Showing posts with label होळी गीत. Show all posts
Showing posts with label होळी गीत. Show all posts

Thursday, 21 March 2019

रंगात रंगाच्या...

रंगात रंगाच्या...
तिला
रंगाचा तिटकारा होता
म्हणून
ती घरात बसून राहिली
आणि
सर्व संपल्यावर
बऱ्याच वेळाने बाहेर पडली..!!
रस्ते सुनसान होते
पण जागोजागी रंगांचे अस्तित्व
ठळकपणे दिसून येत होते
लाल,निळा,पिवळा,हिरवा,गुलाबी
काही सुकलेले
तर काही अजूनही ओले होते..!!
ती
दबकत सावरत चालत राहिली
रंगहीन रस्ता शोधत राहिली
पण तिच्या लक्षात आले नाही
की त्याच रंगाने
तिची पावले नकळत रंगत गेली..!!
***सुनिल पवार...✍🏽

होळी रे होळी...

होळीच्या हार्दिक शुभेच्छा...
होळी रे होळी
पुरणाची पोळी..
आटून गेली तळी
खेळा कोरडी होळी..!!
होळी रे होळी
एकोप्याची हाळी..
रंग वर्ण भेदाची
तोडू या साखळी..!!
**सुनिल पवार...✍️

Monday, 23 April 2018

ll उत्सव होळीचा ll


II रंगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा II
==================
उत्सव होळीचा,
उत्सव संस्कृतीचा
अनितीस जाळून, 
सद्-भाव जपण्याचा.!!
उत्सव तनाचा,
उत्सव मनाचा
मतभेद विसरून,
मनोमिलन घडविण्याचा..!!
उत्सव नात्याचा,
उत्सव प्रेमाचा
रंगात तयाच्या रंगून,
चिंब चिंब भिजण्याचा...!!
****सुनिल पवार....✍🏼

Monday, 13 March 2017

|| होळीच्या सणाला ||

|| होळीच्या सणाला ||
=============
अचानक ती समोर आली
अन
हसत तिने
रंग लावला गालाला..
बऱ्याच वर्षांनी
तिचा स्पर्श अनुभवला..
असेल
तो गालही सुखावला..!!
सहज
विचारले तिने मला..
का रे
तुझे हात असे कोरे..?
लावणार नाहीस का रंग मला..??
तुझा, तो उत्साह
सांग कुठे मावळला..??
किती आतुर दिसायचा तेव्हा
रंग फासण्यास मला
आवडायची मला ही
तुझी लगट करण्याची कला..!!
मी हसलो उत्तरलो
कळलंच नाही ग
त्या वळणावर हात सुटला
अन उत्साह कुठे हरवला..?
बहुतेक
तुझ्या सोबत तो गेला असावा..
अथवा, तुझ्या रंगात तो ही
विलीन झाला असावा..?
कोऱ्या हातावर जाऊ नको
माझ्या
बघ एक एक रंग
मी अजूनही मनात जपला..
कदाचित नसेल तुला दिसला
पण
तुझा हर एक रंग
अजूनही रंगवतो मला..
तरीही नाही दिसला तो
कधीच कोणाला..!!
मी
दुरूनच पाहतो तुला..
तुझ्या नयनांचा
रंग निळा खुणावतो मला..
तुझ्या खळीदार गालाची
गुलाबी रंगछटा
सुखावते मनाला..
तुझ्या काळ्याभोर केसात
गुंतावसं वाटते क्षणाक्षणाला..
तुझा श्वेत रंग
वाटतो
लपेटून घ्यावा अंगाला..
पण
तुझ्या भाळाचा रंग लाल
क्षणात अडवतो मला..
असंच होतं गं
प्रत्येक होळीच्या सणाला..!!
***सुनिल पवार...✍🏽 



Sunday, 12 March 2017

मागणी

|| होळीच्या हार्दिक शुभेच्छा ||
==================
मी,
जमा करतोय आज
तिरस्काराची लाकडे,
मत्सराच्या गोवऱ्या,
हेव्यादाव्याचं गवत..
मला होळीत दहन करायचं आहे
ज्वाळ गगनास भिडवायचा आहे
तुम्ही करता का थोडी मदत..?
आज
जमावायचे आहेत सारे रंग एकत्र
काळा, पांढरा,
लाल,भगवा,निळा,हिरवा इत्यादी..
झाकायची आहे त्याच रंगात
जात,धर्म,कर्म, आणखी बरचं काही
फक्त माणूस कळला पाहिजे
माझी मागणी आहे
इतकीच सरळ आणि साधी..!!
***सुनिल पवार...✍🏽

Thursday, 24 March 2016

|| शामल रंगात ||

शामल रंगात..

भिजवु नको तू नाहक कान्हा
बघ आटल्या विहरी, तळी..
अन् थेंब थेंब पाण्यासाठी
वणवण करती पोरी बाळी..!!

वाटत असेल तुला कान्हा
मी जपतेय माझी कोरी साडी..
पण पाहवत नाही रे मला
अशी नाहक पाण्याची नासाडी..!!

कान्हा, कळतयं रे मला
तू रंगवु पाहतो तुझ्या ढंगात..
पण बघ कशी भेगाळतेय भुई
महाराष्ट्रच्या दुष्काळी भागात..!!

तू करू नको उगाच शिरजोरी
कान्हा मारू नको रे पिचकारी..
तुझ्याच शामल रंगात रंगते
मी तुझीच रे राधा बावरी..!!
--सुनिल पवार..✍️

Wednesday, 4 March 2015

II होळीच्या सणाला II

II होळीच्या सणाला II
============
इतकेच करा मित्रहो,
यंदा होळीच्या सणाला..
आ वासून उभा दुष्काळ
जपा पाण्याच्या थेंबाला..!!

नको पिशव्यांचा मारा
घाला प्लास्टिकला आळा..
नको विरजण आनंदाला
रंग नैसर्गिक उधळा..!!
निसर्गाची कास धरा
शेण्या गोवऱ्याच जाळा..
चुकवा आरिष्टाचा फेरा
-हास जंगलाचा टाळा..!!
करा विचार वेगळा..
निसर्ग नियमावली पाळा..
सुज्ञ आहात तुम्ही सारे
थोपवा दुष्काळी झळा..!!
*********सुनिल पवार....

Wednesday, 23 April 2014

।। रंगात तुझ्या ।।

रंगात तुझ्या..
रंगात तुझ्या अंगअंग रंगु दे..
सखे, आज संग होळी खेळू दे..!!
लाल चुटुक ओठाची, लाली ओठी रुजू दे..
अंग अंग तुझं सखे, आज रंगी भिजु दे...
पापणी डोळ्यांची तुझ्या, हळूच खाली वळु दे...
सखे, आज संग होळी खेळू दे..!!
खळीदार गालांचा, गुलाल गाली खुलू दे..
बघुन तुझ्या रंगास, मन माझे भुलु दे..
लोचनात स्वप्न नवे, सप्तरंगी फुलू दे..
सखे, आज संग होळी खेळू दे..!!
नील रंगी नयनांची, निळाई मज पिऊ दे..
नजरेने पाज सखे, आज नशा होऊ दे..
मदहोश मी रंगात, तोल जरा ढळू दे..
सखे, आज संग होळी खेळू दे..!!
रंगात तुझ्या अंगअंग रंगु दे..
सखे, आज संग होळी खेळू दे..!!
***सुनिल पवार...✍🏽