आपला तो बाब्या
अन् दुसऱ्याचा तो कार्टा..
ज्याच्या त्याच्या तोंडी मिळते
त्यांच्याच सोयीची वार्ता..!!
मग राजकारण असो
वा असो जातीय वाद..
बाब्याच्या बेबंद दडपशाहित
कार्ट होतं नेहमीच बाद..!!
झुंडशाहीचा विरोध होतो
मात्र तो सुद्धा झुंडीतून..
सगळीकडे नुसती रेटारेटी
मार्ग मिळेल कसा कोंडीतून..!
बाब्या काय अन् कार्ट काय
गांभीर्य असे कुठे दिसत नाही..
हा दृष्टिभ्रम की मनाचा आजार
प्रश्न साला सुटत नाही..!!
वैरी उभा दारी तरी
जो तो भांडतोय शेजारी..
जणू पाचवीलाच पुजलेली
पूर्वग्रह दूषित महामारी..!!
निदान आता तरी
बाब्याने कार्ट व्हावं
अन् कार्ट्याला बाब्या म्हणावं..
जात, धर्म, पक्ष राजकारण सोडून
देशाचं भलं पाहावं..!!
--सुनील पवार..
