Monday, 7 November 2016

|| वेदना ||

|| वेदना ||
=======
सहज बोलता बोलता
बोलली ती
वेदनेने भरलेल्या
ह्या वेदनेच्या घरात
तुला
वेदनेशिवाय
काही मिळणार नाही..
मी ही हसून म्हटले
याच वेदनेच्या डोहात
अंतरबाह्य
डुबक्या मारल्याशिवाय
हृदयाचा तळ
तसाही कोणाला
कळता कळणार नाही..!!

ती किंचितशी हसली
म्हणाली,
सगळे शब्दांचे खेळ आहेत..
ऐकलेस कधी.?
वेदनेशी नाते
हसत कोणी जुळवले आहे..?
आणि निव्वळ शब्दांनी
तरी कुठे कधी
वेदना मिटली आहे..?
मी पुन्हा हसलो
म्हणालो,
तू तरी मला कधी
नीटसे पाहिले आहे..?
पाहिले असतेस तर
जाणले असते
ह्या हास्यामागची खरी प्रेरणा
कोण आहे..
आणि शब्दांचं म्हणशील तर
इतकंच सांगेन
माझ्या ह्याचं शब्दांनी
किंचित का होईना
तुझ्या ओठी
हास्य पेरलेलं आहे..!!
***सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment