Wednesday, 29 June 2016

|| रेघोट्या ||

|| रेघोट्या ||
========
अजून एक सरले
कितीसे शेष उरले
कमावले काय बरे
कोणास किती पुरले ..!!

कोणा कशा उणावले
कोणास का दुखावले
खरेच का मन माझे
कृतीने त्या सुखावले..!!
कितीसे असे जोडले
शर तसेच सोडले..
कोणत्या मनात कधी
घर मी असेल केले..!!
पाहता वळून मागे
क्षण ते उडून गेले..
कांतीवरती रेघोट्या
व्रण ते सोडून गेले..!!
****सुनिल पवार....

Monday, 27 June 2016

|| माझी ती त्याची ||

|| माझी ती त्याची ||
=============
बऱ्याच प्रयासाने
ती प्रसवली
माझ्या हाताने
माझ्या विचारातुन
किंबहुना
माझ्या अंतरात्म्यातुन...!!

मी आणली तीज
जगासमोर
ना कोणीच तिची
दखल घेतली
नसावी कदाचित
ती तितकी मोहक
मी सहाजीक तीज
अडगळीत टाकली..!!
कोण होता तो
भला शार्वलिक
अंधारातुन तीज
घेऊन गेला
दुर्लक्षित ती
होती उपेक्षित
परी बाप तिचा तो
होऊन गेला..!!
कालांतरे
नव्या बापाचं
बिरुद लावून
ती त्याच जगासमोर
पुन्हा आली
काय सांगू
फळफळलं तीचं नशीब
ज्याने त्याने
उचलून घेतली..!!
अकस्मात आली
ती माझ्या समोर
अन् गहिवरल
माझं मन
तीला पाहुन
तिच्या कौतुकात त्या
मी ही गेलो
नकळत वाहून..!!
आता
धन्यवाद देतोय मी
त्या शार्वलिकाला
ज्याने माझी मला
ओळख दिली
अन् प्रश्न करतोय
मी जगाला
काय अर्थ हो
तुमच्या रासिकतेला
त्या जाणकारीला
तुमचा मुजरा
का
नेहमीच असतो
मात्र नावाला..??
***सुनिल पवार...

|| नाते ||


|| नाते ||
=====
नाते असावे
पावसाच्या धारे सारखे..
बरसता पाऊस
मिळतो धरणीस रुजवात..
अल्लड नदीस
मिळते तयाची साथ..
मग सामावते निश्चिंत
ती सागराच्या हृदयात..!!
******सुनिल पवार....

|| पुन्हा तोच पाऊस ||

पुन्हा तोच पाऊस...
पुन्हा तोच पाऊस
पुन्हा तोच चिखल..
गुंतलेल्या नात्याची
व्हावी कशी उकल..!!
पुन्हा तोच गंध
पुन्हा तसाच दरवळ..
घुसमटलेल्या श्वासांनी
कसा जाणावा परिमळ..!!
पुन्हा तेच इंद्रजाल
पुन्हा तोच लखलखाट..
करपलेल्या बिजांनी
कुठे रुजवावी वाट..!!
पुन्हा तोच वारा
पुन्हा तीच वावटळ..
आशंकीत काहुरांची
कशी शमावी वर्दळ..!!
--सुनिल पवार...✍️

|| मनातला पाऊस ||

मनातला पाऊस...
इतरांच माहीत नाही
पण पाऊस मला नेहमीच आवडतो..
तडाडलेल्या जमिनीला तो बेमालूम सांधतो..!!
काही कळतच नाही
तो नक्की ठिगळ कुठे लावतो..
नव काशिद्याची नवझळाळी देऊन
तो कोणते असे अत्तर शिंपडतो..!!
गंध भरुन राहतो श्वासात
तनामनात, रोमरोमात..
अन् चैतन्य हरवलेलं माझं मन
प्रफुल्लीत होते काही क्षणात..!!
मग सहज विचार येतो मनात
धरणीला सांधतो तसाच एखादा पाऊस
माणसाचं मन सांधायला आला तर..?
तर माणसाच्याही हृदयात फुलेल
एक अनोखं एकात्मतेचं नंदनवन सुंदर..!!
अठरा पगड जातीच्या
तडाडलेल्या हृदयास ठिगळ लावणारा,
तुटलेली मनं सांधणारा
असेल का हो एखादा पाऊस..?
मी चातक बनून वाट पाहतोय त्याची
कधीतरी येईल तो नव आशेचे पंख लावून
प्रत्येकास हवा हवासा वाटणारा
माझ्या मनातला सुप्त पाऊस..!!
--सुनिल पवार..✍️

