Wednesday, 9 November 2016

|| दुसरी बाजू ||

|| दुसरी बाजू ||
==========
कळतंय मला
तू मांडतोस तुझ्या शब्दांतून
माझ्या मूक वेदनेची सल
दिसतेय मला
त्यामागची तुझी कणव..
भिडतेय ती तुझ्या शब्दांतून
लोकांच्या हृदयापर्यंत
मी ही करतेय रे
भरभरून तुझं कौतुक
पण
सांगावसं वाटतंय रे
त्यामध्येही आहे अजूनही
बरीचशी उणीव..!!

तू दाखवतोस ती
निर्विवाद आहे
नाण्याची एक बाजू
परखड आणि सत्य..
पण पाहिलीस का कधी
त्याच नाण्याची दुसरी बाजू
पाहशील तर कळेल तुजही
त्याविना आहे रे सारेच मिथ्य..!!
वाईट वाटून घेऊ नको तू
सत्य जरा कडवट आहे
पुरुषांच्या अधिसत्तेत
स्त्री ची नित्याची परवड आहे..
मग वादळ प्रेमाचं असो
वा असो साहनभूतीचं
वाळूच्या आधारात
झाडाची निश्चित पडझड आहे..!!
आता हेच बघ ना,
माझ्याच वेदनेच्या भांडवलावर
तू तात्काळ प्रसिद्धीस येतोस
सर्वत्र तुझा उदो उदो होतो
स्त्री उदार मतवादी म्हणून
जो तो तुलाच नावाजतो..!!
फायदा तुझा होतो
पण माझं काय..?
मी मात्र अजूनही त्याच
निराशेच्या खोल गर्गेत
वेदनेशी झगडतेय
आपल्या अस्तित्वाशी लढतेय
सल मिटता मिटत नाही
खंत अजून तशीच आहे
चारचौघात मिरवणारा
माझा सखा, मित्र, हितचिंतक
अंधारात तसाच वर्चस्वास हपापलेला
केवळ एक पुरुष असतो..!!
***सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment