Showing posts with label सामाजिक लेख. Show all posts
Showing posts with label सामाजिक लेख. Show all posts

Monday, 24 August 2020

राखी

 || राखी ||

======

नात्याच्या घावाने 

हृदय छिन्नविच्छिन्न झालेले 

जागोजागी शब्दांचे ओरखडे 

हातावर झेललेले

त्यात माझे हातही फाटलेले

असं असताना

तुझ्या एका दिवसाच्या 

व्यवहारी राखीच्या मलमाने

हे ओरखडे कितपत बरे होतील?

याबद्दल मन सांशक आहे..!!


कदाचित होतीलही बरे

पण ती ओढ कुठून आणणार?

मला माहीतही नाही

तू येणार की नाही येणार?

आलीस तर बरेच आहे

अन्यथा

हे जखमेचे हात 

अश्वत्थाम्या प्रमाणे विव्हळत

तेलवाटीची प्रतीक्षा करणार?


असो..

पण चिंता करू नको

आताशी जखमेची सवय झालीय

पण तरीही इतकं लक्षात ठेव

की तुझ्या सुखाच्या बातमीचा

वाराही पुरेसा आहे

काही क्षण शीतलता देण्यास

आणि

राखीच्या सणाचा सुगंध

निरंतर दरवळत राहण्यास..!!

