Monday, 27 June 2016

|| माझी ती त्याची ||

|| माझी ती त्याची ||
=============
बऱ्याच प्रयासाने
ती प्रसवली
माझ्या हाताने
माझ्या विचारातुन
किंबहुना
माझ्या अंतरात्म्यातुन...!!

मी आणली तीज
जगासमोर
ना कोणीच तिची
दखल घेतली
नसावी कदाचित
ती तितकी मोहक
मी सहाजीक तीज
अडगळीत टाकली..!!
कोण होता तो
भला शार्वलिक
अंधारातुन तीज
घेऊन गेला
दुर्लक्षित ती
होती उपेक्षित
परी बाप तिचा तो
होऊन गेला..!!
कालांतरे
नव्या बापाचं
बिरुद लावून
ती त्याच जगासमोर
पुन्हा आली
काय सांगू
फळफळलं तीचं नशीब
ज्याने त्याने
उचलून घेतली..!!
अकस्मात आली
ती माझ्या समोर
अन् गहिवरल
माझं मन
तीला पाहुन
तिच्या कौतुकात त्या
मी ही गेलो
नकळत वाहून..!!
आता
धन्यवाद देतोय मी
त्या शार्वलिकाला
ज्याने माझी मला
ओळख दिली
अन् प्रश्न करतोय
मी जगाला
काय अर्थ हो
तुमच्या रासिकतेला
त्या जाणकारीला
तुमचा मुजरा
का
नेहमीच असतो
मात्र नावाला..??
***सुनिल पवार...

No comments:

Post a Comment