Showing posts with label बाल गीत. Show all posts
Showing posts with label बाल गीत. Show all posts

Tuesday, 25 August 2020

थोड्याच अवधीत येतील बाप्पा

 *बालगीत*

।। बाप्पा ।।

========

थोड्याच अवधीत,

येतील घरी बाप्पा..

दरमजल करीत,

गाठतील ते टप्पा..!!


विसावतील पाटावर,

बसतील सुंदर मखरात..

अकरा दिवसांचा,

उत्सव सजेल घरात..!!


पाहुण्यांची असेल,

रोज घरीं वर्दळ

लाडू मोदाकांची,

छान होईल चंगळ..!!


रूप साजिरे,

देखणे गोजिरे छान..

बाप्पा तुम्हास पाहता,

आमचे हरपते भान..!!

*चकोर*✍🏼

Friday, 24 July 2020

धाडू कुणास मी आर्जव पत्र..

धाडू कुणास मी आर्जव पत्र..

सुट्टीचा आनंद उपभोगणाऱ्या मनाला
आज मात्र तुझी उणीव भासतेय।
तुझ्याशिवाय बालपण अधुरे
याची प्रकर्षाने जाणीव होतेय।
मित्र सवंगडी सारेच दुरावलेत
खोड्या, दंगामस्ती मौन झालीय।
रोजचा अभ्यास आणि गृहपाठ
आता सर्वच जणू गौण झालंय।
ऑनलाईन अभ्यास आहे
पण त्याला वर्गातील गोडी नाही।
नजर चुकवून सहज केलेली
मागच्या बाकावरची खोडी नाही।
वह्या सुद्धा अजून कोऱ्या आहेत
पेन पेन्सिलला विराम लागलाय।
खाकी कव्हराची तर बातच नाही
दप्तर सुद्धा धूळ खात पडलंय।
तसे गणवेशाचे अप्रूप नव्हते कधी
पण तोही कुठे मळत नाही।
अन् त्यावरून मिळणारा प्रसाद
आता आईकडून मिळत नाही।
आता पावसाळाही सुरू झालाय
पण शाळा अजूनही बंद आहे।
कोरोना नावाच्या बागुलबुवामुळे
सुट्टीचा आनंद हिरावला आहे।
कधी बदलणार हे घरकोंडीचे चित्र
कधी सुरू होणार शाळेचे सत्र।
कोण घेईल दखल ही मनाची?
धाडू कुणास मी आर्जव पत्र।
--सुनील पवार..✍️
भारत जगताप, पूजा शिंपी बागुल and 14 others
4 Comments
Like
Comment
Share

Tuesday, 29 January 2019

आज सकाळी....

आज सकाळी (बाल कविता)
==================
आज सकाळी
गारठला वारा..
धावे सैरावैरा
मिळे ना थारा..!!
आज सकाळी
सूर्य उगवला..
आईने धरला
कपाळी लावला..!!
आज सकाळी
ऊन पडले..
माणसांचे त्यावर
जीव जडले..!!
आज सकाळी
झाडेफुलें भिजली..
दवाने त्यांना
अंघोळ घातली..!!
आज सकाळी
मन प्रसन्न झाले..
दप्तर घेऊन
शाळेकडे निघाले..!!
**सुनिल पवार...✍️

Monday, 23 April 2018

|| गेलो होतो रानात ||


गेलो होतो रानात..

गेलो होतो रानात
मोर भरला मनात..
मी म्हणालो त्याच्या कानात
नाच आंब्याच्या बनात..
मोर म्हणाला नको,नको
काळा पडेन मी उन्हात..!!

गेलो होतो रानात
ससा दिसला बिळात..
मी म्हणालो त्याच्या कानात
चल शर्यत लावू जोरात..
ससा म्हणाला नको,नको
घेरी येईल ना उन्हात..!!

गेलो होतो रानात
माकड होते झाडात..
मी म्हणालो त्याच्या कानात
झोके घेऊ आनंदात..
माकड म्हणाला नको,नको
कायली झालीय रे उन्हात..!!

गेलो होतो रानात
त्राण दिसेना कोणात..
आंबा दिसला पाडात
आणि कोडे सुटले क्षणात..
आमरसाच्या स्वादाने
मोद फुलला उन्हात..!!
--सुनिल पवार..✍🏼

Friday, 13 January 2017

|| या बाळांनो या रे सारे ||

औरंगाबादच्या पिंपळखुंटा जिल्हा परिषद उच्च शाळेला iso प्रमाणपत्र घोषित झाले. त्याच्या वितरण सोहळ्यात शाळेच्या मुख्याधिपिका सौ.हेमलता प्रकाश जोशी यांच्या आग्रहाखातर मी लिहलेली "या बाळांनो या रे सारे" ही कविता प्रस्तुत करून त्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली
👇🏽
|| या बाळांनो या रे सारे ||
================
ज्ञान मंदिराचे सच्चे
उपासक आपण सारे..
शिक्षणाची कास धरू
या बाळांनो या रे सारे..!!

