Tuesday, 4 April 2017

|| मुळाक्षरे ||

|| मुळाक्षरे ||
========
आठवतंय स्पष्ट
लहानपणी आईचं
बोट धरून गिरवलेली
ती मुळाक्षरे
अ आ इ ई
ग म भ न
त्या पुढे जोडलेले ते शब्द
अ रे अननसातला
ग रे गणपतीतला..
किती लोभस भासायची
तेव्हा ती अक्षरं
जणू अंगावर
तलम मोरपीस फिरायचे
हृदयात झरझर अमृत पाझरायचे..!!

आता
उलटून येतात अंगावर
तीच अक्षरं
अ ला अरे म्हणत
क ला कारे म्हणतात..
ग चा गाढव झाला
ल च्या लाथा हाणू लागला..
ज जातीत विभागला
बदकातला ब
बदल्यात गुंतला..
आता
खरंच वाटू लागलंय मनाला
मराठीचं काही खरं नाही
लोक म्हणतात तेच खरं असावं
इंग्रजी शिवाय ह्या राष्ट्राला
दुसरा कोणता पर्याय नाही
पण तरीही सांगू इच्छिते की 
माय मराठीची सर 
इंग्रजी पुतना मावशीस येणार नाही..!!
***सुनिल पवार...✍🏽🙏

No comments:

Post a Comment