Showing posts with label तिच्यातील ती. Show all posts
Showing posts with label तिच्यातील ती. Show all posts

Thursday, 15 October 2020

आता हळूहळू

 आता हळूहळू..

आता हळूहळू ओसरेल पूर
पाणी निघून जाईल दूर दूर।
आणि चिखल दृष्टीक्षेपात येईल
त्याची समीक्षा कर जरूर।
मग सावरून घे माती
शोध नव्याने हरवलेली मती।
वाढव खुंटलेल्या नात्याची गती
अन् जोड नव्याने काही नाती।
जुनी गाडली गेली ती विसर
मनावर मनाची सावली धर।
तग धरलेलं झाड बहरेल कदाचित
पण फळाची आशा असेल धूसर।
कालौघात तुटणे वेगळे असते
पण तोडणे त्याहून वेगळे असते।
जपणूक आपल्याच हाती असते
पण तुटलेले जुडणे मुश्किल असते।
--सुनील पवार..

Saturday, 3 October 2020

त्याच्या मनाचा थांग

 त्याच्या मनाचा थांग..

मला सांग
शांत भासणाऱ्या
सागराच्या मनाचा थांग
कधी लागलाय का कुणाला?
जाणायचंच असेल जर तुला
तर धारण करावे लागेल सारितेला
पण त्यातही धोका आहे
तुला विरघळून जावे लागेल
त्याच्या अंतरात
अन् समजून घ्याव्या लागतील
त्याच्या बऱ्यावाईट सवयी
तरीही तो कळेल तुला
असे वाटत नाही मला।

झेलावा लागेल
त्याचा अमर्याद खारटपणा
कधी लोटून देईल
तो दूर तुला
किंवा भिरकावून देईल
किनाऱ्यावर
पुन्हा सामावून घेईल
हृदयात तुला
त्याचे खेळ
असेच चालत असतात
तो खेळवत राहतो
प्रत्येक सरितेला
अन् ती बिचारी मुकते
आपल्या सुंदर अस्तित्वाला।
--सुनील पवार..✍️

Tuesday, 1 September 2020

तेव्हा कळले तिला

 तेव्हा कळले तिला..

आपल्या फाटक्या आयुष्याची
तिने मारली आर्त शब्दकिंकाळी।
अन् ऐकणाऱ्याच्या मुखातून
केवळ वाह वाह निघाली।

तिने मांडला ओळीत
ओरबाडलेल्या लक्तरांचा भाव।
विफल प्रेमाचा विकल अंतर्भाव
पण तिच्या वाट्यास आला केवळ वॉव।

तिने केला कागदी प्रतिकार
चढवीत शब्दांना धार।
नकळे किती कळले कोणास
पण गर्दी जमली मोक्कार।

तिने बदलले आपले स्वरूप
जाणून समाजाचे काळे रूप।
तिला वाटले बदल घडेल कदाचित
पण वाट्यास आले केवळ क्षणिक अप्रूप।

तिने केला रूपक शृंगार
अन् घातले अंगभर अलंकार।
तेव्हा स्पष्ट जाणवले तिला
तिच्याभोवती होता केवळ लोचट बाजार।
--सुनील पवार..✍️

Monday, 27 July 2020

अथांग सागराला..

अथांग सागराला..
अथांग सागराला नसतो
मनाचा दुसरा किनारा असं नाही..
तू प्रयत्न कर जाणण्याचा
तो स्वतःहून तुला दाखवणार नहीं..!!
कधी लोटून बघ आपल्या मनाची होडी
लाट वागेल जरा वेडी वाकडी..
पण तू विचलित होऊ नको
जरी वारा काढू पाहिल खोडी..!!
वादळ घोंगावत राहील कदाचित
पण तू मात्र शांतच राहा..
कारण प्रत्येक वादळाला अंत असतो
त्यातून तू मार्ग काढत राहा..!!
तो आहे खारट हे मान्य पण
तू आपला गोडवा रुजवणे सोडू नको..
मन त्यालाही आहे हे आधी समजून घे
तू मनाचा संदर्भ केवळ जोडू नको..!!