II सौदामिनी II

II सौदामिनी II
=========
तो येतो
कवेत
तिला घेऊन
भेटण्या धरेस
तिच्यावर भाळून..
ती ही यते
त्यासंगे तशीच
प्रखर तेज लेवून..
मोहक दिसते ती
परंतु
थरकाप उडतो कधी
तिचा
थयथयाट पाहून..
सवती मत्सरात
सौदामिनी जाते
क्षणात
सर्वस्व जाळून..!!
*****सुनील पवार.... :)

Tuesday, 21 June 2016

|| पाऊस ||

|| पाऊस ||
=======
मला आवडत नाही
पाऊस तीला आवडतो..
तीला आवडणारा पाऊस
मला उगाच चिडवतो..!!

मी पाहतो खिडकीतून त्यास
बेधुंद वर्षाव करताना..
यथेच्छ तीज भिजवताना अन्
मला उगाच खिजवताना..!!
पहिल्या पावसाचा थेंब अन् थेंब झेलत
ती वाऱ्याशी खेळत राहते..
मृदु गंधाच्या त्या ओढीने
माझं मन घुटमळत राहते..!!
आता तृप्त होईल ती अन्
नवतीचा बहर लेवून येईल..
सुवर्ण स्वप्नांचे कवडसे
माझ्या मनास नकळत देऊन जाईल..!!
मला आवडत नाही तरीही
पाऊस नजरेस मुग्ध करतो..
तीला बहरताना पाहुन
मी नकळत तिच्यावर लुब्ध होतो..!!
*****सुनिल पवार....

|| कंत्राट ||

😄हसना मना है😄
=============
|| कंत्राट ||
😜😄😜
खुर्चीत रेलून
आधुनिक सत्यवान
शांतपणे
पेपर वाचत होता..
सावित्रीची
लगबग सारी
डोळ्यांच्या कोनातून
न्याहाळत होता..!!

ही नेसु का ती नेसु
प्रश्न मधेच
पडत होता..
डावा डोळा
सत्यवानाचा
सारखा सारखा
फडफडत होता..!!
झाला एकदाचा
शृंगार
नाकात नथ
हातात चुडा
गळ्यात
मंगळसूत्र रत्नहार..
निघाली सावित्री
वडाकडे
हुश्श्
संपला एकदाचा
वारेमाप प्रश्नांचा
भडिमार..!!
निश्चिन्त सत्यवान
घड़ीभर
मोकळा श्वास
घृतो न घेतो तोच
सावित्री
पुन्हा हजर..
शंकेची पाल
चुकचुकली
अन्
कावरी बावरी
झाली
सत्यवानाची नजर..!!
काही बोलणार
सत्यवान इतक्यात
सुरु झालं
धावते समालोचन
वड सावित्रीचे..
कुणाच्या दागिन्यांचे
कुणाच्या सुनेच्या
साडीचे
कुणी काढलेल्या
खोडीचे
अन्
चांगलेच बसले
शालजोडीचे..!!
सरते शेवटी
फर्मान सुटले
सत्यवाना,
पुढच्या खेपेस
त्यांच्यापेक्षा
भारी भारीचे
मला आले पाहिजे..
त्या सटव्यांचे डोळे
चांगलेच
पांढरे झाले पाहिजे..!!
आता
पांढरा पडला
सत्यवान बिचारा
यमाचा धावा
करू लागला..
यम आला पण
तसाच परत गेला
म्हणाला
सत्यवाना,
मी कंत्राट दिलय
आता सावित्रीला..!!
😜😄😜😄
**सुनिल पवार...

Monday, 20 June 2016

|| रंजन ||

|| रंजन ||
======
खर तर
अपेक्षा तुझ्या
छत्राची होती
पण
डोक्यावर अग्नी
घेऊन फिरतोय
मी
स्वतःस
भिजवीत
त्या ज्वाळेच्या
वर्षावात..