***सुनिल पवार...✍🏼

Saturday, 25 July 2020

लॉकडाऊन एक घुसमट

लॉकडाऊन एक घुसमट :
कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव होऊन आता जवळ जवळ तीन महिने उलटत आले आहेत तरी संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे प्रत्येक जण त्याच्याशी लढतो आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकार दर पंधरा दिवसांनी आढावा घेऊन लॉकडाऊनची मुदत वाढवत आहे.
या मागील तीन महिन्यात सर्वात जास्त हाल कोणाचे झाले असतील? तर ते रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे तसेच मुक्त व्यवसाय करणाऱ्यांचे झाले आहेत. मागील तीन महिन्यापासून त्यांना घर नामक कोंडवड्यात कोंडून ठेवण्यात आले आहे. हाताला काम नाही, जवळ पैसे नाही अशा परिस्थितीत जगायचे कसे हा प्रश्न आ वासून उभा आहे. कोरोना मरेल तेव्हा मरेल पण त्या आधीच जगण्याच्या विवंचनेत माणूस अर्धमेला झाला आहे, हतबल होऊन गावाकडे परंतु पाहतोय पण त्यातही अनंत अडचणींचा आणि यातनांचा सामना त्याला करावा लागतोय.
सुरवातीला लोकप्रतिनिधी तसेच सेवाभावी संस्थांनी मदत पुरवली पण आता तो ओघ जवळ जवळ बंद झालेला आहे. मागील तीन महिन्यात ह्या मदतीच्या ओघात हात धुवून घेताना सुद्धा बऱ्याच जणांना पाहिले. ह्यात गरजवंत उपेक्षित आणि पैसेवाले अपेक्षित यादीत सामावलेले पण दिसले. लोक चेहरे पाहून मदत देत होते, बहुतेक जण आपली जवळची तसेच मागेपुढे कामाला येणारी माणसे हेरत होते. त्यातलेच एक ढळढळीत उदाहरण देतो जे आमच्याच विभागात घडले आहे. एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याने काही अन्नधान्याचे खोके मदत म्हणून त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात पाठवले होते, त्यावर त्या नेत्यांचे नाव फोटोसाहित होते. खरे तर ही मदत गरजवंताला पोहचणे आवश्यक होते पण ही सर्व मदत परस्पर कार्यकर्त्यांच्या घरी पोहचली, त्यांनी सर्वात आधी आपली घरं भरली. गंमतीचा भाग म्हणजे हे वाटप कोणा तिसऱ्या व्यक्तीने दिले होते त्यावर बड्या नेत्याने आपल्या नावाचे लेबल लावले होते. ते लेबल काढल्यावर खऱ्या दात्याचे नाव समोर आले होते. हा गंमतीशीर तितकाच निर्लज्ज किस्सा मला त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याने खाजगीत सांगितला तेव्हा मी कपाळावर हात मारून घेतला होता. आणखी एक असाच किस्सा जो मला अजिबात रुचला नाही तो म्हणजे एक सेवाभावी संस्थेने महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन पॅडचे वाटप करण्याचे ठरवले असता एका उत्साही महिला कार्यकर्त्याने ते आपल्या ताब्यात घेऊन वाटप सुरू केले पण ते करण्याच्या नादात पॅडच्या संख्येपेक्षा अधिक महिलांना बोलावून नंतर तेच पॅक असलेले पॅड खोलून सुटे पॅड वाटण्याचे कर्तृत्व तसेच दातृत्व पार पाडले…आता बोला. बाकी विषयाच्या खोलात मी जात नाही ते जाणकारांनी जाणून घ्यावे इतकीच माफक अपेक्षा.
अर्थात सगळेच असे नव्हते ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट होती एक दोन लोकप्रतिनिधी व त्याचे कार्यकर्ते तळमळीने वाटप करत होते जे खऱ्या अर्थाने गराजवंतापर्यंत पोहचत होते. असो.. हा झाला मदतीचा भाग आता जरा बाजाराकडे वळू..
बाजाराची अवस्था बिकट होती आणि अजूनही आहे. ज्यांच्याकडे पैसा होता त्यांनी पुढच्या तीन महिन्यांनी एकदाच बेगमी केली परिणामी दुकाने खाली झाली लोकडाऊन घोषित होण्यापूर्वी सुरळीत असलेली साधन सामग्री एक दिवसात खाली झाली झाली व वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला यात व्यापाऱ्यांचे फावले व ते चढ्या दराने माल विकू लागले ४० रु. किलो ने मिळणारी साखर ५५ रुपयांवर गेली. तेलाची ९० ते १०० च्या घरात असणारी एक पिशवी १३० च्या वर पोहचली. यात कोणताही नामांकित ब्रँड नव्हता, जे कधीही पाहिले नव्हते अशा कामचलाऊ ब्रँडची विक्री सर्रास होताना दिसत होती. साधं पाम तेल ११० वर पोहचले. हतबल सामान्य त्याच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. तरी नशीब सरकारने जीवनावश्यक सामानाची दुकाने नियमित सुरू राहतील अशी घोषणा केली होती तरीही ही स्थिती होती. काटकसरीने रोजच विकत घेऊन खाणाऱ्यांसाठी हे महिने अधिक खर्च घेऊन आले त्यामुळे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था झाली.
भाज्यांचे दरही तसेच चढे कंबरडे मोडणारे होते त्यातही काही उत्साही लोकप्रतिनिधींनी नियमित दोन तास सुरू असणारा मोजका बाजार आठवड्यावर आणला. त्यात सोशल डिस्टनसिंग नावाचा प्राणी न जाणे कुठे पळून गेला.
पण तरीही त्याबद्दल काही म्हणणे नाही मात्र असे करत असताना नियमित विक्रेत्यांचा विचार केलेला दिसला नाही. बिचाऱ्या पारंपरिक विक्रेत्यांनी नियम पाळून पोटाला चिमटा काढून आठवड्यातून एकदा विक्री करण्याचे स्वीकारले सुद्धा, पण त्यानंतर कार्यकर्त्यांची पिलावळ स्वतःच व्यापारी बनून गल्लीबोळात रोज धंदा करू लागली त्याबद्दल कोणी ब्र काढत नाही. म्हणजे रोजचा गरीब भाजीवाला आता उपाशी निजू लागला आणि पैसेवाला कार्यकर्ता अधिकाअधिक माजू लागला. नियमांवर बोट ठेवून, नियमांनाच गालबोट लावण्याचे काम हे तथाकथित कार्यकर्ते अजूनही करत आहेत. तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हेच धोरण अवलंबून ते लोकांना मूर्ख बनवू पाहत आहेत.
आणखी एक मुद्दा नमूद करावासा वाटतो तो म्हणजे ते आर्सेनिक अल्बाम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप हा सुद्धा एक कळीचा मुद्दा ठरतोय. कळीचा अशासाठी की ह्या गोळ्या वाटप करताना एका पक्षाचे पदाधिकारी आधारकार्डची मागणी करून नोंदणी करून घेत, यादी मागवून मग कॅम्प भरवून गाजावाजा करून पुरवठा करत आहेत. मागे मी त्यावर एक उपरोधिक पोस्ट फोटोसह प्रसिद्ध केली होती. अशा पद्धतीने लिस्ट मागवून संबंधित पक्षाचे लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते येणाऱ्या पालिका निवडणुकांची तर बेगमी करत नाही ना? अशी शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होतेय. मुळात ज्याची आवश्यकता नाही ते उद्योग करण्यामागचा तुमचा अशुद्ध हेतू समाजण्याइतकी जनता दुधखुळी नाही हे तथाकथित लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे अशी कळकळीची विनंती.
एकीकडे अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे काही सामाजिक भान जपणाऱ्या घटना मनाला दिलासा देऊन गेल्या त्याचेच एक उदाहरण म्हणून सांगतो, काही सेवाभावी संस्था सोडल्या तर एकच राजकीय पक्ष असा आहे ज्याने आपले सामाजिक भान सुरवातीपासून ते आतापर्यंत जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मग ते धान्य वाटप असो किंवा शिजवलेले अन्न वाटप असो किंवा मग गोळ्यांचे वाटप असो, अथवा मास्क वगैरे इतर काही असो, जिथे आवश्यक आहे तिथे तत्पर सुविधा पोहचविण्याचे काम त्यांनी इमानेइतबारे तसेच कोणताही छुपा राजकीय हेतू न बाळगता केले आहे हे विशेष.
तरीही भविष्याच्या चिंतेने पोखरून गेलेले मन केवळ जुजबी मालमपट्टीने भरून येणार नाही त्यासाठी काही ठोस उपाय हवे आहेत जेणेकरून आज कोलमडलेल्या सर्वसामान्य माणसाला उभारी घेण्याचे बळ मिळेल. पण हे सर्व सहज सोपे नाही, परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत तरी अशक्य आहे असेच दिसतेय म्हणून लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर यावी अशी मनापासून इच्छा आहे कारण भीक मागून माणासाने कुठवर जगावं हा प्रश्न सतावतो आहे आणि भीक मागण्याला सुद्धा काही मर्यादा आहेत तसेच भीक देणाऱ्यालाही त्या आहेत.
परतीची हमी नसली की मग मदत सुद्धा भिकेत गणली जाते आणि ती त्याच स्वरूपात दिली जाते हे सुद्धा एक कटू सत्य आहे.
सुनिल पवार..✍️
352
People Reached
15
Engagements
12
2 Comments
Like
Comment
Share

