो वंदना..!!
परम प्रतापी बाल ब्रह्मचारी..
बुद्धिवंत कपी रुद्र अवतारी..!!
दिव्य बाललीला खोडकर भारी..
सूर्याला ग्रासाया उड्डाण तू करी..!!
श्रीराम नामाचा होता साक्षात्कार..
शोधशी सीतेस लांघून सागर..!!
गर्वास हरशी जाळुनीया लंका..
त्रैलोकी गाजतो मारुतीचा डंका..!!
द्रोणागिरी हाती घेऊनिया येशी..
मूर्च्छित लक्ष्मणा संजीवनी देशी..!!
शूद्र तुला मोती कळले जगाला..
चिरुनिया छाती दविले रामाला..!!
रामे आयुसाठी सेंदूर माखला..
वंदन तुझिया भक्तीच्या शक्तीला..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| मी पाहिलयं ||

|| मी पाहिलयं ||
=◆=◆=◆=◆=◆=
मी पाहिलयं माणसांना
वाऱ्यावर फिरताना..
दिशाहीन मज करून
दिशा दर्शक बनताना..!!

मी पाहिलयं त्या आप्तांना
साखरेचं घोळताना..
रक्ताच्या नात्यासही
तराजूत तोलताना..!!
मी पाहिलयं मित्रांना
मैत्रीस असे जागताना..
हाताचं राखून सारं
प्रत्येकाशी वागताना..!!
मी पाहिलयं त्या प्रेमाला
क्षिताजात रंगताना..
सरड्याच्या कातडीचे
रंग तेच भंगताना..!!
मी पाहिलयं आरशाला
नित्य नव्याने नटताना..
भरल्या विश्वासाचा पारा
अकस्मात तड़कताना..!!
🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार....

|| ग्रुपगिरी ||

|| ग्रुपगिरी ||
=◆=◆=◆=
एक एक ग्रुप पण काय
भन्नाट असतात राव..
काकुळतीस येतोय जीव
म्हणावसं वाटतंय..
देवा आता धाव..!!

काव्यात्मक ज्याचे नाव
त्याचे वर्मावर घाव..
गाढवाच्या डोइवरचे
देवा शिंग मला दाव..!!
विचारांच्या त्या मळयात
असतो विचारांशी बेबनाव..
पोराटोरांच ठीक हाय
देवा तुम्ही भी खाताय भाव..!!
कळेना कोणास कसं
कुठं काय बोलावं..
किती खाजवाल हो पाठ
देवा मौन आता खोलावं..!!
कोणाच्या रचनेवर पहा
कोण मारतयं ताव..
विचारू नका कोणाच नाव
देवा करा की मज्जाव..!!
वाईट वाटतंय ह्याचाच देवा
ते तुमच्या गावीही नसावं..
म्हणणं माझ इतकंच
ते आपल्या कानी घुसावं..!!
😄◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆😄
*****सुनिल पवार...

:::||अबोल बोल||:::

:::||अबोल बोल||:::
=◆=◆=◆=◆=◆=◆=
भावते मज..
तुझे अबोल बोलणे..
न बोलताच..
सारे कथन करणे..
नयन शब्दानी.
लीलया खेळणे..
शब्दंशब्द..
हृदयावर कोरणे..!!
***सुनिल पवार....

Tuesday, 19 April 2016

|| चैत्र पालवी ||

|| चैत्र पालवी ||
=◆=◆=◆=
सूर्याची लाली
आली गुलमोहरा गाली..
दिली चैत्राने हाळी
अन् तिची आठवण आली..!!


कोकिळेस कंठाची
सुरेल उपरती झाली..
गोड़ गातसे गाणी
अन् तिची आठवण आली..!!

कासावल्या जीवाची
लाही लाही झाली..
झुळूक मात्रे सुखावली
अन् तिची आठवण आली..!!

भेगाळली भुई
विहीर खोल आटली..
पाऊलवाट हिरवळ ल्याली
अन् तिची आठवण आली..!!
****सुनिल पवार.....

