Monday, 4 April 2016

|| निर्माल्याची पाटी ||

निर्माल्याची पाटी...
मी दुरुनच पाहत होतो
त्या उमलत्या फुलास..
गवताच्या झुल्यावर ते 
झुलत होते दिलखुलास..!!
वाहत होता आवती भोवती
अवखळ वारा मंद धुंद..
पाकळी पाकळी उमलत होती
दरवळत होता मंद सुगंध..!!
शीळ घालताच वाऱ्याने
फुल आनंदे डोलत होते..
गुज ऐकून त्याच्या मनाचे
फुल मन मोकळे बोलत होते..!!
आता फुलासही लागला
अवचित त्या वाऱ्याचा छंद..
पण वाऱ्याच्या मनात होता
फुलाचा अवीट मकरंद..!!
एका बेसावध क्षणाला
वारा बेधुंद बेभान झाला..
अन् पाकळी पाकळी विखुरली
त्याने चुरगळले फुलाला..!!
शांत झाला वारा नंतर
त्याने दिशा आपली बदलली..
पण फुलाच्या माथी कायमची
निर्माल्याची पाटी चिकटली..!!
--सुनिल पवार..✍️
.

No comments:

Post a Comment