Monday, 13 March 2017

|| होळीच्या सणाला ||

|| होळीच्या सणाला ||
=============
अचानक ती समोर आली
अन
हसत तिने
रंग लावला गालाला..
बऱ्याच वर्षांनी
तिचा स्पर्श अनुभवला..
असेल
तो गालही सुखावला..!!
सहज
विचारले तिने मला..
का रे
तुझे हात असे कोरे..?
लावणार नाहीस का रंग मला..??
तुझा, तो उत्साह
सांग कुठे मावळला..??
किती आतुर दिसायचा तेव्हा
रंग फासण्यास मला
आवडायची मला ही
तुझी लगट करण्याची कला..!!
मी हसलो उत्तरलो
कळलंच नाही ग
त्या वळणावर हात सुटला
अन उत्साह कुठे हरवला..?
बहुतेक
तुझ्या सोबत तो गेला असावा..
अथवा, तुझ्या रंगात तो ही
विलीन झाला असावा..?
कोऱ्या हातावर जाऊ नको
माझ्या
बघ एक एक रंग
मी अजूनही मनात जपला..
कदाचित नसेल तुला दिसला
पण
तुझा हर एक रंग
अजूनही रंगवतो मला..
तरीही नाही दिसला तो
कधीच कोणाला..!!
मी
दुरूनच पाहतो तुला..
तुझ्या नयनांचा
रंग निळा खुणावतो मला..
तुझ्या खळीदार गालाची
गुलाबी रंगछटा
सुखावते मनाला..
तुझ्या काळ्याभोर केसात
गुंतावसं वाटते क्षणाक्षणाला..
तुझा श्वेत रंग
वाटतो
लपेटून घ्यावा अंगाला..
पण
तुझ्या भाळाचा रंग लाल
क्षणात अडवतो मला..
असंच होतं गं
प्रत्येक होळीच्या सणाला..!!
***सुनिल पवार...✍🏽 



No comments:

Post a Comment