मग दिसेल तुला मनाचा दुसरा किनारा
होईल आपसूक भावनांचा निचरा..
मग असेना का पहाट, सांज, अथवा रात्र
लोभस असेल किनाऱ्याचा नजारा..!!
--सुनील पवार..✍️
6,180
People Reached
99
Engagements
13
2 Comments
97 Shares
Like
Comment
Share

Tuesday, 4 June 2019

तुझ्यासाठी...💞

तुझ्यासाठी...💞
दोन शब्द तुझ्यासाठी
कागदावर काय उमटले..
जीवनाची कविता झाली
अन् कवितेत जगणे आले..!!

तू नाही ओळखले कधी
पण जग ओळखू लागले..
तुझ्यावर जडलेले प्रेम
शब्दांतून ओघळू लागले..!!

जीवनाचा ऋतू कोरडा
तरीही शब्द पाऊस झाले..
डोळ्यांची दौत भरून आली
अन् लेखणीतून वाहू लागले.!!

तुला सुखावणारे हेच शब्द
हृदयातून साद घालू लागले..
तू अवचित दिली दाद अन्
शब्दंशब्द कृतकृत्य झाले..!!
--सुनिल पवार...✍️

Thursday, 21 March 2019

शृंगार..

शृंगार..
लिपस्टिक हास्याची
जरा ओठांना लाव..
रंगलेल्या ओठांनी 
घे हृदयाचा ठाव..!!
मार्दवाचे काजळ
जरा डोळ्यांना लाव..
मी पाहतोय तयात
माझ्या स्वप्नांचा गाव..!!
लेवून घे तू सखे
नव्या प्रेमाचा पेहराव..
समजून तर घे
माझ्या मौनाचा भाव..!!
सहमतीच्या अत्तराचा
जरा वाढू दे प्रभाव..
संभ्रमित दुराव्याचा
उगा रचू नको बनाव..!!
***सुनिल पवार...✍️

Saturday, 16 March 2019

अस्तित्व...

अस्तित्व...

सागरात विलीन होऊनही
नदीने आपले अस्तित्व जपायला हवे..
तिच्या दृढ संकल्पाचे पाणी
बारा महिने कायम टिकायला हवे..!!
पण दुर्दैव असे की,
फार मोजक्या नदीच्या नशिबी
असे भाग्य लिहिलेले दिसते..
बाकी चार दिवसाचा पावसाळा वाहतो
नंतर पात्र कोरडे रुक्ष होते..!!
आधार घ्यायचाच झाला तर
नदीने तो हिमालयाचा घ्यावा..
पाऊस तसा लहरीच असतो
त्याचा भरवसा कोणी द्यावा..!!
शेवटी इतकेच सांगेन
की भावनेत वाहत जाऊन
रिते होण्यापेक्षा
संयत वाहून आपले अस्तित्व
टिकवून ठेव..
ते नाही, तर तू जीवन आहेस
इतके मात्र तू कायम स्मरणात ठेव..!!
***सुनिल पवार...✍️

ओलावा...

ओलावा...
लाट
ओहोटीला लागलेली दिसतेय
न जाणे
किनाऱ्याकडे कधी वळणार..?
लाटेचा हाच रुक्षपणा
स्वयं तिला
अन् सुक्ष वाळूला छळणार..!!
नाव
सहज पुसून गेली लाट,
मी वाळूत पुन्हा तसेच गिरवले..
पण जरासा सुटला वारा
अन् वाळुसह तेही उडवले..!!
मन
जडलेले असून उपयोग नाही
त्यात
ओलावासुद्धा आवश्यक आहे..
वाळू भासली जरी कोरडी लाटे
तरी अंतरी पाणी मुबलक आहे..!!
वेळ
निघून जाण्याआधी ये परतून
किनारा लुप्त होण्याच्या आत..
अन्यथा
तू मारत राहशील सुप्त धडका
पण देणारा नसेल कोणी साथ..!!
***सुनिल पवार...✍️

Thursday, 28 February 2019

कोडे..