Wednesday, 8 November 2017

|| रामायण ||

|| रामायण ||
=========
रावण नसलेल्या रावणाचे
दहन करून
राम नसलेला राम
आपल्या कुटीत परतला
आणि
सुरवात झाली रामायणाला
लक्ष्मण कुठे परागंदा झाला..
ऐकू येतंय
तो शूर्पणखेवर भाळला
त्याने वेगळा संसार मांडला..
आणि तसंही
रेषेची अडकाठी नको होती सीतेला..!!

मारीच
रामाच्या बाणाने मेला
ही केवळ अफवाच होती तर..?
ऐकण्यात आलंय
त्यानेच पसरवली होती
आता
अनेक रूपं घेऊन
सितेस मोहित करण्या
तोच गल्ली बोळात,
नाक्या नाक्यावर दिसतोय
इतकेच काय
अहो सोशल मीडियाच्या
खिडकीतून सुद्धा डोकावतोय
अन
सीता बिचारी
पुन्हा पुन्हा जाळ्यात फसतेय..!!
परीटाची पिल्लावळ
नित्य करते
बेछूट आरोपांची वळवळ
शिलावर घाव घालत
नसलेला राम
पुन्हा त्यांचीच री ओढतो
अग्नीपरीक्षेच्या कुंडात
सीता अजूनही धगधगते
आणि तो पहा रावण
किती विकट हसतोय
दग्ध झाल्या भावनांचाच
जणू सूड घेतोय
दंतकथा नाही हो ही
हे त्रिकाल सत्य आहे
रामायण अजूनही घडते आहे
वनवास रामाचा केव्हाच संपला
कदाचित तो नव्हताच
मात्र
सीतेचा संपता संपत नाही
आणि
त्यावर कुणी बोलतही नाही..
यासम दुसरी शोकांतिका नाही..!!
***सुनिल पवार...✍🏼

