Tuesday, 30 January 2018

|| वाटते ||

|| वाटते ||
=======
तिला वाटते नेहमी
की त्याने तिच्यावर लिहावे..
अन त्याला वाटते 
की तिने कधीतरी वाचावे..!!
तिला वाटते नेहमीच
की त्याने तिचेच ऐकावे..
अन त्याला वाटते
की तिने मौनात बोलावे..!!
तिला वाटते नेहमी
की त्याने सापेक्ष असावे
अन त्याला वाटते
की तिने कटाक्ष व्हावे..!!
तिला वाटते नेहमीच
त्याने अवगुण सोडावे..
अन त्याला वाटते
की तिने समीक्षण करावे..!!
तिला वाटते नेहमी
की त्याने मुठीत राहावे..
अन त्याला वाटते
की तिने मिठीत यावे..!!
तिला वाटते त्याला वाटते
हे वाटणे मात्र निर्भेळ असावे..
तिने त्याची व त्याने तिची
वाटण्याची ती वेळ व्हावे..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| वसंत ||

|| वसंत ||
=======
वसंताच्या चाहुलीने
धुंद पळस पेटतो..
आलिंगणात प्रियेच्या
मज सापेक्ष भेटतो..!!
फूटे ऋतूंना पालवी
लूटे फुलांचा बहर..
मनातून डोकावतो
आंबेमोहर डवर..!!
पानगळ जाते दूर
लागे कोकिळेचा सूर..
सप्तसुरा झेलण्यास
मन उत्सुक आतुर..!!
येते जुळून ऋतूंची
परिवर्तनाची वाट..
नवसृजनाची होते
एक नवीन पहाट..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| किनारा ||

|| किनारा ||
========
किनाऱ्यावर थडकणाऱ्या
असंख्य हिरव्या,पिवळ्या
अतृप्त लाटांना थोपवणे 
जरा कठीणच जातंय मनाला..
अमर्याद उसळणाऱ्या याच लाटांनी
अथांगता दिलीय की उथळता?
हा प्रश्न भेडसावतोय
उदात्त सागराला..!!
थोपवणे
किनाऱ्याच्या हाती नाही
म्हणूनच कदाचित
मन रुजवून अन सामावून घेतंय
उधाणल्या प्रत्येक लाटेला..
गर्द झाल्या त्या हिरवाईला
अन हिरवाई नटल्या पिवळाईला सुद्धा
शीतलता प्रदान करून
पुन्हा परतवते आल्या वाटेला..!!
असंख्य स्मृतिपटलांचा हा
उधाणलेल्या लाटांचा पदन्यास
कळत नाही
उभारी देतोय का अधिक भग्न करतोय?
मनाच्या स्थितप्रज्ञ किनाऱ्याला..
सागराच्या खोलीचा अंदाज
असेल का कोणाला..?
का किनाऱ्याच्या गोष्टी
निव्वळ लागत असतील किनाऱ्याला..??
***सुनिल पवार...✍🏼

|| निवांत क्षणी ||

|| निवांत क्षणी ||
===========
अंगावर येणाऱ्या
गर्दीतून वाट काढत
मी पोहचतो जेव्हा
एखाद्या निवांत क्षणी..
तेव्हा
नकळत दाटून येते
काहूरांची तीच गर्दी
अन
मन ओढत नेते मनास
पुन्हा निवांत क्षणी..
हे चक्र घडते क्षणोक्षणी
तरीही मन वेडे
उत्सुक, आतुर भेटण्यास
त्या एका निवांत क्षणी..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| पतंग ||

|| पतंग ||
======
मन मे लिए उमंग
चली
बदलो के पार पतंग..
सोंपकर
किसीकेे हातो में डोर
मगर
अंजाम से बेखबर
लड़ रही है
खुले आसमान की जंग..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| अडला हरी ||

|| अडला हरी ||
==========
नाही निर्मळ मन
त्यास काय करील साबण.?
पूर्वग्रहदूषित चिखलाने
बरबटलेले अंतःकरण..!!
बळी तो कान पिळी
सामर्थ्य हे अफूचे व्यसन..
झिंगून नशेत बेभान नाचते
जाती पातीतले अज्ञान..!!
हात कांकणास आरसा कशाला
दिसे नेत्रपटलावर दुराभिमान..
शिव्या झाल्या ओव्या केव्हाच
अन तृप्त झाले हो कान..!!
झाले गेले गंगेला मिळाले
केवळ बोलघेवडे हो कोंदण..
सामावूनही सकलांना
लाभते गटार गंगेचे दूषण..!!
अडला हरी गाढवाचे पाय धरी
ही अगतिकतेची करुण वाणी..
पिळवणूचा शाप मनास
सांगा कोण आहे समाधानी..??
***सुनिल पवार..✍🏼

Wednesday, 10 January 2018

|| अग्निकुंड ||

|| अग्निकुंड ||
=========
किती टाकाल हो
असे
दगड मातीचे विकृत भराव..
दिवसेंदिवस उग्र होतोय तो
सांगा कसा लागेल
किनाऱ्याचा टिकाव..!!

