|| मी घाबरतोय भिजायला ||
तप्त सुर्यास डोक्यावर घेऊन
असंख्य प्रहार मनावर झेलत
तो स्थितप्रज्ञसा अजूनही उभा आहे
ओरबाडले त्यास दुनयेने जरी
अन् पोखरुन गेलय जर्जर शरीर तरीही
तो बोलत नाही कुणास काही।
एखाददुसरा कनवाळु जलद
अवचित त्या वाटेने येतो कधीतरी
अन् सावली धरु पाहतो त्यावर
पण कळेना त्याला रोष कसला
की भास्कराचा सहवास वाटतोय बरा
तो असा फटकुन वागतोय तरी कोणावर?
मी सहज विचारले त्याला,
बाबा काय झाले असे चिडायला
तुला आवडत नाही का भिजायला?
बघ ना! त्या पानाफुलांना, वेली तरुंना
बघ ना! प्राणीमात्रांना आणि प्रत्येक माणसाला
किती आतुरले आहेत ते पाऊस झेलायला।
दुःखी होऊन तो उत्तरला,
वाटते ना मनसोक्त भिजावं कधीतरी
अन् भिडावं मदमस्त वाऱ्याला
जिरवावं समस्त आभाळ उदरात
अन् वाट द्यावी शुभ्र झऱ्याला
पण हरवलीय माझी हरित छत्री
सांग कसा झेपवू मी पावसाला?
घडेल एखादे माळीण पुन्हा
म्हणून मी घाबरतोय भिजायला।
--सुनिल पवार..

No comments:
Post a Comment