Wednesday, 24 August 2016

II उत्सव आणि उत्साह II

सन 2013 साली लिहलेला लेख त्यावेळी आमचे चिरंजीव केवळ 10 वर्षाचे होते..त्याची बोली अन माझी लेखणी यांनी साधलेला हा उत्सवी मेळ...
================
II उत्सव आणि उत्साह II
================
काल ऑफिस मधून घरी परतलो..पाऊल घरात टाकतो न टाकतो तोच मुलगा म्हणाला पप्पा आज ना आम्ही दहीहंडीचे चार थर कडक लावले..!
त्याचे कडक ऐकून मी तडक उडालो..पण मग स्वतःस सावरत त्याला विचारले
मी : कुठे गेला होता रे थर लावायला..??
मुलगा : ते भोगले काकांच मंडळ आहे ना त्यांच्या तिथे..(भोगले म्हणजे माझे मित्र दरवर्षी मुलांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या बिल्डींग जवळ दहीहंडीचे आयोजन करतात.)
मी : बर मग पुढे..
मुलगा : मग काय चार थर लावले ना कडक.. १०० रुपये बक्षीस मिळाले..
मी : मग पुढे..आणखी कुठे गेला होता..?
मुलगा : ते मी मराठी मंडळ आहे ना तिथे..(मी मराठी मंडळ आमच्या विभागात जवळच आहे)
मी : बर मग तिथे काय झाले..??
तिथे सुद्धा चार थर लावले एका झटक्यात..२०० रुपयाचे बक्षीस मिळाले..
मी : पण तुला सांगितले होते ना जास्त लांब जाऊ नको म्हणून..
मुलगा : पप्पा जास्त लांब कुठे, स्टेशन पर्यंतच तर गेलो होतो..तिथे शिवसेनेची दहीहंडी आहे ना शाखेजवळ तिथे..
मी जवळ जवळ किंचाळलोच काय स्टेशन पर्यंत..?
मुलगा : काय पप्पा तुम्ही पण..! स्टेशन तर इथे जवळच आहे.. तुमचे सगळे मित्र सुद्धा होते ना तिथे.. तिथून तर मी आरामात घरी येऊ शकतो..आणि हो..तिथे ना आम्ही पुन्हा चार थर लावले ३५० रुपये मिळाले.. पण पप्पा, आम्ही पाच थर लावले असते ना तर मस्त ट्रॉफी मिळाली असती..पुढच्या वेळी आम्ही पाच थर लावणार म्हणजे लावणारच..
मुलाचे प्रताप ऐकून मी जवळ जवळ उडालोच..आणि कडक ऐकून तर कडक व्हायची पाळी आली..पण मग स्वतःचे बालपणीचे दिवस आठवले..तोच अनुभव मी पुन्हा मुलाच्या रुपात अनुभवत होतो..फरक इतकाचं.. त्यावेळी आम्ही फक्त चाळीत आणि विभागातच हंडी फोडत होतो.. ती सुद्धा वर्गणी काढून....
पण आता मात्र ह्या उत्सवाचे रुपडेच पालटले आहे..आताचा उत्सव म्हणजे निव्वळ घोड्यांची रेस.. बक्षिसांसाठी शरीर रुपी घोडे जिंकण्याच्या लालसेने नुसते दामटवायचे..त्यांना ना जीवाची तमा ना सुरक्षेची काळजी..बस फक्त पळत राहायचे..मग जीव गेला तरी कोण करतोय तमा..?
मी म्हणतो हरकत नाही मुलांनी साहसी असायला..नव्हे ती असायलाच हवीत पण बेफिकीर मुळीच नसावे..कारण तुमची बेफिकिरी तुमच्या जीवावर बेतू शकते..नाही तशी बेतल्याची उदाहरणे सुद्धा आहेत..कालच आमच्या विभागातील दोन तरुण बाईक अपघातात मृत्युमुखी पडले..चटका लावणारी ही घटना..आई वडिलांनी स्वप्न बांधून मुलांना लहानाचे मोठे करावे..आणि अपेक्षा पुर्तीची वेळ येताक्षणी काळाने घाला घालून त्या स्वप्नांचा चक्काचूर करावा..ह्या पेक्षा दुर्दैव ते काय..? तो हृदय पिळवटणारा आकांत अजूनही डोळ्यासमोर तरळतो आहे..सण सरतो..उत्साह मावळतो..मागे उरतो फक्त आकांत..
शेवटी इतकंच सांगू इच्छितो की सण साजरे करा..उत्साह ओसंडून वाहू द्या पण प्रत्येकांनी स्वतःची तसेच इतरांची काळजी घ्या..सुरक्षेच महत्व जाणून घ्या आयुष्य सुंदर आहे त्यास कृतीने आणखी सुंदर करा..
जय महाराष्ट्र..
आपलाच,
चकोर...
|| श्री कृष्ण जयंतीच्या तसेच गोपाळकालाच्या हार्दिक शभेच्छां ||