डबडबलेल्या
अंगाचा
थेंब अन् थेंब
जिरवत
आतासा
मी
स्वतःच
दरवळतो
मृदुगंधाच्या
ढंगात..!!
***सुनिल पवार...

|| मडकी ||

|| मडकी ||
=======
गाढव म्हणनार नाही
पण ओझी वाहताहेत हेच खरे..
मूक बिचारी अशी ती 
कुठे चालली असतील बरे..??
चालती बोलती मडकीच ती
लोकं म्हणतात,
हल्ली अशीच घडवली जातात..
घडण्या समजण्या आधीच ती
पायदळी तुडवली जातात..!!
नाना तऱ्हेची ही मडकी
विविध ठिकाणाहून येत असतात..
भट्टी एकच असते परंतु
नावे मात्र वेगळी दिसतात..!!
उद्या निघतील यातून काही लेबल लागुन
कच्ची, पक्की, फुटकी, आणि गळकी..
बोली बाजारात लागेल
अन् स्विकारेल कोणीतरी त्यांची मालकी..!!
लोक म्हणतात, शिकली सवरली मडकी
आता नोटा कमावू लागली..
पण प्रश्न असा आहे की,
शिकल्या सवरल्या ह्या यांत्रिक मडक्यात
माणुसकीचं पाणी कितीसे गार राहणार..!!
---सुनिल पवार...✍️

|| सहज सुचलेले ||

|| सहज सुचलेले ||
============
मी
कल्पना करतोय
मनात
तू जेव्हा
तुझा सर्व फौजफाटा
गोळा करून
तुझ्या सर्व
सामर्थ्यानिशी
ही धरा
पदाक्रांत करशील
तेव्हा हीच
स्वागतोइच्छुक माणसं
तुझ्याशी कसे वागतील?
तू आजही
शिव्या खातोस
उद्याही खाणार
तुला माणूस
आणि
तू माणसास
नकळे
कधी समजणाऱ..??
**चकोर उवाच....😜

Wednesday, 15 June 2016

|| आकाशीचे बापा ||

मालवणी ठसका
**************
|| आकाशीचे बापा ||
=============
कित्याक रे मेल्या
तू वाट बघुक लावता..
आम्ही वाट बघतव
अन् तू वाट लावता..!!

परवा म्हणे तू
चिन फिराक गेलास..
आमच्या कोठ्याचो पाणी
तू थय पळवून नेलस..!!
इरोधक बोंबलल होते
त्यांचे बापाच काय जाता..
म्हणतत ना
ज्याचा जळता त्याकाच कळता..!!
आमचे परधानांची हवा
मेल्या तुका भी लागलीशी वटता..
देशात कमीच रव्हता
अन् परदेशान चमकुक जाता..!!
हयचो शेतकरी मायझया
तुझ्या नावानं खड़े फोड़ता..
थेंब भर पाण्यासाठी
मैलोंमैल चपला झिजवता..!!
रे आकाशीचे बापा
वाइच खाली वाकुन बघ..
वाटेवरल्या डोळ्यान
भरून ईलेत ढग..!!
***सुनिल पवार....

|| पावसा ||

|| पावसा ||
◆◆◆◆◆◆◆
शेवटी तू आलास,
फुंकर मारायला..
तडाडल्या मनास,
नव्याने सांधायला..!!

कधीची पाहिली वाट,
डोळ्यात आणून प्राण..
संपले होते धैय,
न उरले होते त्राण..!!
किंचित का होईना,
तू शिंतडलास खरा..
मृदुगंधाची उधळण,
लुटू लागला वारा..!!
आटलेल्या विहिरीत,
जसे पाणी चमकले..
चेहऱ्या चेहऱ्यावर तसे,
मोद ओसंडले..!!
क्षणभर का होईना,
तू दिलासा मना दिला..
म्हणणार नाही तरीही,
तू ब्रिदाला तुझ्या जागला..!!
नटवशील जेव्हा हिरवाई,
तेव्हाच खर मानेन..
वाऱ्याच्या कानातुन,
गुपित जगा सांगेन..!!
माझ्या मनाची ओढ़,
दिसावी तुझ्याही डोळ्यात..
घे सामावून स्वतःस,
नदी आणि तळ्यात..!!
अंकुरल्या बिजाची,
तू काळजी जेव्हा घेशील..
तेव्हाच रे पावसा,
तू बाप म्हणून शोभशील..!!
*****सुनिल पवार....

|| आभाळ ||

|| आभाळ ||
========
वाळक्या पातेऱ्यावरुन
चालताना
होणारा तो आवाज
चर चर काळीज
चिरत गेला..
झुळूक दुरावली
वाऱ्यास अन
मुसाफिर दिशाहीन
फिरत गेला..!!

