Showing posts with label विडंबन काव्य. Show all posts
Showing posts with label विडंबन काव्य. Show all posts

Tuesday, 30 January 2018

|| अडला हरी ||

|| अडला हरी ||
==========
नाही निर्मळ मन
त्यास काय करील साबण.?
पूर्वग्रहदूषित चिखलाने
बरबटलेले अंतःकरण..!!
बळी तो कान पिळी
सामर्थ्य हे अफूचे व्यसन..
झिंगून नशेत बेभान नाचते
जाती पातीतले अज्ञान..!!
हात कांकणास आरसा कशाला
दिसे नेत्रपटलावर दुराभिमान..
शिव्या झाल्या ओव्या केव्हाच
अन तृप्त झाले हो कान..!!
झाले गेले गंगेला मिळाले
केवळ बोलघेवडे हो कोंदण..
सामावूनही सकलांना
लाभते गटार गंगेचे दूषण..!!
अडला हरी गाढवाचे पाय धरी
ही अगतिकतेची करुण वाणी..
पिळवणूचा शाप मनास
सांगा कोण आहे समाधानी..??
***सुनिल पवार..✍🏼

Tuesday, 4 April 2017

|| मुळाक्षरे ||

|| मुळाक्षरे ||
========
आठवतंय स्पष्ट
लहानपणी आईचं
बोट धरून गिरवलेली
ती मुळाक्षरे
अ आ इ ई
ग म भ न
त्या पुढे जोडलेले ते शब्द
अ रे अननसातला
ग रे गणपतीतला..
किती लोभस भासायची
तेव्हा ती अक्षरं
जणू अंगावर
तलम मोरपीस फिरायचे
हृदयात झरझर अमृत पाझरायचे..!!

आता
उलटून येतात अंगावर
तीच अक्षरं
अ ला अरे म्हणत
क ला कारे म्हणतात..
ग चा गाढव झाला
ल च्या लाथा हाणू लागला..
ज जातीत विभागला
बदकातला ब
बदल्यात गुंतला..
आता
खरंच वाटू लागलंय मनाला
मराठीचं काही खरं नाही
लोक म्हणतात तेच खरं असावं
इंग्रजी शिवाय ह्या राष्ट्राला
दुसरा कोणता पर्याय नाही
पण तरीही सांगू इच्छिते की 
माय मराठीची सर 
इंग्रजी पुतना मावशीस येणार नाही..!!
***सुनिल पवार...✍🏽🙏

Tuesday, 28 March 2017

|| कार्यकर्ता ||

|| कार्यकर्ता ||
=========
ते लढ म्हणाले
मी लढलो..
ते झाले सत्ताधीश
मी अडगळीत पडलो..!!

ते नड म्हणाले
मी नडलो..
ते सुटले सहीसलामत
मी नाहक अडकलो..!!
ते चढ म्हणाले
मी चढलो..
त्यांनी खेचले पाय
मी तोंडघशी पडलो..!!
ते पेट म्हणाले
मी पेटलो..
त्यांनी शेकली पोळी
मी राख झालो..!!
ते राजा म्हणाले
मी क्षणात हुळहुळलो..
त्यांनी केला अत्याचार
मी सहज विसरलो..!!
***सुनिल पवार...✍🏽

Friday, 13 January 2017

🌺मन मनाचे🌺


🌺मन मनाचे🌺
===========
मातीचीच चूल
परी
आकाशाची भूल..
आत्मप्रौढीच्या
तट्टाणीला
ऐरावती झुल..!!