Monday, 18 April 2016

|| गच्चीतल्या बांधावरून ||

|| गच्चीतल्या बांधावरून ||
=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
मलाही वाटू लागलं होतं
मातीवर लोळयला पाहिजे..
माजलेल्या त्या पिकातून
हेटाळणीच तृण खुडायला पाहिजे..!!


पण
पाय ठेवायला जागा नाही
जमिनीच्या तर पत्ता नाही..
सीमेंटच्या ह्या जंगलात
मातीची कुठे सत्ता नाही..!!

तरीही चालवलीय मशागत
जिद्दीने शिकतोय कुंडीतले तंत्र..
मातीवीना शेतीच नवं
दालन खोललयं मी स्वतंत्र..!!

पाहतोय मीही आता गर्वाने
फुललेलं माझं बोंसाय शेत..
गच्चीच्या बांधावरून न्याहळतो
आखतो मनात स्वप्निल बेत..!!

मारा कितीही गमज्या तुम्ही
शहरींना मातीचं काही ज्ञात नाही
मी ही म्हणेन कुस्तीत त्यांना
हिंमत असेल जर तन मनात
तर मळा फुलल्या बिगर राहत नाही..!!
*****सुनिल पवार....🌿

|| रे मना ||

|| रे मना ||
=======
कोणाचे विचार
कोण कुठे घुसवतो..
रे मना तू का रे असा
स्वतःलाच फसवतो..!!


झकले असशील डोळे
कदाचित,
मांजराने दूध पिताना..
जराश्या आहटाने दचकते मन
पाहिलयं जगाने त्यास,
धूम ठोकताना..!!

उपेक्षित निवडूंगही बांधावरून
रक्षण करते
त्या कोवळ्या काळींचा..
किती वाढवशील रे मना
तू आकड़ा असा,
निष्पाप बळीचा..!!

कधी कळणार रे तुला
भकास होतोय विकास
सृजन मनाचा..
खच पडतोय जागो जागी
त्याच विखुरल्या मनाचा..!!

किती करशील अनादर मना
तू कोणाच्या पदरा आडून..
शीखंडीची गणना नाही वीरात
बघ एकदा पुन्हा,
सारे संदर्भ पडताळून..!!
🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार...

Friday, 15 April 2016

|| तुझे गोड नाम ||



|| गोड तुझे नाम ||
==========
गोड तुझे नाम प्रभु
ठेवितो मुखात..
एक तूच श्री राम
वसे अंतरात..!!
तूच माझा मुक्ती दाता
तूच निजधाम..
मोक्ष मुक्ती लाभे जिवा
जपता श्री राम..!!
कौसल्येचा पुत्र राम
दशरथाचा प्राण..
मातृ पितृ वचनी ऐसा
पुत्र तू महान..!!
ताडन करण्या असुरांचा
तुझा अवतार..
चरण स्पर्शे मात्रे केला
अहिल्या उद्धार..!!
तुझ्या नामाचे सामर्थ्य
पाषाणाही तारी..
लाघुंन सागरास केली
लंकेवरी स्वारी..!!
वाल्याचाही वाल्मिकी होतो
घेता तुझे नाम..
रामायण रचिता झाला
ऋषि तो महान..!!
एक पत्नी एक वचनी
भ्राता गुणवान..
मित्रा हाके धावून जाशी
मित्र दयावान..!!
किती वर्णावी महती
पामर मी अजाण..
अल्पमती स्तवतो स्मरतो
गातो गुणगान..!!
तुझे गोड नाम प्रभु
ठेवितो मुखात..
एक तूच श्री राम
वसे अंतरात..!!
तूच माझा मुक्ती दाता
तूच निजधाम..
जपता श्री राम महिमा
लाभे समाधान..!!
कौसल्येचा पुत्र राम
दशरथाचा प्राण..
मातृ पितृ वचनी ऐसा
पुत्र तू महान..!!
असुरांस संहारण्या
तुझा अवतार..
चरण स्पर्शे मात्रे केला
अहिल्या उद्धार..!!
तुझ्या नामाचे सामर्थ्य
पाषाणाही तारी..
लाघुंन सागरास केली
लंकेवरी स्वारी..!!
वाल्याचाही वाल्मिकी होतो
घेता तुझे नाम..
रामायण रचिता झाला
ऋषि तो महान..!!
एक पत्नी एक वचनी
भ्राता गुणवान..
मित्रा हाके धावून जाशी
मित्र दयावान..!!
किती वर्णावी महती
पामर मी अजाण..
अल्पमती स्तवतो स्मरतो
गातो गुणगान..!!
|| राम नवमीच्या पावन शुभेच्छा ||
***सुनिल पवार....✍🏼

