Thursday, 2 June 2016

|| वाऱ्यावर घर बांधायचे आहे तीला ||

|| वाऱ्यावर घर बांधायचे आहे तीला ||
======================
गगनचुंबी विचारांच्या
त्या झाडावर विसंबुन
सुगरणीने बांधला होता
आपल्या स्वप्नांचा खोपा..
मुक्त भासणाऱ्या त्याच्या
त्या विशाल झावळाखाली
चौकटीतल्या मृगजळी परिघात
घेत होती मजेत झोका..!!

वृक्षाच्याही उंच उडणारी ती सुगरण
आपल्या पिल्लांसाठी मात्र
त्या झाडाच्या खोडातच
घट्ट नख्या रुतवून होती..
खोडात रेंगणाऱ्या त्या
किड्या मुंग्यात
कधी वाट्यास येणाऱ्या
त्या फुलपाखरात
आशेच्या हिंदोळ्यावर
वेडे मन गुंतवून होती..!!
आताशी निश्चिंत झालेली ती
मोकळा श्वास घेते न घेते
तोच कुठुनसा वारा आला
जन्म देत नव्या वादळाला..
हेलकावला तिचा खोपा
क्षणात धुळीने झाकोळला
कावरी बावरी सुगरण
अवचित बिलगली खोप्याला..!!
झुंजत होती लढत होती
पडत होती उडत होती
मधेच झाडास बिलगत
परतवत होती वादळाला..
शमले वादळ निवळला वारा
वाटले जिंकली सुगरण पण
खिळखिळ्या झाडानेच मान टाकली
अन उध्वस्त तिचा खोपा झाला..!!
आता पेंटून उठलीय सुगरण
न विसंबणार कोणा झाडावर
नको त्या झावळयांचा आधार
ना बधणार पुन्हा कोणाला..
नको तो चौकटीतला झूला
रेंगणाऱ्या त्याच किड्यांची शृंखला
हवे मोकळे विस्तीर्ण आकाश
अन
वाऱ्यावर घर बांधायचे आहे तीला..!!
*****सुनिल पवार......

No comments:

Post a Comment