मैत्री..(तिच्यातील ती)
आज मी सहज दिल्या
तिला मैत्री दिनाच्या शुभेच्छा
तर म्हणाली, अशा कोरड्या नको
कवितेतून दे मला
त्याशिवाय रंग चढत नाही मैत्रीला।
मी हसलो व म्हणालो
हल्ली मैत्रीला ते झेपत नाही।
आणि खरं सांगायचं तर
साखर घोळायला मला जमत नाही।
ती चिडली अन म्हणाली,
गरजच नसते!
मुळात साखरेहून गोड असते मैत्री
तू तिला निखळ अलंकारांची जोड दे।
आता दुराग्रह सोड
अन शब्दांना आत्मिक ओढ दे।
मी पुन्हा हसलो अन उत्तरलो,
दुराग्रह नाही गं!
हा तर मैत्रीचाचं आग्रह आहे
बदलत्या वातावरणात
तिनेच बदललेला प्रवाह आहे।
आता पूर्वीसारखी राहिली नाही ती
वरवर दिसते निखळ निर्मळ शांत
पण तिच्या अंतरात प्रचंड दाह आहे।
ती पुन्हा चिडली व म्हणाली
तुझं तर काही कळतंच नाही
तुला दिसते तसं माझ्या मैत्रीत नाही।
आता तू लिही अथवा लिहू नको
मी आग्रह करणार नाही
आणि एकच सांगते
हाताची सर्व बोटे सारखी नाहीत।
मी गहिवरलो अन म्हणलो
माझ्या म्हणण्याचा तसा मतितार्थ नाही
आणि नाकारत नाही
तुझ्या म्हणण्यात काही तथ्य नाही
पण हे ही तितकेच खरे आहे
जे दिसते ते पूर्णतः सत्य नाही
आणखी एक!
जगाचे संदर्भ मी तुला लावणार नाही
कारण तुला उणे करून
मैत्रीची परिभाषा पूर्ण होणार नाही।
--सुनिल पवार..

||मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा||
234
People Reached
18
Engagements
No comments:
Post a Comment