ईवलस झाड
म्हणे
मूळ बहू खोल..
दूतर्फी वाजतो
त्याच्या
महिमेचा ढोल..!!
आसक्ती गुलाबाची
देते
काट्यांस भूल..
लालसेच्या पायी
नाहक
कुस्करते फुल..!!
औंदर्याचा वानवा
लावी
सागरास बोल..
डबकं मारे फुशारकी
सांगे
मीच अधिक खोल..!!
दगड सारे वाटेवर
त्यावर
ना चढवणार फुल..
माझ्याच पावलांची
माथी
मी लावणार धूळ..!!
***सुनिल पवार....✍🏽😊

Thursday, 1 December 2016

|| ह्याचा बाब्या त्याचा कार्टा ||

|| ह्याचा बाब्या त्याचा कार्टा ||
===================
बाब्याच्या कोडकौतुकात
बिचारा
कार्टा उपेक्षित राहतो..
मी मूक, आक्रंदन
त्याचे
डोळे मिटून पाहतो..!!

माझ्या मनाचा प्रश्न
कशास
नेहमीच मला छळतो..
बाब्या नयन ज्योती
मग
कार्टा का नजरेस खलतो..??
हा दृष्टीचा भ्रम म्हणू
का मी
का म्हणू मनाचा आजार..
कार्ट्याने तरी जावं कुठे
अन
कुठे शोधावा कोणाचा आधार..??
माझ्या लेखी जो कार्टा
जाणतोय
कुणाचा तरी बाब्या असणार..
अन माझ्या बाब्यास ही
तसेच
कार्ट्याचे लेबल असणार..!!
बाब्या काय अन कार्टा काय
कुणाची तरी
अपत्येचं असतात..
डोळ्यावरची झापडं उतरावा
कळेल..
ही बाळं किती गोंडस दिसतात..!!
*****सुनिल पवार....✍🏽 

Monday, 10 October 2016

|| कुरघोडीच्या राजकारणात ||

|| कुरघोडीच्या राजकारणात ||
=================
कुरघोडीच्या राजकारणात
कोण कोणावर कधी घसरेल
भरवसा नाही काही..
अन
कालचा मित्र आज असेल
असंही काही नाही..!!

उगवणारा नारायण
सायंकाळी मावळणार
हे नक्की..
एकाच माळेचे सत्रे मणी
ही म्हण आहे
तितकीच पक्की..!!
सुपातल्यांनी जात्यातल्यांना
उगाच नावे ठेवू नयेत
भरडणार मात्र दोघेही..
सुज्ञास हे सांगावे लागत नाही
अन मूर्खांच्या बोलण्यात
तसाही अर्थ नसतो काही..!!
उंटावरच्या शहाण्यांचे
दिखाव्यासाठीच असते
बोलघेवडे धडपडणे..
मान कापलेल्या
त्या कोंबडीचे जसे
केविलवाणे फडफडणे..!!
यत्किंचित लोण्यावरून
आपापसात भांडत राहतात
जातीय बोके वाटणीवरून..
अन माकड सारेच पळवते लोणी
कधी नगरसेवक, कधी आमदार
तर खासदार बनून..!!
****सुनिल पवार....

Wednesday, 21 September 2016

|| साहित्याच्या प्रसूती गृहात ||

|| साहित्याच्या प्रसूती गृहात ||
===================
अनौरस
घेतेय गती
अन,
औरस
खातोय माती..
साहित्याच्या प्रसूती गृहात
विचित्र
येतेय प्रचिती..!!

ह्याचं पोर
तो पळवतोय
बाप बनून
जगी मिरवतोय..
जन्मदाता हतबल बिचारा
चोर निलाजरा
शिरजोर ठरतोय..!!
****सुनिल पवार...✍🏽😜 

Monday, 29 August 2016

|| आरसा ||

आरसा...
पुरे कर आता
येता जाता आरसा दाखवणे,
कारण मी कळलोय माझा मला
तुझ्या उक्तीतुन, कृतीतून
आणि तू दाखवलेल्या
प्रत्येक आरशातून।
पण एक विचारू तुला?
त्या आरशात
तू का पाहात नाही कधी?
एकदा बघचं
मग समजेल तुला
बाकी काही दिसेल न दिसेल
पण निदान
जमलेली धूळ तरी साफ होईल।
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says 'पुरे कर आता येता जाता आरसा दाखवणे, कारण मी कळलोय माझा मला तुझ्या उक्तीतुन, कृतीतून आणि तू दाखवलेल्या प्रत्येक आरशातून| आरता पण एक विचारू तुला? त्या आरशात तू का पाहात नाही कधी? एकदा बघचं मग समजेल तुला बाकी काही दिसेल न दिसेल पण निदान जमलेली धूळ तरी साफ होईल| सुनील पवार..'

Tuesday, 23 August 2016

|| कविता तेव्हा आता ||


|| कविता तेव्हा आता ||
==============
पूर्वी त्या ओळीत
पद्यात असायच्या
आता गद्यात गातात..
काही उथळ
काही खोल
काही अध्यात,
मध्यात राहतात..!!

लोक म्हणतात
त्यांस कविता
म्हणून मी ही
मूक दुजोरा देतो..
ते म्हणताहेत
तर असणारच
समजून त्यांस
मुजरा करतो..!!

ऐकलंय मी
पूर्वी कवितांची
म्हणे गाणी होती..
आताची गाणी ऐकून
कळतेच आहे
आजच्या कवितांची
खरी महती..!!
****$p.....✍🏽

Monday, 15 August 2016

|| चर्चा ||


|| चर्चा ||
======
आताशी ती
बरीच उधाणात आहे..
म्हणे पावसाची
तिला साथ आहे..
कोणी म्हणतोय
वाऱ्याचा हात आहे..
सारेच हिरीरीने
मांडत आहेत मुद्दा
कळेना का उगाच
भांडत आहेत..
जसे सर्व काही
त्यांस ज्ञात आहे..
पण
सगळाच मामला
आत बट्ट्यात आहे..!!
😜😀😜😀😜
****सुनिल पवार....

Friday, 8 July 2016

:::II कंपूशाही II:::

[मिश्किली]😜
***********
:::II कंपूशाही II:::
===========
कंपूशाहीचा निषेध करून..
त्यांनी
नवा कंपू तयार केला..
आता
त्यांच्या कंपूशाहीत
इतरांचा
जीव घुसमटला
मग इतरानीही
कंपूशाहीचा निषेध करून
आपला
नवा कंपू तयार केला..!!
****सुनील पवार.....😀

=D याड लागलं लई ग्वाड लागलं =D

=D याड लागलं लई ग्वाड लागलं =D
=====================
फ़ोटोच्या नादापायी
त्यांनी झाड लावले..
झाडापेक्षा फोटोनेच
त्यांना याड लावले..!!


काही का होईना
एक झाड लागलं..
त्यांचं झाड लावणं
मनास ग्वाड लागलं..!!
😄😜😄😜😄
***सुनिल पवार...

Monday, 27 June 2016

|| माझी ती त्याची ||

|| माझी ती त्याची ||
=============
बऱ्याच प्रयासाने
ती प्रसवली
माझ्या हाताने
माझ्या विचारातुन
किंबहुना
माझ्या अंतरात्म्यातुन...!!

मी आणली तीज
जगासमोर
ना कोणीच तिची
दखल घेतली
नसावी कदाचित
ती तितकी मोहक
मी सहाजीक तीज
अडगळीत टाकली..!!
कोण होता तो
भला शार्वलिक
अंधारातुन तीज
घेऊन गेला
दुर्लक्षित ती
होती उपेक्षित
परी बाप तिचा तो
होऊन गेला..!!
कालांतरे
नव्या बापाचं
बिरुद लावून
ती त्याच जगासमोर
पुन्हा आली
काय सांगू
फळफळलं तीचं नशीब
ज्याने त्याने
उचलून घेतली..!!
अकस्मात आली
ती माझ्या समोर
अन् गहिवरल
माझं मन
तीला पाहुन
तिच्या कौतुकात त्या
मी ही गेलो
नकळत वाहून..!!
आता
धन्यवाद देतोय मी
त्या शार्वलिकाला
ज्याने माझी मला
ओळख दिली
अन् प्रश्न करतोय
मी जगाला
काय अर्थ हो
तुमच्या रासिकतेला
त्या जाणकारीला
तुमचा मुजरा
का
नेहमीच असतो
मात्र नावाला..??
***सुनिल पवार...

Saturday, 9 April 2016

|| महाभारत ||



|| महाभारत ||
=========
आकाशातील उंच तारा
अकस्मात जसा निखळतो..
अर्धसत्याचा रथ धर्माचा
जमिनीवर तसाच उतरतो..!!
मैत्रीच्या निष्फळ वचनास
कर्ण वेडा उगाच जागतो..
परिवर्तनाच्या अग्निकुंडात
स्वःदेहास अर्पण देतो..!!
पुत्रप्रेमही तसेच धृतराष्टी
जो तो स्वःपुत्रास जपतो..
चक्रव्यूहात द्रोण हताश
अभिमन्यूचा मृत्यू पाहतो..!!
लालसेचा आंधळा सोस
डोळे मिटून राज्य करतो..
गांधीरीच्या ममतेलाही
पट्टीचा उपचार दिसतो..!!
कुटीलतेच्या कपट नीतीचे
शकुनी रोज फासे फेकतो..
दुःशासनी क्रूर लांडगा
द्रौपदीचे वस्त्र फेडतो..!!
शिष्टाईचा कृष्ण सखा
अधूनमधून भेटत असतो..
पण माणसातला दुर्योधन
युद्ध सदोदित छेडत असतो..!!
***सुनिल पवार...✍🏼

Friday, 22 January 2016

|| कल्ला||

|| कल्ला||
=●=●=
कशी प्रसवावी कविता
खल वाढतोय यावर..
यूनानी, जनानी वैदुंचा
गल्ली बोळात दिसतो वावर..!!


ती वैचारिक उपजावी
की यमकात रेंगाळावी..?
कोणता मुहूर्त साधावा
कशी प्रसूती व्हावी..??

नाना विविध सूचना
कोणाची म्हणून खोडावी..
कळे मज काहीच
नाळ जोडावी? का तोडावी..!!

सहज सुलभ व्हावी
का आड़ वळणाने यावी..?
वेदना निराळ्या साऱ्या
कोणाची कुणी घ्यावी..!!

तो डॉक्टर सीजरवाला
कात्री लावतो शब्दा शब्दाला..
चकाचक त्याचा दवाखाना
म्हणून तज्ञ म्हणू का त्याला..?

तो हकीम अलंकारी
त्याची मात्रा वाटतेय भारी..
कोणाच गं पोर ते
बघ फिरतय कोणा दारी..!!

अहो डॉक्टर हाकिम सोडा
आता कंपाउंडर भी देतो गोळ्या..
कोणाच्या तापलेल्या तव्यावर
कोण शकतोय पोळ्या..!!

मानु तरी कोणाचा सल्ला
सारेच करतात नुसता कल्ला..
माझी झोळी रिकामी झाली
अन त्यांनी त्यांचा भरला गल्ला..!!
●●●●●●●●●●●●●●●
***सुनिल पवार.....

Tuesday, 5 January 2016

|| खंत ||

|| जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
=◆=◆===◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
खंत..
नेहमीच सतावते मला
खंत माझ्या जीवनाची..
का कदर नाही कोणास
माझ्या मृदू स्त्री मनाची...!!
नित्य फुलांच्या ममतेने
मी जपत आले काट्याला..
सर्वस्व अर्पण केले तरी
का उपेक्षा माझ्या वाट्याला..!!
भासले जरी मुक्त तुम्हास
बेडी अजून तीच पायात..
किती सहज बदलते नजर
का येता कळी यौवनात..!!
सावित्री, दुर्गा, शक्ती बनुन
मी व्यर्थच देव्हाऱ्यात बसते..
तुमच्या क्रूर वासनेची
का बळी मग मीच असते..!!
कैक प्रश्न दडले आहेत
अजूनही माझ्या मनात..
आज उदो उदो कराल मात्र
उद्या फिराल तुम्हीच क्षणात..!!
कसली आलीय स्त्री मुक्ती
अन् कुठे आहे महिला दिन..
कालही होते अन् आजही आहे
तुमच्या जगात महिला दीन...!!
***सुनिल पवार...✍️

Thursday, 31 December 2015

II मॅसेजची खीर II

II मॅसेजची खीर II
=●=●=●=●=●=
जेथे जातो तेथे
तो त्याच्या सांगाती
मोबाईल हाती
दिसतसे..!!

