लॉकडाऊन झाली जिंदगी..
लॉकडाऊन झाली जिंदगी
जो तो घरात कैद झाला..
पैशाने आपले चोचले पुरवले
अन् बिनपैशाचा तमाशा झाला..!!
रोग श्रीमंताने आणला
त्यात गरीब भरडला गेला!
हाताला काम नाही,भुकेला अन्न नाही
बिचारा दाही दिशेला लागला..!!
वर्क फ्रॉम होम केले
पण पगार अर्ध्यावर आला..
हातावरच्या पोटाने मात्र
पोटाला चिमटा लावला..!!
वाहतूक सारी बंद झाली
मजूर मैलोंमैल पायी निघाला..
काहींचा मार्गात श्वास कोंडला
अन् घराऐवजी परलोकी पोहचला..!!
अन्न वाटपाचा काहींनी
मोठा राजकीय इव्हेंट केला..
हापापाचा माल गापापा झाला
अन् फोटोंचा पाऊस पडला..!!
मूळचा गरीब धंदेवाला
त्यांनी सक्तीने घरी बसवला..
अन् त्यांच्याच चेले चपाट्यांनी
राजरोसपणे धंदा केला..!!
पांढऱ्या लुटारूंची त्यातच
टोळी सुद्धा सक्रिय झाली..
टेस्टिंग,बेड,औषधांची बिले
लाखालाखाच्या घरात गेली..!!
संभ्रमित आकड्यांचा मग
रात्रीचा खेळ सुरू केला..
पॉझिटिव्ह झाला निगेटिव्ह
आकडा तरीही फुगत गेला..!!
आता आलीय शिथिलता
म्हणे उद्योगधंदे सुरू झाले..
मीही उघडू पहिला दरवाजा
पण बाहेरून टाळे लागलेले..!!
--सुनील पवार..

402
People Reached
22
Engagements
No comments:
Post a Comment