Saturday, 19 March 2016

II दुःख II

II दुःख II
=======
जगात दुःख हे प्रत्येकालाच असते नाही.? .जंगी सर्व सुखी असा कोण आहे...?? इतरांच्या दृष्टीने जो सर्व सुखी असतो..त्याला सुद्धा ह्या जगात दुखः असते..जसे प्रत्येकाचे दुखः वेगळे असते तसेच दुःख हलके करायचे उपाय प्रत्येकाचे वेगवेगळे असतात..कोणी व्यसनात बुडतो..कोणी हसण्यावर नेतो..कोणी संगीतात रमतो..तर कोणी कागद खरवडतो..असे नाना उपाय माणूस दुःख विसरण्यासाठी करतो..कोणी चेहरा पाडून फिरतो...तर कोणी नुसताच बाऊ करत फिरतो..
प्रत्येकाला त्याचे दुःख मोठे वाटत असते..दुःखाचे उमाळे असे अधून मधून येत राहतात..मला ही येतात..मी तरी कसा अपवाद असेन.. शेवटी मी सुद्धा माणूस ना..पण मी कधी शक्यतो बाऊ करत नाही..किंबहुना बाऊ करूच नये असे मी म्हणेन...माहीत आहे का..??
कामावर जाताना रोजच्या प्रवासात रस्त्याच्या कडेस काही झोपड्या नित्य पाहतो..झोपड्या त्या कसल्या..चार बांबुवर उभ्या असणाऱ्या तिरड्याच जणू..असा ह्या तिरडीवजा घरात आहे त्या परिस्थितीत तिथली कुटुंब गुण्या गोविंदाने राहतात..कोणत्याही दुःखाचा लवलेश त्यांच्या चेह-यावर कधीही दिसत नाही..त्याच्या मुलांच्या अंगावर कपडे नाहीत..डोक्यावर छप्पर नाही..अशा एक ना अगणित समस्या..
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जर ते राहु शकत असतील तर आपण तर त्यांच्यापेक्षा किती तरी पटीने सुखी आहोत..हाच विचार मी नित्य करतो..इश्वराने जे दिले आहे ते मुभलक आहे..मग दुःखाचा बाऊ कशाला..?? कवटाळून बसलो की दुःख वाढते.. टाळले म्हणजे दुर्लक्ष केले केले किंवा हिमतीने सामोरे गेले..की दुःखाचे दुःख सहसा होत नाही..असे मला वाटते..तुम्हाला काय वाटते..?? माझा अनुभव मी सांगितला..बघा विचारून तुमच दुःख काय बोलते ते..
धन्यवाद..
*********सुनील पवार....