Sunday, 31 December 2017

|| निलसागर ||

|| निलसागर ||
=========
दिव्य सूर्यास
नमन करण्यास..
भाव भावनांचे
पुष्प अर्पिण्यास..
चैत्यभूमी तटी
उसळला निलसागर..
साश्रु लाटांची
ही ओढ अनावर..!!

ना भूक ना तहान
हरपले देहभान
दर्शनाभिलाशी
डोळ्यात पंचप्राण..
उन्ह पाऊस सोसत
वादळ वारा झेलत
उभा भीम सैनिक
बाबांचे गुणगान गात..!!
पंचशीलाची जाण
जपण्यास स्वाभिमान
या देशाचा अभिमान
अंतरी कर्तव्याची जाण..
समतेचा हा स्वार
जगविण्या संविधान..
घेतसे महामानवाची आण
करून त्रिवार प्रणाम..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| म्हणूनच रे मधुसूदना ||

|| म्हणूनच रे मधुसूदना ||
===============
तुझं देवत्व
जरी जगाने स्वीकारलं
तरी तू बहाल केले
ते निसर्गाला
गोधन, गोवर्धन पूजून
तू नवा पायंडा घालून दिला..
म्हणूनच रे मधुसूदना
मी वंदन करतो तुला..!!

तूच म्हणाला
ज्याचं भय वाटावं
तो देव कसला.?
वंदन करावे प्रेमाला
न की भयाला
यासाठीच तू परावृत्त केलं
समस्त गोकुळाला
अन नाकारलेस इंद्राला..
म्हणूनच रे मधुसूदना
मी वंदन करतो तुला..!!
भर सभेत
निर्लज्ज कौरवांनी
द्रूपदीच्या आयुष्याच्या
चिंध्या केल्या..
पण एका चिंधीच्या मोबदल्यात
तिच्या लज्जा रक्षणार्थ
तूच हजारो साड्या पुरवल्या
स्त्री सन्मानाची सार्थ व्याख्या
तू दाखवून दिली जगाला..
म्हणूनच रे मधुसूदना
मी वंदन करतो तुला..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| शिंपले ||

|| शिंपले ||
=======
मोत्याचे अप्रूप
जरी जगाला असले
तरी मला
शिंपलेच अधिक भावतात।
किनाऱ्यावर विखुरलेल्या
याच भग्न शिंपल्यात
सुंदरशा मोत्यांनी
जन्म घेतलेले असतात।
एकीकडे
पित्याचं छत्र अन्
मायेचे ममत्व दिसते त्यात।
तर दुसरीकडे
मानवाच्या ओरबाडणाऱ्या
मनोवृत्तीचे
दर्शन घडते शिंपल्यात।
--सुनिल पवार..

|| मी/तू ||

|| मी/तू ||
======
मी धुक्यातली वाट
तू प्रसन्न पहाट..
मी तटस्थ काठ
तू पाखरांचा किलबिलाट..!!

मी रणरण उन्हाची
तू छाया तरुची..
मी कातळ पठारी
तू कोमलता मृदूची..!!
मी तिरीप कललेली
तू रंगत क्षितिजाची..
मी भारलेला संध्येत
तू संगत निमिषाची..!!
मी वाऱ्याचा वावर
तू निशिगंधाचा बहर..
मी आतुरतेचा क्षण
तू धुंद रात्रीचा प्रहर..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| मंथन ||

|| मंथन ||
======
उगवत्यास
नमन करणाऱ्या मानसिकतेत
मावळत्यास
कोण विचारतो दिनकरा..?
इथे
पूर्वपार दाटलेला अंधार
प्रत्येक मनात
तू व्यर्थच करतोस
क्षितिजोत्सव साजरा..!!

आशाळभूत सारे
केवळ एका कवडशासाठी
कशा ओळखाव्यात
त्यांच्या धूर्त नजरा..?
त्यांनीच गोठवल्या
त्यांच्या सकल संवेदना
तू नाहक देऊ पाहताेस
मायेचा उबारा..!!
तो तप्त गोळा
न जाणे
कुठे विलीन होतो..?
किती विशाल खोली
तुझ्या अंतराची ती रत्नाकरा..
न धजावत कोणी
त्यात उतरण्यास सहसा
ज्याला त्याला प्रिय दिसतो
केवळ कोरडा किनारा..!!
हा पुनवेचा सोस
उधाण आणतो रात्रीला
अथांग निळाईचा पदर फाडतो
मदमस्त उन्मत वारा..
डागाळतो कलेकलेने
दुधाळ चंद्राचा चेहरा
चांदण्यांच्या वस्तीभोवतो
दिसतो
अंधकारी अवसेचा घेरा.!!
न जाणे का भावतो
त्यांस
विखारी डंखाचा संकुचित आसरा..
मंथनातून जन्मलेला
प्रत्येक अमृतकुंभ
का बनून राहतो केवळ
उपेक्षित अन उपरा..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| पत ||

||| पत ||
=====
किंमत होती तेव्हा
काही पाठवायचे होते
शब्द तुला
पण न जमले ते कधीच मला।
पण कदाचित
आता सहज जमेलही
तरीही ते
पाठवता येणार नाहीत मला।
कारण
या व्यवहारी जगात
नच उरली पत कुठेच शब्दाला।
--सुनील पवार.

फुलांकडून हास्य घे

फुलांकडून हास्य घे..


फुलांकडून हास्य घे
मौनातले भाष्य घे..
दरवळणारा गंध घे
अंतरातला मकरंद घे..!!

मनमोहक रंग घे
वाऱ्याचा संग घे..
कपासीचे वस्त्र घे
काट्याचे शस्त्र घे..!!

फुलपाखरू रूप घे
भ्रमराची जपणूक घे..
निर्विकार पक्ष घे
जीवनाचे लक्ष्य घे..!!
--सुनिल पवार..✍🏼

|| शिशिर आला ||

शिशिर आला.. (हायकू)
शिशिर आला
वारा शीतल झाला
कंप देहाला..!!१!!
पान गळले
भूमीवर पडले
विदीर्ण झाले..!!२!!
तरु भकास
पाखरांचा निवास
पानांचा भास..!!३!!
आंबेमोहोर
दिसे देखणा फार
पाडास भार..!!४!!
सुमनांवर
दवबिंदूंचा थर
ओला पदर..!!५!!
पालापाचोळा
वाटेवर कण्हला
जपून चाला..!!६!!
--सुनील पवार..

|| विरोधाभास ||

|| विरोधाभास ||
==========
होरपळल्या जीवनाचे
करपले कोवळे अंकुर
सुकला टिपूस डोळ्यात
नाही लवलेश कुठे दूर दूर
विसावलेली कूसही
दिसे चिंतेत चूर चूर..!!

भूक घेऊन उशाला
जागते हे मलूल जीवन
वाटेवरच्या प्रतिक्षेला
अपेक्षित उदरभरण
भरवते हात
कुठे नाही दृष्टीक्षेपात
अंधुक ही वाट
तरळते डोळ्यात..!!
गर्गेतले वर्तमान
कसे उजळणार भविष्यात?
पराकोटीचा हा विरोधाभास
हेच सत्य निखालस
वास्तव
खितपत पडते नरकात
अन जग गुंतते
केवळ चौकटीतल्या चित्रात..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| निखारा ||

|| निखारा ||
========
झाकून ठेव
निखारा राखेसह
दाखवू नको कोणास
कैक येतील
फुंकर मारायला
क्षणभर घेतील उबारा
अन निघूनही जातील
काही क्षण
धगधगेल निखारा
कदाचित पेट घेईल
राख वाऱ्यावर उडेल
धूर डोळ्यात खुपेल
अन
झुंजावे लागेल निखाऱ्यास
स्वःअस्तित्वासाठी
पुन्हा पुन्हा
पण
होईल भ्रमनिरास
न पाळणार कोणीच
त्या पेटत्या निखाऱ्यास..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| फाटकी झोळी ||

|| फाटकी झोळी ||
============
हसू नका
मी
घेऊन मिरवतो
फाटकी झोळी
क्वचित ओसंडते
सदोदित सांडते
तरीही
ना खंत मला
ती
माझ्यासह
इतरांसही
काही ना काही
देत असते..!!
**$p..✍🏼🙂

|| चौकट ||

|| चौकट ||
=======
आलीस.? ये
स्वागत आहे
तेव्हढं माप ओलांडून ये
आहा..असं नाही.!
जरा नजाकतीने घे
आणि हो
येण्याआधी
ती चौकट पाहून घे..!!

अशी बावरू नको
ती त्याची सावली आहे
तू तुझी पाहून घे
अंमळ मोठी आहे
आधी तीच सून होती
आता सासू आहे
तिच्या कलेकलेने घे
ती ठेवू पाहिलं तुला मुठीत
सुन-बाई म्हणत
अन तुलाही ऐकावं लागेल तिचे
अन्यथा राहशील तू कण्हत..!!
आणि ती पहा
त्याच्या सावलीची छोटी सावली
आता त्याचा बाजूला आहे
नंतर अभावाने दिसेल
पण
तुझ्या सावलीची छोटी सावली
जरा नीट पाहून घे
कारण
घरात तिचाच प्रभाव असेल
हे घर तिचेच अंगण आहे
ते नणंद नावाचं रिंगण आहे
अन तिच्याच मर्जीने तुला
त्याच्या भोवती फिरायचे आहे..!!
घाबरलीस..?
साहजिक आहे
असंही वाटत असेल ना..?
ही सावल्यांची चौकट उखडून टाकावी.?
पण जमणार नाही
माप ओलांडण्या इतके ते सोपे नाही
सावल्याचं काय..?
त्या आज ना उद्या विरळ होतील
पण एके दिवशी
तूच मोठी सावली होशील
तेव्हा मात्र हीच चौकट तू कुरवाळत बसशील
सावलीला मुठीत ठेवण्यासाठी..!!
****सुनिल पवार...

Sunday, 10 December 2017

|| प्रयास ||

|| प्रयास ||
=======
जावे तयाच्या वंशा जेंव्हा
तेव्हाच कळेल त्याचे दुःख..
कळेल परी वळणार नाही
मज ठाऊक आहे हे पक्कं..!!

भासती दुरून डोंगर साजरे
असतील जरी बोडके उघड़े..
दुखः मृदुलेचे जाणण्यास ते
यावे लागेल तुज समीप थोड़े..!!
न उपयुक्त ती कोरडी सांत्वना
नको देखला स्पर्श दिलासा..
अंतरातला तो तिमिर छेदण्या
एक पुरेसा छोटा कवडसा..!!
ना समज केवळ अट्टाहास
पण समजून घे आग्रह ख़ास..
काय हरकत विचार करण्यास
जरी भासला तुज वेडा प्रयास..!!
****सुनिल पवार....✍🏼

|| आमचे मायबाप ||

|| आमचे मायबाप ||
=============
जमाना
विजारीचा आहे
पण
आमचा बाप
अजूनही
लक्तरे धोतर नेसून फिरतोय
हे पाहून
अधिक गहिवरून येतंय..
अन
वाहतुकीच्या सुकाळात
अनवाणी
लेकरास खांद्यावर घेऊन
उन्हातान्हात
त्याला फिरताना पाहून
काळीज
पिळवटून जातंय..!!

आमची माय
तीही अजूनही
एका भाकरीच्या चंद्रासाठी
स्वतःच्या हाताला
डाग लावून घेतेय
हे पाहून काळजाचं
पाणी पाणी होतंय..
अन
नऊवारी विरळ झाल्या
सहावारी शिफॉनच्या जमान्यात
तीला अजूनही
जीर्ण झाल्या साडीचंच
पोलकं शिवताना पाहून
माझ्या बाहीचा शेव
ओला चिंब होतोय..!!
जमाना बदलला
समाज बदलला (काही अंशी)
वेष बदलला
लोक बदलले
शहरात, गावात, खेड्यात
जगतिकरणाचे वारे वाहू लागले
इतकेच काय
कवितेने सुद्धा
कालानुरूप
आपले रुपडे बदलले
पण
आमची माय आणि आमचा बाप
अजूनही
त्याच वावरात वावरताहेत
मला वाटतं
ते कवितेला सावरताहेत..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| तमन्ना ||

|| तमन्ना ||
=======
आजकल
यह
कलम भी
जिद करती है
देखे बिना
मानती नही..
हम देते है
उसे
अपनी पहचान
मगर
वह पहचानती नही..!!