जितका टाकाल भराव
तितका
तो अधिक उसळणार..
अन
त्याच्या भावनांचा उद्रेक मात्र
सर्वस्व ध्वस्त करणार..!!
तुम्ही
थोपू पाहता आपला रंग त्यावर
म्हणूनच
काळवंडले जातेय विविधरंगी क्षितिज..
अपरिमित हानी
केवळ आकाशाची होतेय
याकडे कोणाचेच
लक्ष नाही आजमितीस..!!
खरं तर
प्रत्येक रंगात रंगायला हवे
आपले सहयोगी रंग
त्यात मिसळायला हवे
तेव्हाच रंगत वाढेल रंगांची
अन
सजेल कमान आसमंतात
सप्तरंगी इंद्रधनुष्याची..!!
त्याला
जपायचंच असेल खरोखर
तर आधी
त्याचे अस्तित्व मान्य केले पाहिजे
मनातील
जळमटे झटकली पाहिजे..
प्रत्येक अस्तित्व असते हो सन्माननीय
तो सन्मान
तुमच्या कृतीत दिसला पाहिजे..!!
उपरती
ही नेहमीच उशिराने येते
मात्र
तोवर वेळ निघून जाते..
अन
धगधगत्या अग्निकुंडात
अंती
राखेशिवाय काहीच नसते..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| मोहब्बत ||

|| मोहब्बत ||
=========
वैसे तो मोहब्बत
नापी नही जाती
किसी भी तराजू सें..
मगर न जाने क्यों
छलकता है लेनदेन
लोगो की नजरो सें..!!
**सुनिल पवार...✍🏼

|| भावतरंग ||

|| भावतरंग ||
========
तो :
गुलाबी ह्या थंडीची
गुलाबी ही बोली..
भुंग्यास बिलगून
बघ मिटली पाकळी..!!

ती :
मोग-याच्या जवळकीने
लाजली बकुळी..
वा-याच्या स्पर्शाने
बघ शहारल्या ओळी..!!
तो :
रुणझुणत्या पैंजणांची
खळखळ ती ओहळी..
फेसळीत भावतरंग
उमटतात डोळी..!!
ती :
घुमतो मन पारवा
आर्त वेळोवेळी..
माळलेल्या गजऱ्यातून
बोलते अबोली..!!
तो :
आतुरता या क्षणाची
तू जाण देहबोली..
ती:
तरुवरास बिलगण्या
बघ सरसावल्या वेली..!!
गुलाबी या थंडीची
गुलाबी ही बोली..
भुंग्यास बिलगून
बघ मिटली पाकळी..!!
***सुनिल पवार..✍🏼

Monday, 1 January 2018

|| हे चंद्रा ||

|| हे चंद्रा ||
=======
हे चंद्रा
तुला पाहताच
का हा
वेडा सागर उसळतो..?
तुझ्या भोवताली
कैक टिपूर चांदणलाटा
सांग तुला
सागर कितीसा कळतो..?

डोळ्यात न मावणारी
ही विशालता
जरी अथांगतेची..
तरी
न पोहचणार ती
कधीच नभी
सीमित उसळी
त्याच्या मर्यादेची..!!
निळाईच्या
निल देहावरती
प्रतिबिंबाचे
बघ धवल गोंदण..
वाळूवरच्या रेघोट्याचे
ते किनाऱ्यावरचे
मूक आक्रंदन..!!
हे चंद्रा
तुझा पुनवेचा बहर
तोडू पाहतो
स्थितप्रज्ञ किनारा..
अन
आकाशाच्या या ओढीला
केवळ
ओल्या वाळूचा सहारा..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| असे सोहळे ||

|| असे सोहळे ||
==========
असे हे सोहळे
किती खास झाले..
की जगण्याचे केवळ
अति भास झाले..!!

जीवनात माझ्या
सारे उल्हास आले..
की अगणित अनंत
फाल्गुन मास झाले..!!
हात जोडून विनम्र
कुठूनसे दास आले..
की पोटातील भुकेचे
आगंतुक पाश झाले..!!
रंगबिरंगी स्वप्ने सारी
मोत्यांची रास झाले..
की इमले ते पत्त्यांचे
क्षणात ऱ्हास झाले..!!
या जीवनास श्रद्धेने
अर्पित श्वास केले..
की सरणावरचे अंतिम
परिवर्तित निश्वास झाले..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| ओंजळीतले प्रेम ||

|| ओंजळीतले प्रेम ||
=============
आता
आलीच आहेस
तर
जरा बोलून जा..
हे ओंजळीतले
प्रेम माझे
तुझ्या शब्दात
जरा तोलून जा..!!
**$p..✍🏼