Saturday, 29 April 2017

|| यातनांचे घर ||

|| यातनांचे घर ||
==========
अनंत यातनेच्या
या घरात
किती
बिनभाड्याचे
भाडेकरू राहतात..?
लावू पाहतात
घरास घरघर
त्यावर
कब्जा करू पाहतात..!!

मिळेल ती जागा
व्यापून बसतात..
जसे
त्यांच्याच बापाचं
हे घर..
कुठे बीपी, कुठे शुगर,
कुठे कँसर
तर कुठे
सर्दी, खोकला
अन मुदतीचा ज्वर..!!
कधी जोंजारतो
त्यांना
कधी हुसकावून लावतो
कधी हतबल होतो
कळत नाही
आवरू तर कसं आवरू..?
शहाणे असतात
त्यातील काही
ते निमूट निघून जातात
पण त्यातलेच काही
अडेल निघतात
ते जुमानत नाही कशास
मग
कितीही बांधा गंडे दोरे
किंवा
करा खुशाल दवादारू..!!
कसेल त्याची जमीन
घुसेल त्याची जागा
असंच जणू समजतात
काही हक्कही गाजवतात..
आपला हिस्सा
लीलया काढून घेतात..
जणू हक्काचे वारसदार
असल्यासारखेच ते वागतात..!!
रोग असो वा
असो नात्यांचा गोतावळा..
शीतं तिथं भुतं
हे ठरलेलेच असते..
माणसाचं शरीर असो
वा असो
त्याच्या मालकीचे घर
केवळ म्हणण्यापुरते
ते त्याचे असते..
आज ना उद्या
परंतु
तेच दुसऱ्याच्या स्वाधीन
होणार असते..!!
***सुनिल पवार....✍🏽

No comments:

Post a Comment