कोडे..
कोड्यातले वागणे तुझे
नवनवे कोडे घालत जाते..
एक सुटले म्हणावे तर
दुसरे मनास सलत जाते..!!
नसते पडायचे मला त्यात
पण तरीही तेच पडत जाते..
कोडे हे असेच विचित्र
सोडवताना अडत जाते..!!
पहिल्या कडीला दुसरी कडी
आपोआप जोडत जाते..
जितके हाताळावे नाजूकपणे
तितके ओरखडे ओढत जाते..!!
करू पाहता दुर्लक्ष त्याकडे
मन त्यास खोडत जाते..
कोड्यातले वागणे तुझे
कोड्यात नित्य पाडत जाते..!!
***सुनिल पवार...✍️

Monday, 25 February 2019

कोडे...

कोडे...

कोड्यातले वागणे तुझे
नवनवे कोडे घालत जाते..
एक सुटले म्हणावे तर
दुसरे मनास सलत जाते..!!
नसते पडायचे मला त्यात
पण तरीही तेच पडत जाते..
कोडे हे असेच विचित्र
सोडवताना अडत जाते..!!
पहिल्या कडीला दुसरी कडी
आपोआप जोडत जाते..
जितके हाताळावे नाजूकपणे
तितके ओरखडे ओढत जाते..!!
करू पाहता दुर्लक्ष त्याकडे
मन त्यास खोडत जाते..
कोड्यातले वागणे तुझे
कोड्यात नित्य पाडत जाते..!!
***सुनिल पवार...✍️

Tuesday, 29 January 2019

आरक्त चंद्र...

आरक्त चंद्र..

ती म्हणाली,
बघ ना चंद्र ढगांनी झाकोळला..
मी म्हणालो,
ही चंद्रमुखी पाहून तोही लाजला..!!

ती म्हणाली,
आता काय म्हणावे या दृष्टिभ्रमाला..
मी म्हणालो,
अगं वेडे, प्रेम तर म्हणतात याला..!!

आता ती लाजली अन् मौन झाली,
ओंजळीत झाकून घेतले मुखाला..
मी म्हणालो,
ये बघ ना आरक्त चंद्र किती मस्त तेजाळला..!!
--सुनिल पवार..✍️

मला पतंग व्हायचं आहे..

मला पतंग व्हायचं आहे..
तू म्हणालीस,
तुला पतंग व्हायचं आहे
मनाच्या आकाशात मुक्त विहारायचं आहे..
पण तुझा पतंग तर त्यांनी केव्हाच केलाय
आणि दोरही त्यांच्याच हातात आहे..!!
तुला ते उंच उडवतील
पण वाऱ्याच्या हवाली करतील
त्यांच्या इशाऱ्यावरच तुला वळावे लागेल..
तुझ्यातीलच कोणीतरी कापेल तुझा मांजा
अन् उडण्याच्या तुझ्या स्वप्नांना
क्षणात सुरुंग लागेल..
कंन्नीच्या बेडीचा अर्थ तेव्हा तुला कळेल..!!
म्हणूनच
तू पतंग होऊ नको
कोणाच्या हातातील बाहुली बनू नको..
तुला बनायचंच असेल काही
तर तू स्वतः स्वयंसिद्ध हो
लोक खो घालतील पण तू लक्ष देऊ नको
जरा स्पष्टच बोलतोय तू रागावू नको..!!
***सुनिल पवार...✍️

काय आहे चेहऱ्यात...

काय आहे चेहऱ्यात..

तू विचारले म्हणून सांगतो
की काय आहे चेहऱ्यात..
एक पारद आरसा
लपलेला दिसतो त्यात..!!

चेहऱ्याचा चेहरा
काळा की गोरा
अनेक हावभाव
अंतरमनाचा ठाव
दिसून येतो चेहऱ्यात..!!

सुखामागचे दुःख
अन् दुःखामागचे सुख
अनामिक भूक
मनाची रुखरुख
बरोबर की चूक
दिसून येते चेहऱ्यात..!!

मौनाचे बोल
प्रेम प्रतारणेचा झोल
उथळ की खोल
अनमोल की कवडीमोल
दिसून येते डोळ्यात
सारेच काही असते चेहऱ्यात..!!
***सुनिल पवार...✍️