|| घटनेचे तुम्ही शिल्पकार ||

।। महामानवास विनम्र अभिवादन ।।
=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
|| घटनेचे तुम्ही शिल्पकार ||
=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
उगवली सुवर्ण पहाट
झाला महामानवाचा अवतार..
झुगारुन बंध जातीयतेचे
केला बहुजनांचा उद्धार...!!

जातीयतेचा पगडा दाट
चहुओर दाटून अंधार..
महातेजस्वी सूर्य प्रकटला
झाला समतेचा साक्षात्कार..!!
सावलीसही नव्हती जागा
बंद होते जगण्याचे द्वार..
दंड थोपटुन वीर उतरला
केले पाण्यासही चवदार..!!
विद्वतेची कवच कुंडले
तुम्हा शोभती रण झुंजार..
शत शत नमन तुम्हास बाबा
घटनेचे तुम्ही शिल्पकार..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
****सुनिल पवार....

।। स्वप्न ।।

।। स्वप्न ।।
=======
स्वप्न असते मित्रांनो..
अळवावरचे पाणी..
कधी मंगल गाणी..
कधी अधूरी कहाणी..!!

कुणाच्या स्वप्नावर
कोणाचा तो पगडा..
स्वप्नांशी कोणाचा
नेहमीचाच झगड़ा..!!
कुणाच्या स्वप्नांना
कोण देतोय हवा..
कोण राही उपाशी
कोण खातोय मेवा..!!
कुणाच्या स्वप्नात
दिवसा लख्ख दिवा..
तर कोणाच्या स्वप्नात
नेहमीचाच गारवा..!!
कोणाचं स्वप्न घेतय
उंच गगनी भरारी..
कुठे खितपत पडलं
कोणा मागल्या दारी..!!
स्वप्नांची गोड मैफिल
जमते तशी भारी
कोणाचं साकारतयं
कधी विस्कटतयं..च्या मारी..!!
****सुनिल पवार......

Tuesday, 12 April 2016

क्या होता है प्यार..??

क्या होता है प्यार..??
××××××××××××××
क्या होता है प्यार..??
मैंने पूछा दिल से कई बार..
कभी गुस्सा किया
तो कभी की तकरार..!!

ना मैंने कभी जाना,
ना उसने भी बताया..
हम समज न पाये
शायद..
दिल ही दिल में हो जताया..!!
कहते है सब दोस्त यार
मीठा जहर है प्यार..
जिसने भी किया,
उसने जीना छोड़ दिया..!!
******सुनिल पवार.....

|| भास्कर आला ||

|| सुप्रभात||
=◆=◆=◆=
भास्कर आला
दिली लाली नभाला
जाग माणसा..!!
उड़े पाखरू
पाहे नभास धरु
भूक पोटाला..!!
वारा वाहतो
पानोपानी बोलतो
गाथा उष्म्याची..!!
कळी फुलली
फुलांचा साज ल्याली
देवा वाहिली..!!
🙏🌹🙏🌹🙏
***सुनिल पवार...

