Friday, 30 December 2016

|| भौतिक || नैतिक ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| भौतिक || नैतिक ||
==============
मी सहज
तिला जवळ ओढलं
अन
ती हसून म्हणाली,
अलीकडे पाहतेय मी
दिवसेंदिवस वाढत चाललाय
तुझा कल भौतिकतेकडे..
लक्षण हे बरे नव्हे
जरा वळशील का रे तिथून
कधीतरी नैतिकतेकडे..!!

मी हसलो मिश्किल
म्हणालो
भौतिक, नैतिक
हे केवळ
दोन शब्दांचे बुडबुडे..
आणि सांग ना
नैतिकतेला असते का ग
कधी
भौतिकतेचे वावडे..??
तू उगाचच देतेस
प्रत्येक वेळी
नैतिकतेचे धडे..!!
ती तितकीच ठाम
पुन्हा म्हणाली
तू कितीही बदललेस जरी
शब्दांनी अर्थाचे रुपडे..
इतके मात्र खरे
संयमाच्या कसोटीवर
तुझे शब्द पडतील तोकडे..
सोड ना जाऊदे
तसाही तू
सुधारणार तर नाहीस
ते म्हणतात ना
-- -- चे शेपूट
कितीही वर्ष ठेवा नळीत
वाकडे ते वाकडे..!!
मी ही उत्तरलो
तसाच ठाम
म्हटलं
नैतिकता,भौतिकता
ही तर केवळ
मनाची मानसिकता
असते जिथे एकरूपता
तिथे पडतील कसे सांग
नात्याला तडे..?
असेच असते ग हे प्रेम वेडे
म्हटलं तर सहज सुलभ
अन म्हटलं तर
न उलघडणारे कोडे..!!
****सुनिल पवार....✍🏽 

Thursday, 29 December 2016

|| मृत्युंजय ||

|| मृत्युंजय ||
=========
कळत नव्हते मला
नेमके भाव माझे कोणते होते..
अप्रूप का असूया..??
कृष्णा तुला मात्र कळले होते..
तुझ्या सर्वज्ञ असण्यानेच
माझ्या मनास छळले होते..!!

निःसंशय तुझे स्थान वरचेच होते
हे मी जाणिले तेव्हाच
जेव्हा,
निर्वाणीच्या क्षणी
तू मातेस मजकडे धाडले होते..
शेवटी तू ही आलास..
अन प्रथमच,
मी कोणा याचकास रिते धाडले होते..!!
तसा कळला नाहीस रे तू कधीच मला
मी केवळ कयास लावत होतो
दिल्या वचनाला जागायचं होतं..
पण
मन तुझ्याकडे धावत होतं..!!
तुला अव्हेरून
मी मारणास माझ्या निवडले होते
तसेही ते अटळच होते
अन तुलाही ते ठाऊक होते..
पण एक मात्र जाणले मी
माझे मन वळवताना कृष्णा
तुझे नेत्र भावूक होते..!!
आणि तसंही
मी कुठवर घेऊन जाणार होतो
माझे हे शापित जीवन
माझ्या जीवनाचे दोर
मी स्वतःहुन जे छाटले होते..
कवच कुंडले अभेद्य
केव्हाच इंद्राने लाटले होते..!!
द्यूत पांडव खेळले होते
पण सर्वस्व हरणारा केवळ मीच होतो..
अन तुलाही हे मान्य करावेच लागेल
कृष्णा..
सर्वस्व हरूनही मृत्यूस जिंकणारा
केवळ मी
आणि मीच होतो..!!
***सुनिल पवार....✍🏽

|| रंग हळदीचा ||

|| रंग हळदीचा ||
===========
रंग हळदीचा
चढलाय गोऱ्या गाली..
धडधड हृदयाची
मनाची घालमेल झाली..!!

