| वाटप ||
=======
न जाणे
किती तपांचा अनुभव तुझ्या गाठीशी
पण तुला अजूनही कळत नाही
कुणाला किती थेंब वाटायचे..?
गरजवंताची तहान भागवायची
की जो मर्जीतला भेटला त्यावर लुटत सुटायचे..??
काही ठिकाणी तर तुझे दान झेलायला,
लोकांचे हात अपुरे पडतात
पण तुझे वाटप काही थांबत नाही..
अन मग विध्वंस होतो सत्कार्याचा
पण त्याचं सोयरंसुतक तुला वाटत नाही..!!
काही ठिकाणी तर
पसरलेले हात तशाच अवस्थेत राहतात
पण त्यांच्याकडे तुझं लक्षच नसते..
तू शिंतडल्यासारखे करतो केवळ
अन धार मात्र त्यांच्या डोळ्यास लागते..!!
कुणा मुखी लोणी
तर कुणाच्या नशिबी अंधार
असाच दिसतो तुझा बारभाई कारभार..
न जाणे तुझ्या राज्यात अशी
कोणाची निवडून आलीय सरकार..??
तुझ्या या विसंगत शिडकाव्याने सांग
मनाची होरपळ कशी शमणार..?
हतबलता आमची विसंबून राहण्याची
आणखी वेगळे दिवस तरी काय दाखवणार..??
--सुनिल पवार..

No comments:
Post a Comment