किती लीन दिसे
सदा खाली मुंडी
काय बरे धुंडी
स्क्रीनवर..!!
हात जसा जोड़ी
अंगठे तो मोडी
लागलीया गोडी
चाँटिंगची..!!
सदा समाधीत
दिसतसे ध्यान
झुकलेली मान
रात दिन..!!
ऐसा तो सज्जन
मोबाईल वीर
मॅसेजची खीर
वाटतसे..!!
***सुनिल पवार...

Saturday, 12 December 2015

II मुर्खांचा दरबार II

II मुर्खांचा दरबार II
=============
भासवती स्वतःस ते
बिनीचा शिलेदार..
पाहिला असाच मी
मुर्खांचा दरबार..!!

ना पेलविले कधी
यत्किंचित शब्दहार..
मिरवले गळ्यात तेच
अभिमानाचे हार..!!
दृष्टीभ्रम होता तो एक
प्रकाशाचा संचार..
अंतरी वाहतोय कुट्ट
ओसंडून अंधार..!!
घेतात तोंडसुख ते
फेकती शब्दांगार..
अभिव्यक्तीचा कोडगा
चेततो शृंगार..!!
स्वानुभव म्हणती त्यांचा
दांडगा अपार..
खाती गटांगळ्या घेत
काडीचा आधार..!!
वाटतात तयांस त्यांचेच
थोर उच्च विचार..
करू इच्छितो मी ही त्यांना
कोपरातून नमस्कार..!!
******सुनिल पवार....

Monday, 23 November 2015

|| कवी आईना ||

|| कवी आईना ||
==========
कळे ना मज
काय असतो कवी..
त्याच्याही मनाची
चाचणी घ्यायला हवी..!!


पुन्हा त्याच शब्दात
का फसतो तो कवी..
कधी तरी वाचावी
त्याने एखादी नवी..!!

जगास नवा आईना
दाखवे तो कवी...
त्यात आपली छबी
ज़रा परखुन पहावी..!!

म्हणाल तुम्ही आता
मला सुद्धा कवी..
त्यातलीच एक प्रत
आता मला तुम्ही द्यावी..!!
*****सुनिल पवार......

Tuesday, 11 August 2015

II शिकतोय कविता II

II शिकतोय कविता II
=============
कोणी शब्द मला गुंफुन दाखवा
हो शिकतोय कविता शिकवून दाखवा..!!

मुक्त छंदाचे नियम सारे
मला बी तुम्ही शिकवा ना रे
कसा सजवायचा फुलांचा ताटवा
हो शिकतोय कविता शिकवून दाखवा..!!

यमकाचे गणित समजेना काही
मात्रा अलंकाराच् नाव नको बाई
कोणी चारोळीला कडव्यात बसवा
हो शिकतोय कविता शिकवून दाखवा..!!

विषयाचा विषय समजवा कोणी
शंका एक आलीय माझ्या मनी
कोणी विषयात विषय ज़रा घुसवा
हो शिकतोय कविता शिकवून दाखवा..!!

भावनेस जागा असते का काही
उधळावी कशी अलंकारी लाही
पडलाय अंधार दिवा ज़रा पेटवा
हो शिकतोय कविता शिकवून दाखवा..!!

कोणी शब्द मला गुंफुन दाखवा
हो शिकतोय कविता शिकवून दाखवा..!!
*******सुनिल पवार......