Saturday, 9 April 2016

|| महाभारत ||



|| महाभारत ||
=========
आकाशातील उंच तारा
अकस्मात जसा निखळतो..
अर्धसत्याचा रथ धर्माचा
जमिनीवर तसाच उतरतो..!!
मैत्रीच्या निष्फळ वचनास
कर्ण वेडा उगाच जागतो..
परिवर्तनाच्या अग्निकुंडात
स्वःदेहास अर्पण देतो..!!
पुत्रप्रेमही तसेच धृतराष्टी
जो तो स्वःपुत्रास जपतो..
चक्रव्यूहात द्रोण हताश
अभिमन्यूचा मृत्यू पाहतो..!!
लालसेचा आंधळा सोस
डोळे मिटून राज्य करतो..
गांधीरीच्या ममतेलाही
पट्टीचा उपचार दिसतो..!!
कुटीलतेच्या कपट नीतीचे
शकुनी रोज फासे फेकतो..
दुःशासनी क्रूर लांडगा
द्रौपदीचे वस्त्र फेडतो..!!
शिष्टाईचा कृष्ण सखा
अधूनमधून भेटत असतो..
पण माणसातला दुर्योधन
युद्ध सदोदित छेडत असतो..!!
***सुनिल पवार...✍🏼

Friday, 8 April 2016

🌹गूढी पाडवा तसेच नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌹

| गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ||
======================
मना मनात रुजावी
नव चैतन्याची गुढी
प्रीत पालवी फुटावी
जावी निखळून अढी..!!
पाने पंचक आंब्याची
साक्ष देती मांगल्याची
नजरेत सजवावी
प्रेम मूर्ती वात्सल्याची..!!
माळ साखरी गोडवा
जिभेवर रेंगाळावा..
कडूलिंब सेवनाने
तमोगुण दूर व्हावा..!!
वस्त्र रेशमी पताका
उंच उंच लहरावी..
सद्भावनेची महती
सर्वदूर पसरावी.!!
नवबहर झेंडूंचा
मनी केसर रुजावा..
रांगोळीच्या नवरंगी
नित्य खुलून दिसावा..!!
चैत्र पालवी कोवळी
सोन झळाळी किरणी..
देतो शुभेच्छा मनस्वी
पाडव्याच्या शुभदिनी..!!
*****सुनिल पवार....✍🏼

|| हतबल गुढी ||

|| हतबल गुढी ||
==========
अशी उभारली गुढी
स्वः देहाच्या काठीवर..
अठरा विश्व दारिद्र
शोभे कलश देठीवर..!!

कापड ते भरजारी
लक्तरे ही वेशीवर..
डोळे भरून पाहतो
झळकती वाऱ्यावर..!!
साखरेची गोड माळ
नित्य रुळे ओठावर..
कडुलिंबाचे ते घोट
पचवावे कुठवर..!!
असा सजला पाडवा
अवकळा दारावर..
गुढी बांधली रे कोणी.?
शुभ दिनी झाडावर..!!
***सुनिल पवार....

तिची अदाच निराळी..

तिची अदाच निराळी..

तिच्या मोहक अदांवर
मन अलगद जाऊन बसते।
जिथे पाहावे तिथे ती दिसते
ती ध्यानी मनी स्वप्नी वसते।
सूर्य तळपता माथ्यावर
ती चांदण माळुन येते।
गुलमोहराच्या देहावर
ती लाली उधळत येते।
हिरवळल्या पानातून
ती मोहर बहरुन येते।
झाड झुकते विनम्रतेने
ती फळांवर डवरुन येते।
ग्रीष्मातल्या काहिलीवर
ती शीत मंद झुळुक होते।
पारवा घुमतो मनात अन्
ती कोकीळेची कुहुक होते।
तिची अदाच निराळी
ती ऋतूंची स्वामिनी दिसते।
ती अप्सरा,वसुंधरा लोभस
तिच्या अंगी चैतन्य सळसळते।
--सुनील पवार..✍️
Pratiksha Kurhade, Santosh Bakshi and 13 others
6 Comments
Like
Comment
Share