आठवणी गणपती उत्सवाच्या:-
(अनुभव लेख)
गणपती आणि नवरात्रोत्सव जवळ आले की मला माझ्या एका मित्राची प्रकर्षाने आठवण येते, तो म्हणजे माझा बालमित्र विजय ठाकूर.
विजय म्हणजे सळसळता उत्साह, विजय म्हणजे खळखळता प्रवाह, कोणालाही क्षणात आपलंस करून घेणारा एक किमयागार. त्याचं व्यक्तिमत्वही तितकंच रुबाबदार शिवाय अतिशय विनयशील आणि नम्र असल्यामुळे परिसरात तो सगळ्याना सुपरिचित होता.असा हा विजय माझा खास मित्र होता.
गणपती यायच्या आधी साधारण तीन महिने तो माझ्या मागे लकडा लावायचा. म्हणायचा, सुनील! ह्या वर्षी मखर बनवणार ना? मी पण मग नाही म्हणून त्याची फिरकी घ्यायचो. माझा नकार ऐकून तो हिरमुसला व्हायचा मग त्याचा पडलेला चेहरा पाहून मग मलाच दया यायची आणि म्हणायचो, बघू! करू काहीतरी. बस माझ्या तोंडून इतकं ऐकलं तरी त्याची कळी खुलायची. काय करणार? कस करणार? मला असंच मखर हवं तसंच हवं असा अट्टाहास त्याने कधीच केला नाही. ते फेसबुकवर तुम्ही म्हणता ना! "तू फक्त हो म्हण" अन् "तुझ्यासाठी काहीपण" असाच विश्वास होता त्याच्या मैत्रीमध्ये. मखर बनवायचं काम सुरु झालं की तो नियमित येऊन सोबत बसायचा. काय हवं नको ते विचारात रहायचा. पडेल ते काम मदतरूपी करत बसायचा. विभागातील बहुतेक मित्रांच्या मखरांची ऑर्डर माझ्याकडे असायची पण हा पट्टया मला कधीच विचारायचा नाही की ह्यातील माझ मखर कोणत म्हणून? मी सुद्धा त्याला शेवटपर्यंत सांगत नव्हतो.
गणपती येण्याच्या दोन दिवस आधी तो त्याच्या घरच्या कामात मग्न असायचा व कधीतरी मधेच येऊन कानोसा घेऊन जायचा. असं करता करता गणपती बसण्याचा दिवस यायचा तेव्हा तो रात्रीपासून माझी चातकासारखी माझी वाट पहायचा पण मखर न्यायला म्हणून यायचा नाही. त्याला खात्री असायची की मखर वेळेत लागणार आणि सुनील म्हणजे मी स्वतः येऊन लावून जाणार म्हणून तो निर्धास्त असायचा. मग मी सुद्धा ठरलेल्या वेळेत त्याच्या घरी मखर घेऊन हजर होत असे. माझ्या हातातील मखर पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे खुशीचे भाव लपत नसत.
त्याला अपेक्षित असणारा मखर लागला की मग माझं कौतुक करताना त्याचं तोंड दुखत नसे. किंबहुना त्याला पक्की खात्री असायची की हाच मखर आपल्या घरी लागणार त्या दृष्टीने तो बाकीची तयारी म्हणजे इतर सजावट लाईट संयोजन करून ठेवायचा. इच्छित मखर लागल्यावर खुश झालेला विजय गणपती आल्यापासून ते गणपती जाईपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला तो माझ्याबद्दल सांगत राहायचा माझी ओळख त्यांची करून घ्यायचा. अशा तऱ्हेने त्याचे सगळे पाहुणे, नातेवाईक मला चांगलेच ओळखू लागले होते.
काही वर्षांनी ट्रान्झिट कॅम्पमधील आपला मुक्काम हलवून तो माहिमला पुनर्रचित इमारतीत रहायला गेला. तिथे गणपतीचे पहिले वर्ष होते तेव्हा शिरस्त्याप्रमाणे दोन महिने आधीच तो माझ्याकडे हजर झाला व मला म्हणाला सुनील! ह्यावर्षी मी आखिल माहीम गणेशदर्शन स्पर्धेत भाग घेणार आहे यावर तुझं काय मत आहे? त्याच्या प्रस्तावावर मी सहज म्हणालो घेऊन टाक! बघुया काय करायचं ते.
मी सहज पठडीतलच उत्तर दिलं पण त्यालाच माझा होकार समजून तो कामाला सुद्धा लागला.