सुकल्या काटकीचा
तो चिरका आवाज
मधेच कुठेसा
टाहो फोडतो..
धरणीमधे
माथा खुपसुन
कुणी आभाळा
हात जोडतो..!!
पावला पावलावर
तेच सत्र
स्तब्ध उभा
मी पाहुन चित्र..
नाही टीपुस एक
डोळ्यास मात्र
आभाळ हल्ली
का वागतेय विचित्र..!!
*सुनिल पवार...

|| *शब्द* ||

|| *शब्द* ||
■■■■■■■
शब्दाचे हे खेळ सारे
शब्द कधीच खेळत नाही..
निघुन गेला तो शब्द
माघारी कधी वळत नाही..!!

ढळला तुझा तोल जरी
शब्दांचा कधी ढळत नाही..
तूच घातले जन्माला
शब्दांना काही कळत नाही..!!
लावू नको दूषण
शब्द कधीच मळत नाही..
किती ओतशील तेल
शब्द तसा जळत नाही..!!
जपून वापर शब्द
शब्द सहज मिळत नाही..
शब्द फुलांचा गंध
उन्हात कधी वाळत नाही..!!
****सुनिल पवार...

Wednesday, 8 June 2016

|| मी घाबरतोय भिजायला ||

|| मी घाबरतोय भिजायला ||
तप्त सुर्यास डोक्यावर घेऊन
असंख्य प्रहार मनावर झेलत
तो स्थितप्रज्ञसा अजूनही उभा आहे
ओरबाडले त्यास दुनयेने जरी
अन् पोखरुन गेलय जर्जर शरीर तरीही
तो बोलत नाही कुणास काही।
एखाददुसरा कनवाळु जलद
अवचित त्या वाटेने येतो कधीतरी
अन् सावली धरु पाहतो त्यावर
पण कळेना त्याला रोष कसला
की भास्कराचा सहवास वाटतोय बरा
तो असा फटकुन वागतोय तरी कोणावर?
मी सहज विचारले त्याला,
बाबा काय झाले असे चिडायला
तुला आवडत नाही का भिजायला?
बघ ना! त्या पानाफुलांना, वेली तरुंना
बघ ना! प्राणीमात्रांना आणि प्रत्येक माणसाला
किती आतुरले आहेत ते पाऊस झेलायला।
दुःखी होऊन तो उत्तरला,
वाटते ना मनसोक्त भिजावं कधीतरी
अन् भिडावं मदमस्त वाऱ्याला
जिरवावं समस्त आभाळ उदरात
अन् वाट द्यावी शुभ्र झऱ्याला
पण हरवलीय माझी हरित छत्री
सांग कसा झेपवू मी पावसाला?
घडेल एखादे माळीण पुन्हा
म्हणून मी घाबरतोय भिजायला।
--सुनिल पवार..✍️

|| सुख दुखः ||

|| सुख दुखः ||
==========
फसवेच असतात क्षण
कधी हसवतात
कधी फसवतात..
कधी डोळ्यात
टचकन पाणी भरतात..!!

पाठशिवणीचा खेळ खेळत
सुख, दुखाःस घेऊन येतात..
आनंदाच्या क्षणावर कधी
दुखःद सावट विरजण घलतात..!!
काय कारण असेल
सुखावर दुःख भारी पड़ते..?
सुखाच्या वाटेवर पडणारे पाणी
कुणाच्या आठवणीत झारीत अडते..!!
जाणारा निघुन जातो
मात्र आठवण पाठ सोडत नाही..
जन्माच्या ऋणानुबंधाचे चित्र
तसेही कोणीही खोडत नाही..!!
प्रभाव तयांचा जात नहीं
मी ही त्यास अपवाद नाही..
खळखळता असो झरा कितीही
दुःख त्यातून वाहत नाही..!!
****सुनिल पवार.....

