|| राखी ||
======
नात्याच्या घावाने
हृदय छिन्नविच्छिन्न झालेले
जागोजागी शब्दांचे ओरखडे
हातावर झेललेले
त्यात माझे हातही फाटलेले
असं असताना
तुझ्या एका दिवसाच्या
व्यवहारी राखीच्या मलमाने
हे ओरखडे कितपत बरे होतील?
याबद्दल मन सांशक आहे..!!
कदाचित होतीलही बरे
पण ती ओढ कुठून आणणार?
मला माहीतही नाही
तू येणार की नाही येणार?
आलीस तर बरेच आहे
अन्यथा
हे जखमेचे हात
अश्वत्थाम्या प्रमाणे विव्हळत
तेलवाटीची प्रतीक्षा करणार?
असो..
पण चिंता करू नको
आताशी जखमेची सवय झालीय
पण तरीही इतकं लक्षात ठेव
की तुझ्या सुखाच्या बातमीचा
वाराही पुरेसा आहे
काही क्षण शीतलता देण्यास
आणि
राखीच्या सणाचा सुगंध
निरंतर दरवळत राहण्यास..!!
***सुनिल पवार...✍🏼
No comments:
Post a Comment