रूप नवरीचं
तेज निखरलंय भारी..
सोहळा लग्नाचा
मांडव सजलाय दारी..
स्वप्न डोळ्यात
सजली भावी नवेली..
रंग हळदीचा
चढलाय गोऱ्या गाली..!!
लेक लाडाची
कौतुकात वाढली..
बंधू पाठीराखा
मायेची पखरण झाली..
सारी आठवण
साठवण हृदयी केली..
रंग हळदीचा
चढलाय गोऱ्या गाली..!!
दूर देशाचा
येईल राजकुमार..
सासरी नेईल
दुरावेल माहेर..
माय बापाची
ओढ मनी गहिवरली..
रंग हळदीचा
चढलाय गोऱ्या गाली..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| रितेपण ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| रितेपण ||
========
म्हणाली ती,
तुझ्याशिवाय जीवन अधुरे
जशी न भरणारी रिक्त पोकळी..
तुझ्या जवळ असण्याने रे
उमलते माझ्या मनाची कळी..!!

उत्तरलो मी,
रितेपण, अधुरेपण म्हणतात जे
ते नेमके सांगशील काय असते..?
माझ्या केवळ असण्याने
नेमके कसे भरून निघते..??
म्हणाली ती,
असा का रे निष्ठुर वदतो
प्रेमावर जणू शंका घेतो..
कळणार नाही तुला कधीच
माझ्या अवती भोवती तूच असतो..!!
उत्तरलो मी,
शंका नाही मुळीच सखे
मात्र सत्याचे अवलोकन करतो..
रितेपण तू म्हणतेस ज्यास
तो एकांताचा आकांत असतो..!!
म्हणाली ती,
असेलही कदाचित ठाऊक नाही
पण घर खायाला उठते..
असंख्य विचारांच्या वादळात
आठवण अलगद येऊन खेटते..!!
उत्तरलो मी,
अगं घरोघरी मातीच्याच चुली
प्रत्येकाची वेगळी बोली..
गुंतवून घे तू स्वतःस कशात
अन बदलून टाक देहबोली..!!
*****सुनिल पवार....✍🏽😊

|| घे पेहराव ||

|| घे पेहराव ||
=========
आज
सांता आला कॉलनीत
अबाल वृद्धांचा त्यास
गराडा पडला..
हो..हो..हो..
गडगडाटी हसत
हात त्याने पोटलीत घातला..!!

अन काय गंमत
मला..मला..मला..म्हणत
पोरांनी,
एकचं गलका केला..
प्रत्येकास देता देता
सांता आला मेटाकुटीला..!!
मी दुरूनच पाहत हो
सारी गंमत
न जाणे कसे
शिरलो त्या गर्दीत
अन
नकळत हात पसरला..
अचंबित झाला सांता
म्हणाला
बेटा
काय पाहिजे बोल तुला..??
उत्तरलो मी
जास्त काही सांता
हरवलंय सुख
मी केवळ मुकलोय त्याला..
हरवत चाललंय बालपण
ह्या बाळाचंही
जरा बदलशील का रे काळाला..!!
हसला तो
म्हणाला
मी शोधलाय उपाय
माझ्या पुरता
तुझाही तुलाच हवा शोधायला..
घे पेहराव माणसाचा
हवं तर
उचल ती पोटली
अन लाग आपल्या कामाला..!!
***सुनिल पवार...✍🏽

|| जालीम ||

|| जालीम ||
========
तेरे हुस्न के
कायल..
हुए नजरो से
घायल..
तेरे कदमो तले
दिल..
जालिम
जरा
आहिस्ता चल..!!

तू होती जब
ओजल..
छलकते है
जल..
तड़पता यह
दिल
जालिम
जरा
आहिस्ता चल..!!
***सुनिल पवार...✍🏽
2,796 people r

Friday, 23 December 2016

|| रेंज ||

💝तिच्यातील ती💝
============
|| रेंज ||
=====
मोबाईलमधे डोकं
खुपसलेलं पाहून
ती
मला म्हणाली,
हल्ली मोबाईल
सतत रेंजमध्ये दिसतो
अन माणूस मात्र
नेटवर्क
हरवल्या सारखं
वागतो..!!