अक्षराच्या वृक्षावरती
किलबीलती विविध पाखरे..
झेपावतील आकाशी
या बाळांनो या रे सारे..!!
ABCD अन बाराखडी
धडे गिरवू मोदभरे..
आत्मसात करू सूत्र गणिती
या बाळांनो या रे सारे..!!
इतिहास,भूगोल, विज्ञानाचे
वाहू द्या तनमनातं वारे..
शिकाल तर टिकाल सारे
या बाळांनो या रे सारे..!!
ह्या विशाल नभांगणाचे
स्वयंप्रकाशित तुम्हीच तारे..
उजळून टाकू आसमंत
या बाळांनो या रे सारे..!!
****सुनिल पवार... 

Friday, 13 November 2015

|| फुगली बाई करंजी ||

|| फुगली बाई करंजी ||
==============
फुगली बाई करंजी
मनात घाली रुंजी..!!
तिला भेटली शंकरपाळी
खुसखुशीत भारी मधाळी..!!
धम्मक पिवळा चिवड़ा
नमकीन जसा मनकवडा..!!
नटुन आला अनारसे
खसखस पिकली गोड दिसे.!!
वाकडी गोल चकली
तिखट मिठाने माखली..!!
डुलकत आला लाडू
आधी त्याचा फडश्या पाडू..!!
आईने सजवले ताटात
सगळेच गेले पोटात..!!
***सुनिल पवार....✍🏼
दिवाळीच्या दोल दोल तुभेच्छा
म्हणजेच *गोड गोड* शुभेच्छा😃

Monday, 15 June 2015

|| शाळा सुरु झाली ||

*बालगीत*
शाळा सुरु झाली...
शाळा सुरु झाली
चला करूया तयारी..
बाबांनी आणलंय
दप्तर लई भारी..!!
रंगबिरंगी कंपास
मस्त खाऊचा बॉक्स..
नव्या गणवेषावर
नवे बूट आणि सॉक्स..!!
नवा कोरा रेनकोट
पावसा तूच आता घाबर..
खुशाल ये बरे
तू घेऊन मोठी सर..!!
आली आली गाडी
आता चललो मी शाळेत..
पहिली घंटा होईल
तेव्हा जायला हवे वेळेत..!!
--सुनिल पवार..✍️

Friday, 29 August 2014

।। बाप्पा ।।

||__/!\__ बाप्पा__/!\__ ||
================
मन प्रसन्न होते रे माझे
बाप्पा तुला घरी पाहुन
दुखः आमच्या पाचविला जरी
तरी जातो आनंदात नाहुन..!!


उंदीर मामा रोजच फिरतो
रात्री बेरात्री संचार करतो
तू मात्र वर्षातून एकदा येतो
म्हणूनच उर भरून येतो..!!

उकडीचे मोदक नाही जरी
गव्हाचे ज़रा पाहा चाखुन
संपलय रेशन कळेलच तुला
ठेवलय नाही काहीच राखून..!!

सोसत नाही विजेचा भार
म्हणून भागव तू त्या सूर्यावर
चंद्राचा उजेड कमीच भासेल
हसु नको हां माझ्या औंदर्यावर..!!

पाहुन घे माझा राजमहल
पुढच्या वर्षी असेल नसेल
माझ्या मनात मात्र बाप्पा
तुझं स्थान अढळ असेल..!!
******सुनिल पवार.....

Friday, 16 May 2014

आला आला पाउस आला..

बालगीत...
:::II आला पाऊस II:::
आला आला पाऊस आला
बेडूक दादा आला खेळायला..
खुशीत ओरडत डराव डराव
धन्यवाद दिले त्याने पावसाला..!!
आला आला पाऊस आला
मोर थुई थुई नाचु लागला..
एक पाय दुमडून, पिसारा फुलवून
धन्यवाद दिले त्याने पावसाला..!!
आला आला पाऊस आला..
चातकाला आनंद झाला..
एक थेंब चाखून उडाला भुर्रकन
धन्यवाद दिले त्याने पावसाला..!!
आला आला पाऊस आला
शाळेभोवती तलाव साचला..
सुट्टी मिळाली मग शाळेला
धन्यवाद दिले मी पावसाला..!!
--सुनिल पवार...✍️



Monday, 28 April 2014

II आम्ही मुले II



II आम्ही मुले II
==========
आम्ही मुले..
देवा घरची फुले..
निगर्वी निरागसता..
आमच्या चेह-यावर डुले..!!

आम्ही मुले..
पंख चिमुकले..
स्वप्न भरारीचे..
आमच्या डोळ्यात झूले..!!

आम्ही मुले..
विश्वासु पाऊले..
सर्व धर्म समभाव..
आमच्यासवे खेळे..!!

आम्ही मुले..
देखणे सानुले..
दर्शना मात्र..
मोद श्रुष्टीत फुले..!!

*चकोर*