पोस्टमन…
कधीकाळी म्हणजे साधारण ८० च्या दशकापर्यंत तरी पोस्टमन हा अगदी आपल्या जिव्हाळ्याचा विषय होता.. खाकी गणवेश, डोक्यावर खाकी पट्टीदार टोपी आणि खांद्याला भलीमोठी खाकी झोळीवजा बॅग अडकवून, उन्हातानाची पर्वा न करता, कधी सायकलवर तर कधी मैलोंमैल पायपीट करत खेड्यापाड्यात तहानभूक हरपून प्रत्येक घरात पत्ररूपी सुख दुःखाची विभागणी करणारा, कुणाच्या ओठी हसू तर कुणाच्या डोळ्यात अश्रू आणणारा एकमेव जीव म्हणजे पोस्टमन होय. तशी शहरात सुद्धा काही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती म्हणा. तेव्हा आबालवृद्ध त्याची चातकाप्रमाणे वाट पाहत असत. आपल्या मूळ घरापासून दूर शहरात कामानिमित्त राहणाऱ्या चकारमण्याची ख्यालीखुशाली कळण्याचे एकमेव साधन अथवा माध्यम किंवा महत्वाचा दुवा म्हणजे तेव्हा पोस्टमन हाच एकमेव भक्कम आधार होता.
असा हा हवाहवासा वाटणारा पोस्टमन त्याकाळी जणू प्रत्येक घराचा सदस्य होता. घरात अशिक्षित वडीलधारी मंडळींना त्यांची पत्रे वाचून दाखवणे, अथवा शहरात राहणाऱ्या मुलास पत्र लिहून देणे इतकंच काय मनिऑर्डर्सच्या पैशाची देवाणघेवाण सुद्धा त्याच्यावर विसंबून डोळेझाकपणे पार पडत होती. इतका विश्वास त्यावेळी पोस्टमन काका,दादावर असायचा आणि तो सार्थ असायचा हे विशेष. पोस्टमन काका म्हणा,दादा अथवा मामा म्हणा, नात्याच्या बंधनात बांधलेला हा पोस्टमन आपल्या ब्रीदला जागून काळवेळेचं भान न राखता, ड्युटीचा कोणताही बाऊ न करता, अगदी निःशुल्क सेवा प्रदान करत होता म्हणूनच तर तो जनमनावर राज्य करत होता.
असा हा लोकप्रिय पोस्टमन नुसता घरापूरता मर्यादित नव्हता तर व्यापार उद्योग, कार्यालयात सुद्धा त्याचा दबदबा होता. इतकंच काय, तर भारतीय चित्रपटातही मानाचं स्थान मिळवून होता. त्या काळी पोस्टमनशी निगडित एखादे दृश्य अथवा गाणे हमखास चित्रपटात असायचे. ‘डाकिया डाक लाया’, ‘संदेसे आते है’ चिट्ठी आई है’ इत्यादी गाणी त्याचीच द्योतक आहेत.
पुढे काळ झपाट्यानं बदल गेला. माणसाच्या जीवनात संगणकाने शिरकाव केला त्यानंतर पोस्टाला हळूहळू उतरती कळा लागू लागली अर्थात यास केवळ संगणक कारणीभूत नव्हता तर खाजगी कोरियर कंपनीने निर्माण केलेली स्पर्धा सुद्धा पोस्टाच्या अधोगतीला कारणीभूत ठरली. तरीही खाजगी सेवा ही खाजगी कंपन्या कार्यालयापूरती मर्यादित असल्यामुळे काही अंशी का होईना पोस्टमनचा घरोबा अबाधित होता. पण त्यानंतर आलेल्या मोबाईल क्रांतीने पोस्टमनचा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. मोबाईलमुळे जग जवळ आल्याने पोस्टमन दुरावला. ज्या ख्यालीखुशालीसाठी आठवडे महिने ताटकळत राहावे लागत होते तीच ख्यालीखुशाली आता निमिषात कळू लागली. इतकेच काय व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लोकं एकमेकांना नियमित भेटू लागले मग पत्रावर अवलंबून राहण्याचे दिवस झटक्यात सरले आणि त्याचबरोबर पोस्टमनशी संपर्क न उरल्याने, पोस्टमनचा घराघराशी असलेला तसेच घराघराचा पोस्टमनशी असलेला जिव्हाळा संपृष्ठात आला.
जिथे जिव्हाळाच संपला तिथे तक्रारींनी सहज शिरकाव केला आणि त्यातूनच पोस्टवर अजूनही आस्था असणाऱ्या लोकांनी पाठवलेली पत्र अथवा पुस्तके वेळेत न मिळणे किंवा ती कधीच न मिळणे अथवा उडवाउडवीची उत्तरे मिळणे असे प्रकार सुरू झाले. पूर्वी घरच्या पोस्टमनला खडानखडा माहिती असायची तीच माहिती आता विचारली असता पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करा अशी उत्तरे मिळतात. अर्थात सर्वच पोस्टमन तसे नाहीत पण प्रमाण वाढते आहे असेच म्हणावे लागेल. अजूनही काही पोस्टमन आहेत जे माणसाला आणि त्या पूर्वीच्या जिव्हाळ्याला विसरलेले नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर मुंबईच्या मायानागरीत मी राहत असलेल्या विभागात बरीच वर्षे एक मालवणी पोस्टमन होते. त्यांचे आणि माझे संबंध अगदी तसेच पूर्वीसारखे जिव्हाळ्याचे होते अगदी ते निवृत्त होईपर्यंत तसेच होते. वाढत्या कुटुंबाच्या समस्येमुळे मी विभागातच दुसरीकडे भाड्याने राहायला आलो असता ते सातत्याने माझ्या बँकेचे अथवा कार्यालयाचे साहित्य किंवा सरकारी कागदपत्रं, पत्ता बदललेला नसताना सुद्धा अगदी न चुकता घरी आणून देत असत. पण ते निवृत्त झाले आणि हा जिव्हाळा संपला. आता उरला आहे तो फक्त व्यवहार.
ते निवृत्त झाल्यानंतर मला पत्ता बदलून घ्यावा लागला हे सांगायला नको. नवीन पोस्टमन कधी येतो आणि कधी जातो हेच कळत नाही. पण तरीही पोस्टाची आणि पोस्टमनची विश्वासार्हता अजूनही टिकून आहे. काही अपवाद वगळता जनमनात असलेली त्याची विश्वासू प्रतिमा अजूनही तशीच आहे.
सुदैवाने डबघाईला आलेल्या ह्या पोस्टाच्या उद्योगास सरकारी हाताचा भक्कम आधार मिळाला आणि बचत योजना, बिल भरणा केंद्र, आधार कार्ड संबंधित कामे तसेच इतर सरकारी उपक्रमाअंतर्गत बहुतांश कामे आता पोस्टाच्या माध्यमातून होत आहेत. या शिवाय पार्सल वगैरे आहेतच पण त्याचे प्रमाण आता कामी झाले आहे पण तरीही आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात पोस्टाचे अस्तित्व अजूनही टिकून आहे आणि पर्यायाने पोस्टमन टिकून आहे हे ही नसे थोडके.
--सुनील पवार..✍️
No comments:
Post a Comment