मी चमकून पाहिलं
तिच्याकडे
अन
सावरून उत्तरलो
तसं नाही
पण
मार्केटिंग कॉलचा
सतत भडिमार
किती वेळ सहन करणार..?
आणि
सहन शक्तीचा अंत हा
कुठेतरी
ठरलेलाच असणार..!!
उत्तरली ती खोचक
म्हणाली
ते कळलंच आहे
बोलण्याचं तुला नेहमीच वावडं
पण स्क्रीनवर झळकणाऱ्या
त्या
रंगबिरंगी जाहिरातीचा काय..?
तिथे मात्र रिस्पॉन्स
समजू नको तू
मला काही कळत नाही
अन हे ही येतय हा लक्षात
तुलाही त्याचा कंटाळा
अजिबात येत नाही..?
मी मिश्किल हसलो
उत्तरलो
तू समजते तसचं घडते
असं नाही..
आणि प्रत्येक मोबाईलवर
जाहिरात असतेच असंही नाही..
पण तुला ते दिसणार नाही
कारण
संशयाच्या भुताला बांधणारा
गंडा दोरा
अजून तरी बनलेला नाही...!!
आता चढवला तिने सूर
म्हणाली
ठाऊक आहे मला
वादळं ही पेल्यातली असतात..
पण तुलाही कळायला हवं
ती नेमकी जन्म कुठे घेतात..
आणि
निर्माण झालेली ही वादळं
विनाकारण तसेच
दुर्लक्षित मुळीच नसतात..!!
आता नमतं घेतलं मी
म्हणालो
खरं आहे तुझं
जग जवळ आलंय
पण
संपत चाललाय संवाद
घराघरात नाहक
वाढत जातोय विसंवाद..
अपेक्षित आहे
आणि व्हायलाच हवी ग
प्रत्येकाच्या मूल्याची
यथोचित मोजदाद..!!
ती हसली खुदकन
म्हणाली
चलो देर आये दुरुस्त आये
लौट के बुद्दु घर को आये..
साठा उत्तराची कहाणी
आता खरी सफल झाली
हरवलेली माणसं
पुन्हा रेंजमध्ये आली..!!
****सुनिल पवार...✍🏽😀

|| उद्यापन ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| उद्यापन ||
========
काल म्हणाली ती
उद्या शेवटचा गुरुवार
अन शेवटचं उद्यापन
सांगा ना
माझं एक काम करणार..??
म्हणालो मी
करायला हरकत नाही
पण प्रश्न असा आहे
मी केलेलं काम
तुला कितपत रुचणार..?

चिडली ती म्हणाली
थट्टा पुरे
ऑफिसवरून येताना
फळं घेऊन या..
दोन एक डझन वाटायला..
अन पाच मोठी पूजेला
आणि हो तितकीच फुलंही
घेऊन या..
म्हटलं मी तिला
बरं ठीक आहे आणतो
आता
घरच्या (कडक) लक्ष्मीसाठी
इतकं तर पाहिजेच करायला..!!
तिने फेकला
जळजळीत कटाक्ष
मी भासवलं नाही लक्ष
गुपचूप सटकलो ऑफिसला..
येताना
धक्के खात दादरला
घेऊन आलो बाजार
अन
तिच्या हाती सोपवला..!!
ती निरखू लागली
एक एक फळं आणि फूल
अन झाडू लागली
प्रश्नांच्या फैरीवर फैरी
म्हणाली
हे फळं कितीला..?
मग डझनाचा भाव काय..?
हे इतकंच बारीक कशाला..?
अहो
चक्क बनवलं त्यानं तुम्हाला..
मी म्हटलं मनात
हे लक्ष्मी माते
तुझी लीला अगाध
गुरुवार उद्या आहे
पण माझ्यावर
आजपासूनच खणखणाट..?
स्वीकार कर माते
मी नमस्कार करतो तुला..!!
***सुनिल पवार...✍🏽 

