|| भीमा तुझ्या प्रज्ञेने ||
============
तिमिराचे चिरुनी काळीज
पहाट नवी झाली..
भीमा तुझ्या प्रज्ञेने
वहिवाट बदलली..!!धृ!!
पिचलेल्या जनतेमध्ये
जान नवी आली..
समतेच्या किरणांनी ही
वाट सुकर झाली..
पसरल्या हातांचीही
वज्रमुठ झाली..
भीमा तुझ्या प्रज्ञेने
वहिवाट बदलली..!!
बाळ तडफडे पाण्याते
तहान बहू लागली..
तरी दृष्ट धर्मांधांस
दया नाही आली..
आग लावून पाण्यास
तळी खुली केली..
भीमा तुझ्या प्रज्ञेने
वहिवाट बदलली..!!
चहूओर जातीयतेची
अराजकता वाढलेली..
विटाळाच्या वेटोळ्यात
छाया घुसमटलेली..
दिली धर्मा तिलांजली
मुक्त झाली सावली..
भीमा तुझ्या प्रज्ञेने
वहिवाट बदलली..!!
बहु झाले विरोध जरी
पर्वा नाही केली..
संविधान लिहून तयांना
चपराक दिली..
महामानव बाबा माझा
जनता बोलू लागली..
भीमा तुझ्या प्रज्ञेने
वहिवाट बदलली..!!
***सुनिल पवार...✍🏼
No comments:
Post a Comment