Monday, 6 June 2016

|| नांदी ||

|| नांदी ||
======💦
कुठूनशी कोणी वर्दी दिली
तुझ्या आगमनाची नांदी झाली..
हर्षाचा स्पर्श मनास झाला
तू तिथे पडला
अन् मृदुगंध मनी इथे हुळहुळला..!!
मी अनुभवतोय त्या हर्षला
हर्षातील तव स्पर्शाला..
त्यांच्या प्रत्येक शब्दातुन
तू पाझरतो आहेस
अन् मीही अनुभवतोय त्याच अनुभूतीला..!!
तू तिथे आलास
तसाच पुढे इथेही येशील
आशेला नवी पालवी देर्शील..
म्हणूनच मी अजूनही वाट पहात उभा आहे
सूर्याच्या डोईवर तू
कधी ना कधी सावली धरशील..!!
--सुनिल पवार..✍🏼💦
386
People Reached
22
Engagements
15
2 Comments
Like
Comment
Share

|| तुझ्या वाटेवर ||

😊मालवणी तड़का😊
*****एक प्रयत्न*****
|| तुझ्या वाटेवर ||
==========
तुझ्या वाटेवर मेल्या
डोळे लावून बसलय..
ह्यो खोटो पैसो बघ
मी कनवटीक लावलय..!!

यंदा मेल्या कित्याक
तू में महीन्यान इलास..
आंबो चुपूक मिळलो नाय
खय भी चाकमन्यास..!!
फटकी इली तुझ्यावर
तू खय उलतलां होता..
मागच्या वेळेस म्होरो तुझो
खय दिसला नव्हता..!!
आता बघतयस ना तू
काय झालीय गावची दशा..
झरो मुतुक लागलोय
रिकाम्या राहिल्या कळशा..!!
कित्या गाळये खातस
मेल्या सोयचेन रव्ह आता..
तू पाऊस असा माणूस नसा
हे माणसाक दाखव आता..!!
*****सुनिल पवार...

**कवी**

**कवी**
=D =========== =D
मी फिरतो खुलेआम
शब्दांच्या सोबतीने..
अस्त्र का शस्त्र
लोक म्हणतात भीतीने..!!
=D *************** =D
स्फुरण चढले मला
मी सर्वांस नडू लागलो..
कधी भावनिक ब्लॅकमेल
कधी वाभाड़े काढू लागलो..!!
=D **************** =D
खुशमस्कऱ्यांची करून गैंग
मी गर्वाने फिरू लागलो..
लोण्यावर ठेवून डोळा
मी सावज नवे हेरु लागलो..!!
=D **************** =D
आता दादा म्हणतात लोक मला
माझाही ग्रह तसाच झाला..
कळेना कधी,कवी बदनाम झाला
पाहुन जो तो पळु लागला...!!
=D **************** =D
***चकोर***

Thursday, 2 June 2016

|| लाजाळु ||

|| लाजाळु ||
========
हिरव्या गवताच्या कुशीत
दिसेल न दिसेल
असं
ते लाजाळुचं इवलं रोपट
लहरत होतं वाऱ्यावर..
पहिल्याच नजरेत
ते नजरेत भरलं
वेगळं भासलं
न चित्त राहिले थाऱ्यावर..!!

मी छेडिले तयास
स्पर्श करताच
लाजले अवचित
अन्
मिटले पर्ण..
मिटल्या पानांची
पण
कडा कलवंडली
अन्
बदलला क्षणात
तयाचा वर्ण..!!
न उमगले मला
हात माघारी घेतला
काही क्षण स्तब्ध झालो
फिरून फुलते न फलते
तोच
पुन्हा स्पर्श केला
अन्
तोच प्रकार घडला..
प्रश्न मनास पडला
कसं जमते हे तीला
काय म्हणावे तीला
अन्
तिच्या सहन शक्तीला..!!
अजूनही मी
तिचाच विचार करतोय
विसरली ती
पण दिसले मला
बेमालूम लपलेले
तीचे अमोघ
काटेरी अस्त्र..
लाजण्या पलीकडे
जाऊन तिने
का नाही उगारले
माझ्या आगळीकतेवर
तीचे नैसर्गिक शस्त्र
मज दंड देण्यास मात्र..??
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
****सुनिल पवार...🌿