|| गुगली ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| गुगली ||
=======
आज तर तिने गुगलीच टाकला
म्हणाली,
पुरुषांना कधी प्रेम कळलंय का..?
मी म्हणालो
हा काय प्रश्न झाला..??
त्याशिवाय पुरुष मन
स्त्रीकडे वळलय का..??
उत्तरली ती
कारण आहे त्याला
पुरुष भुलतो फक्त शरीराला..?
म्हटलं मी
असतील काही
पण
ह्या सर्वात तू मला
गोवते कशाला..??
ती उत्तरली खोचक
म्हणाली
गोवत नाही रे
एकाच माळेचे मणी तुम्ही
मी फक्त ओवते आहे..
मी हसलो म्हणालो
पण
हिरा ओवता येत नाही
तू उगाच पदर खोवते आहे..?
चिडली ती
म्हणाली
शेवटी तू ही पुरुष
जातीवरच जाणार..?
मी गोंजारले तिला
म्हणालो
जातीचं तू बोलूच नको
मी पुरोगामी
अन पुरोगामीच राहणार..!!
ती चिडवत म्हणाली..
आ हा हा..म्हणे पुरोगामी..
कळलीयं का कधी
स्त्रीची करुण कहाणी..?
उत्तरलो मी
म्हणतात लोक
स्त्री चरित्र फार गहन आहे
म्हणूनच तर समजून घेतोय
अन ऐकतोय तिची वाणी..!!
यावर उत्तरली ती
नुसतं ऐकून उपयोग काय.?
सांग ना..
होतेय कुठे अंमलबजावणी..?
मी हसलो म्हणालो
आज ना उद्या होईल ग
कारण पुरुषच असतो
स्त्री चा खरा कदरदानी..!!
ती हसली छद्मी
म्हणाली..
काय तर म्हणे कदरदानी..
कारस्थानी म्हण कारस्थानी..
उत्तरलो मी
तू म्हण हवं तर तसं
पण लक्षात ठेव इतकेच
नेहमीच असते ती
हृदयाच्या केंद्रस्थानी..!!
कडाडली ती पुन्हा
म्हणाली
असणारच ना..
इप्सित जे साध्य करायचं असतं..
ह्या ना त्या कारणाने
तिला बाध्य करायचं असतं..!!
आता न मी बोललो काही
केवळ तिला जवळ ओढलं..
बोट ठेवले ओठावर
अन डोळ्यात रोखून पाहिलं..
म्हणालो
आता सांगशील मला
फक्त पुरुषच भुलतो का ग शरीराला..?
असेल जर तसेच
तर मग
नेमकं काय म्हणशील तू
तुझ्या ह्या समरसून विरघळण्याला..??
***सुनिल पवार...✍🏽😊

|| कुणीतरी हवं मात्र ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| कुणीतरी हवं मात्र ||
===============
कधी नव्हे ते आज,
म्हणाली ती
किती सहज सुचत तुला
कसं जमते हे तुला..
तडाडल्या भुईला
हळुवारपणे सांधायला..!!

हसलो मी,
उत्तरलो
ही तर खरी तुझीच किमया
तू घेते जुळवून
म्हणूनच आवडते जुळवायला..
हळुवारपणा खरा,
तुझ्या हृदयात मुरलेला
मी तर केवळ,
ओलावा दिला तुला..!!
ती गहिवरली,
म्हणाली
इतकेच तर असते,
अपेक्षित जगण्याला..
आणखी काय लागते रे,
नंदनवन फुलायला..?
पण
कोणीतरी हवं मात्र,
पाऊस व्हायला..!!
***सुनिल पवार...✍🏽 

Tuesday, 20 December 2016

|| हा कृष्ण कोणाचा ||

|| हा कृष्ण सांगा कोणाचा ||
==============
देवकीच्या नाळेचा
जन्म बंदिशाळेचा..
कान्हा नंद यशोदेचा
वृंदावन की गोकुळचा..?
हा कृष्ण 
सांगा कोणाचा..??

बंधू प्रिय सुभद्रेचा
पाठीराखा द्रौपदीचा..
मित्र सखा पार्थाचा
इंद्रप्रस्थ की द्वारकेचा..?
हा कृष्ण सांगा कोणाचा..??