त्यावर्षी गणपतीच्या कृपेने त्याचं मखर सुंदर आणि वेळेच्या आधीच तयार झालं आणि आधल्या रात्री मी ते लावलं मात्र तिथेच तो म्हणाला, सुनील! आपण जिंकलो! आणि खरच झालंही तसंच.
ठरलेल्या दिवशी परीक्षणासाठी परीक्षक आले. त्यावेळी परीक्षक म्हणून चंद्रलेखाचे श्री.मोहन वाघ होते आणि सजावट होती तिरुपती बालाजीची. मोहन वाघांनी विजयला सजावटीच्या निर्मिती बद्दल काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची त्याने अगदी समर्पक अशी उत्तर दिली ती ऐकून मोहन वाघ समाधान पावले व त्यांनी आम्हा दोघांचे व कलाकृतीचं खूप कौतुक केले. ते ऐकून त्या दिवशी आम्ही भरून पावलो.
यथावकाश निकाल जाहीर झाला आणि विशेष म्हणजे आमच्या कलाकृतीला माहीम विभागात प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले. मग काय, विजयची स्वारी एकदम खुश झाली व पेढे आणि स्मृतिचिन्ह घेऊन माझ्या घरी हजर झाली.
अशीच जेमतेम दोन वर्ष उलटली असतील आणि एकेदिवशी घरी निरोप आला की विजय ट्रेनमधून पडला व त्याला इस्पितळात दाखल केले आहे. तो निरोप ऐकून मी सुन्न झालो व तसाच तडक सायन हॉस्पिटलला पोहचलो तेव्हा तेथील दृश्य हेलावणार होतं. सगळ्याना हसवणारा विजय आज असह्य जखमांनी विवळत होता. त्या रात्री जवळजवळ १०० ते १५० मित्र हॉस्पिटल मध्ये तळ ठोकून होते. सुदैवाने कालांतराने विजय बरा झाला पण कायमचा जागेवर बसला. आता चालू शकत नव्हता. स्वावलंबी विजय परावलंबी झाला होता. त्या कारणाने त्याला नोकरी सुद्धा गमवावी लागली पण त्याचा मालक दयाळू होता. विजयवर त्याचा विशेष जीव होता. विजयाच्या उपचाराचा सर्व खर्च त्यानेच केला होता शिवाय आर्थिक मदतही बरीच केली होती.
काही महिन्यांनी विजय बराच सावरला. त्याला मानसिक आधार देण्याच काम आम्ही मित्रांनी चोख केल होत. बहुतेक मित्र संध्याकाळच्या वेळेस त्याला भेटून जात होते. मी सुद्धा वेळ मिळेल तसा संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन तासंतास गप्पा मारत असे, त्याच्या चेहऱ्यावर हास्य पेरण्याचा प्रयत्न करत असे.
बघताबघता पुन्हा गणपतीचे दिवस येऊन ठेपले आणि विजयाच्या जीवाची घालमेल सुरु झाली. नोकरी नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाली होती. आता पूर्वीसारखा खर्च परवडत नव्हता. सुदैवाने त्याचे आईवडील पूर्वीपासूनच कामाला जात होते पण त्यांना पगार अगदी कमी होता शिवाय ते सुद्धा विजयच्या अवस्थेने खचले होते, शरीराने थकले होते. आपल्या तुटपुंज्या पगारात कसंतरी भागवत होते.
त्याच्या मनाची घालमेल ओळखून मी त्याला स्पर्शातूनअश्वस्थ केले.
सालाबादप्रमाणे गणपती येण्याच्या दिवशी सकाळी मी त्याच्या घरी जाऊन गणपती मखरात बसवले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बरेच काही सांगून गेले. त्यावेळी गणपतीच्या पाच दिवसात आम्हाला पूर्वीचा विजय भेटला होता.
दिवस असेच सरत होते, वर्ष सरत होते.अधूनमधून मी त्याच्याकडे जात असे तेव्हा त्याच्या थट्टा मस्करीला उत येत असे. प्रत्येक गणपती सणाला न चुकता त्याच्या घरी मखर लागत होता, गत स्मृतीना उजाळा मिळत होता पण कुठपर्यंत? आमची पाठ सरताच पुन्हा एकटेपणा विवंचना ह्यात तो हळूहळू खचत गेला आणि एके दिवशी जगाला सोडून निघून गेला.
अपघातानंतर जेमतेम सहा सात वर्ष काढली ह्या कालावधीत तो बरंच काही शिकवून गेला. त्याच्या गणपतीच्या निमित्ताने होणाऱ्या माझ्या नवीन कला आविष्काराला तो पूर्ण विराम देऊन गेला.
--सुनील पवार..✍️