Thursday, 2 June 2016

|| विद्रोही ||

|| विद्रोही ||
========
अंध श्रद्धेवर
सड़कून टिका करणारा
सामाजिक विषमतेवर
प्रहार करणारा
तो विद्रोही
अवचित भावला
मनाला..
समाज व्यवस्था
बदलणार नक्की
ही खात्री पटली
त्याच क्षणाला..!!

बुलंद होता
त्याचा आवाज इतका
जितका दाबला
तितका उसळला
नाही कधीच
कोणास बधला..
न रुचले परी
त्या कर्मठाला
घात करोनी
विद्रोही वधला..!!
एक पडला
दूसरा उठला
विचार त्यांचा
जन मनात पेटला..
बघता बघता
वणवा झाला
जाळ आसमंती
भिडला..
अन्
विद्रोही मज
तिथेच भेटला..!!
आता
फ़ौज झालीय
विद्रोहींची
मी ही स्वतःस
त्यात
जोडून घेतले..
कळले नाही
माझेच मला
कधी..
जातीत त्यांनी
ओढून घेतले..!!
सामाजिक विषमता
शोषितांवरील अत्याचार
यांच्यावर
करायचा होता
घातक प्रहार मला..
त्यासाठीच मी
सज्ज झालो
अन्
सज्ज केले
माझ्या
धारधार लेखणीला..!!
खर तर
दुफळी माजलेल्या
जन मनावर
त्या चिघळलेल्या
जखमेवर
फुंकर मारायची
होती मला..
पण उद्देश
टांगुन खूंटीला
मी शिव्या घालतोय
पर जातीला
अन् अभिमानाने
म्हणतोय
विद्रोही म्हणा मला..!!
🙏🌹🙏🌹🙏
****सुनिल पवार....

No comments:

Post a Comment