Tuesday, 20 December 2016

|| हा कृष्ण कोणाचा ||

|| हा कृष्ण सांगा कोणाचा ||
==============
देवकीच्या नाळेचा
जन्म बंदिशाळेचा..
कान्हा नंद यशोदेचा
वृंदावन की गोकुळचा..?
हा कृष्ण 
सांगा कोणाचा..??

बंधू प्रिय सुभद्रेचा
पाठीराखा द्रौपदीचा..
मित्र सखा पार्थाचा
इंद्रप्रस्थ की द्वारकेचा..?
हा कृष्ण सांगा कोणाचा..??

शिष्य गुरु संदीपानीचा
गुरुबंधू मित्र सुदाम्याचा..
सवंगडी तोच गोपाळांचा..
यमुनेचा की कालिंदीचा..?
हा कृष्ण सांगा कोणाचा..??

मनमोहन तो राधेचा
मुरलीधर तोच मिरेचा..
रुक्मिणीच्या हृदयाचा
हट्ट तोच सत्यभामेचा..
हिचा की तो तिचा..?
हा कृष्ण सांगा कोणाचा..??

संग हा समजण्याचा
रंग जसा पाण्याचा..
गुणधर्म मिसळण्याचा
ज्याने मानला तो त्याचा..
हा कृष्ण सकल भक्तांचा..!!

भाव तो सख्यत्वाचा
ठाव तोच भक्तित्वाचा..
द्वैतातही अद्वैताचा
हा कृष्ण सकल वंचितांचा..!!
****सुनिल पवार... 

No comments:

Post a Comment