Sunday, 28 September 2014

।। उपास-ना एक फार्स ।।

।। उपास-ना एक फार्स ।।
माते तुझा उपवास धरतो..
मला तर तो उपहास भासतो..
कड़क उपवास सागुन सर्वत्र..
फळे वेफर भरपेट खातो..!!

घरात नळाच पाणी चालते..
बाहेर मात्र बिसलेरीच लागते..
शोभेच्या ह्या उपवासाला..
अनवाणी सर्वत्र फिरावे लागते..!!

स्त्री शक्तिची उपासना करतो..
स्त्रीयांना डोळे फाडून पाहतो..
सेटिंग साठीच उशिरा पर्यंत...
डांडियाचा अट्टाहास राहतो..!!

रंग बदलण्याच्या स्पर्धेत..
सरडयाला आम्ही मागे सारतो..
बेगडी बेरंग उपास-ना मग..
बेमालूम एक फार्स ठरतो..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

।। ध्यास / हव्यास ।।

।। ध्यास /हव्यास ।।
दिवस रात्र..मात्र स्वप्नांचा ध्यास..
ध्यास म्हणु की..म्हणु हव्यास..!!

जगण्याच्या उरावर..नाचे पैशाची रास..
कमावले कोणी..कोणी गमावले श्वास.!!

आधीच उल्हास..त्यात फाल्गुन मास..
हिरवतो कोणी..कोणा मुखाचा घास..!!

जीवन उरले..नुसतेच मृगजळी भास..
विश्वासु वळणावर..दगा फटका हमखास..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Friday, 26 September 2014

II तुझी आठवण II



II तुझी आठवण II

तुझी आठवण..
माझ्या मनाची साठवण..
जपले मी अंतरात..
वेचून ते प्रत्येक क्षण..!!

येता भरून मन..
आठवतो सोनेरी क्षण..
हुरहूर लावे मनास..
अखेरच्या तो शब्द व्रण..!!

नसे कोणी सोबती संगती..
उडून गेले पक्षीगण..
घरटे माझे सूनेच राहिले..
अन सोबतीला मात्र आठवण..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

।। नऊवारी ।।



।। नऊवारी ।।
नऊवारी तू साडी नेसतेस..
काय सांगू तुला..
तू लय भारी दिसतेस..
शुक्राची चांदणी धरणीवर आली..
अक्षि तू मला तशीच भासतेस..!!

मान वेळावून अशी काय पाहतेस..
काय सांगू तुला..
तू बेभान मला करतेस..
हरिणी वानी चाल चालता..
काळजाच माझ्या ठोका चुकवतेस..!!

मधेच मधाळ हास्य पेरतेस..
काय सांगू तुला..
तू मोती बरसतेस..
ध्यानात,मनात,स्वप्नात तूच..
हृदयावर माझ्या राज्य तू करतेस..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

II सत्तेची साठमारी II


II सत्तेची साठमारी II
बाण भात्यातुन सुटला..
कमळ गाळात रुतला..
जागा वाटपाचा घोड़ा..
चर्चेमध्ये नाहक अडला..!!

स्वबळाची भाषा आता..
जो तो पुन्हा करू लागला..
सत्तेच्या ह्या साठमारीत..
घड्याळ विसरला हाताला..!!

इंजिन विसावलय यार्डात..
ब्लू प्रिंट झंडी दावेना..
विशाल निळ्या ढगाला..
आकाश कुठेच गावेना..!!

बघावं तिकडे मुख्यमंत्री..
इच्छुकांची वाढतेय जंत्री..
हवसे गवसे नवस्यानाही..
विजयाची मात्र वाटतेय खात्री..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Friday, 19 September 2014

।। अश्रु ।।



।। अश्रु ।।
तुझे अस्तित्व केवळ आभास..
मज आता कळते आहे..
मृग जळातील काजळ स्वप्न..
मज आणिक छळते आहे..!!

नाहीस तू माझ्या जीवनात..
मज आता कळते आहे..
वाटेवर तुझ्या अजुनही..
नजर माझी वळते आहे..!!

गेले दिन नाही पुन्हा यायचे..
मज आता कळते आहे..
कांचनमृगा मागे मन माझे..
वेडे अधिक पळते आहे..!!

पाझर नाही फुटणार पत्थरास..
मज आता कळते आहे..
मळभलेले मन माझे तिथे..
अश्रु चार ढाळते आहे..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

Tuesday, 16 September 2014

II बाजार वेदनेचा II



II बाजार वेदनेचा II
वेदनेच्या बाजारात..
कळीचा भाव आहे..
जखमा खपविण्याचा..
तो नवा डाव आहे..!!