शिष्य गुरु संदीपानीचा
गुरुबंधू मित्र सुदाम्याचा..
सवंगडी तोच गोपाळांचा..
यमुनेचा की कालिंदीचा..?
हा कृष्ण सांगा कोणाचा..??

मनमोहन तो राधेचा
मुरलीधर तोच मिरेचा..
रुक्मिणीच्या हृदयाचा
हट्ट तोच सत्यभामेचा..
हिचा की तो तिचा..?
हा कृष्ण सांगा कोणाचा..??

संग हा समजण्याचा
रंग जसा पाण्याचा..
गुणधर्म मिसळण्याचा
ज्याने मानला तो त्याचा..
हा कृष्ण सकल भक्तांचा..!!

भाव तो सख्यत्वाचा
ठाव तोच भक्तित्वाचा..
द्वैतातही अद्वैताचा
हा कृष्ण सकल वंचितांचा..!!
****सुनिल पवार... 

|| किस शब्दांचा ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| किस शब्दांचा ||
============
मी सहज म्हटलं तिला
पटत नाही ग मला
तुझं हे प्रत्येक वेळी
असं
शब्दांचं किस पाडणं..
अन
आवडतही नाही मला
मी
नको नको म्हणता
नाहक ताटात भरून वाढणं..!!

उत्तरली ती हसून म्हणाली
तुला वाटते तसं नाही
हे तर माझ्या
चिकित्सकतेच लक्षण आहे..
माझ्या नजरेनं केलेलं
तुझ्या शब्दांना
हे काळजीच औक्षण आहे..!!
मी चिडलो जरासा
म्हणालो
मग
ओवाळणी असेलच अपेक्षित..?
ती ही सांगून टाक..
हवा कशाला उगाच
माझ्या शब्दांना नेहमीच
तुझ्या नजरेचा धाक..!!
ती हसली पुन्हा
म्हणाली
आता का रे आला
तुझ्या नाकाच्या शेंड्यावर
विनाकारण राग..
म्हणून सांगते राजा
जरा शब्दांना वळण लाव
नको उगाच थयथयाट
म्हणावं
शहाण्यासारखं वाग..!!
मी ही हसलो मिश्किल
म्हणालो
आता पडलाच आहे किस
तर
जरा साखर,दुधाचं बघ..
हलवा बनेल छान गोड
मंद आचेवर ठेव
अन लागू दे जरा
तुझ्या प्रीतीची धग..!!
***सुनिल पवार...✍🏽😊

|| कविता माझी ||

💝तिच्यातील ती💝
============
|| कविता माझी ||
============
म्हणाली
ती
आज कविता तुझी,
होऊन जाऊ दे..
कशी सजते धजते,
मला पाहू दे..
म्हणालो
मी
थांब जरा तू,
रंगी न्हाऊ दे..
कवितेस अधिक,
समीप येऊ दे..!!

म्हणाली
ती
असते ना ती,
नेहमीच जवळ..
माझ्या पेक्षा ती,
अधिक प्रेमळ..
म्हणालो
मी
तशी असते ती,
नेहमीच जवळ
पण प्रतिरूप ती,
तुझीच केवळ..!!
म्हणाली
ती
चढवू नको तू,
उगाच हरभऱ्यावर..
तुझ्या मनात त्या,
सवतीचाच वावर..
म्हणालो
मी
नाईलाज आहे ग,
तू मोती तर ती सर..
धरून येते ना ती,
तुझाच पदर..!!
म्हणाली
ती
भासवतोस तसा,
पण नाही कदर..
प्रत्येक पुरुषाचं हे,
नेहमीचंच सदर..
म्हणालो
मी
तुझ्या नजरेचा हा,
दोष खरोखर..
पाहू नकोस तू ,
केवळ वरवर..!!
म्हणाली
ती
तू म्हणतोस म्हणून,
आता मी मानते..
सांग तुझी सखी,
कविता काय म्हणते..
म्हणालो
मी
तुझ्याच मनाचं,
गुपित ती खोलते..
कविता ही माझी,
पण
बोली तुझी बोलते..!!
***सुनिल पवार...✍🏽😊