कवितेतेच्या वेष्टनाचा..
योग्य सुजाव आहे..
भावना भेसळीला..
मुबलक वाव आहे..!!

बाजारात मनाचा..
झाला शिरकाव आहे..
वेदनेने घेतला..
मनाचा ठाव आहे..!!

जीवनावर वेदनेचा..
भलताच प्रभाव आहे..
वेदनेच्या बाजारी..
आता..
जगण्यास मज्जाव आहे..!!
चकोर
(सुनिल पवार)

।। पितृ पक्ष ।।




।। पितृ पक्ष ।।
==========
पितृ पक्ष आला..
बाळाला बाप आठवला..
जिवंतप्णी यानेच..
मज वृद्धाश्रमी पाठवला..!!


श्राद्ध घालेल भव्य..
मोजदाद नसेल पक्वान्नाला..
हयातित माझ्या..
मी मोताद होतो अन्नाला..!!

हार घालेल फोटोला..
उत येईल पुजेला..
प्रत्यक्ष मी असताना..
नाही स्पर्शिला कधी पायाला..!!

नको व्यर्थ दिखावा बाळा..
नाही हव्यास मज कसला..
आठवणीत ठेव नित्य मला..
सुख लाभेल मम आत्म्याला..!!
**********सुनिल पवार....

Monday, 8 September 2014

।। भाव मनाचे ।।




।। भाव मनाचे ।।
भाव मनाचे ना जाणिले..
व्यर्थची रुपास भुलले..
सुंदर असते मन खरे..
त्यास कुठे तू पारखले..!!

होते ज़रा वेडे मन..
भावनांनी जसे भरले..
हळवे मन मागे उरले..
मन तुझे असे फिरले..!!

मन असते सुंदर चितवन..
आज तुज कसे स्मरले..
तेज चंद्राचे अवसेत विरले..
जरेने तुज होते घेरले..!!
*चकोर*

II निरोप II


निरोप..

हर्ष उल्हासात रमवून आम्हा
आज बाप्पा घरी चालले..
निरोप तुम्हा देता देवा
नेत्र आमचे भरून आले..!!


ठावूक आहे आम्हास बाप्पा..
सर्व व्यापी आहात तुम्ही..
औपचारिक असते तुमचे जाणे
तरी ही कासाविस होत असतो आम्ही..!!

अंतरातून साद घालतो देवा  
गणपती बाप्पा मोरया..
वाट तुमची पाहतो देवा
पुढच्या वर्षी लवकर या..!!
--सुनील पवार..

Thursday, 4 September 2014

II विश्वाधिपती गणपती II


II विश्वाधिपती गणपती II
तुझ्या कृपेचा हात मस्तकी..
त्राता तू गणपती..
विघ्न विनाशक बुद्धिदायक..
तू विश्वाधिपती..ss
तू विश्वाधिपती..!!

तुझ्याच कवनी रमलो आता..
अल्प माझी मती..
रिद्धि सिद्धिचा तू अधिनायक..
द्या मजला सन्मति..ss
द्या मजला सन्मति..!!

आतुरले हे नयनही माझे..
वाट तुझी पाहती..
गणाधिपती तू अष्टविनायक..
दर्शन द्या साक्षाती..ss
दर्शन द्या साक्षाती..!!

अपराध माझे कोट्यान कोटी..
घ्या तुम्ही उदराती..
भक्तवत्सला तू सुखदायक..
झाली मज उपरती..ss
झाली मज उपरती..!!

शरण मी आलो देवा तुजला..
चरणाची मज प्रीती..
वक्रतुंड तू सिद्धिविनायक..
करितो तव आरती..ss
करितो तव आरती..!!
*चकोर*

Tuesday, 2 September 2014

।। गौराई ।।



II गौराई II
=======
लेक लाडकी लाडकी..
आली माहेरी गौराई..
साडी चोळी मानवुन..
करू या सरबराई..!!

आई गौराई गणाची
बसे गणाच्या शेजारी..
संगे शिव चंद्रमोळी..
करु पुजेची तयारी..!!
झिम्मा फुगडीच्या संगे..
रात्र उत्साही जागेल..
आगमनाचा सोहळा
माझ्या अंगणी रंगेल..!!
पाहुणचार घेऊन
गणासवे ती जाईल..
माहेराचा दरवळ..
नित्य हृदयी राहील..!!
जशी गौराई पुजता..
तशी पूज्य लेक जाणा..
खुडू नका उदरात..
तिला खेळू द्या अंगणा..!!
***सुनील पवार...