अब तो
आदत सी
हो गई है
हमे
उनकी शान में
कुछ न कुछ
लिखने की..
और
दिल-ए-तमन्ना है के
बदलो में छिपे
उस
चाँद को
देखने की..!!
**$p..✍🏼😊

|| ही सांजवेळ ||


|| ही सांजवेळ ||
===========
ही सांजवेळ
ना इथे नाही तिथे
कातरवेळ..!!

ही सांजवेळ
रंगीत क्षितिजाचे
स्वप्नील खेळ..!!
ही सांजवेळ
दिवसाचा रात्रीशी
धूसर मेळ..!!
ही सांजवेळ
तप्त दिनकराची
समाधी वेळ..!!
***$p..✍🏼
🌼सुसंध्या🌼

|| दर्द ||

|| दर्द ||
=====
लोग
कहते है
के
बडा मुश्किल
होता है
दर्द का सहना..
हम सुनते
मगर
खामोश
चलते रहते
पहनके
उसीका गहना..!!
**$p..✍🏼😊



|| मी पाहतो तुला ||

|| मी पाहतो तुला ||
============
तू
दिसतेस कधी
सज्जात
कुंडीतील गुलाबांना
पाणी देताना..
अन
मी
पाहतो तुला
गुलाबाची टवटवी
लेवून घेताना..!!

कधी पहाटे
नभ माळलेली तू
दिसतेस
उगवत्या सूर्यास
अर्ध्य वाहताना..
मी
पाहतो त्या सूर्यास
तुझ्या मुखकमलावर
लाली फेरताना..!!
मी
दर्शनाभिलाषी
तिष्ठतो
तुझ्या खिडकीपाशी
हुरहूरते मन
कनात हलताना..
मग
हळूच सरकतो मेघपदर
अन
मी पाहतो तुला
पुनवेचा चांद होताना..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| तू निघून गेलास अन ||

|| तू निघून गेलास अन ||
================
कळत नकळत
तू झिरपत होतास
भिंतीतून, छतातून..
अन
रुजत होता ओलावा
तू गाळलेल्या
प्रत्येक थेंबा थेंबातून..!!

तुझे आसपास वावरणे
हेच
माझ्या सृष्टीचे सावरणे होते
भाळीचे ठसठशीत लेणे होते..
तू झिरपत होतास अंतरबाह्य
म्हणूनच
सुकोमल फुलांचे डवरणे होते..!!
तुझे झिरपण्यात
कधी
सख्याचे हरपणे भासायचे
तर कधी
बापाचे निरखणे असायचे..
पण
तुझे ताडन कधी कधी
मन पिळवटून टाकायचे..!!
तुझ्या अस्तित्वावरच
टिकून होते माझे मुक्त बहरणे
पण
तू निघून गेलास अन
बघ छळू लागलाय उन्हाळा..
विखारी नजरेच्या त्या विखारी ज्वाळा
असह्य होताहेत रे
त्यांच्या कामुक झळा..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| लाजरे||

|| लाजरे||
=======
तू
मिटून घेतेस
पाने
म्हणूनच
ग लाजरे
धीर चेपतो..
तुला
कळायला हवं
तुझ्या
अंतरात दडलेला
एकेक काटा
तितक्याच
तीव्रतेने टोचतो..!!
**$p..✍🏼

|| स्मार्ट फंडे ||

|| स्मार्ट फंडे ||
=========
आजची पिढी भलतीच स्मार्ट झालीय. याची प्रचिती त्यांच्या बोलण्यातून,वागण्यातून आपणास पावलोपावली येत असते. असंच कुठेतरी एक घोषवाक्य वाचले होते "सोच के आगे" अगदी त्या पद्धतीनेच जणू त्यांची वाटचाल चालू आहे असंच वाटतंय. हा सोशल नेटवर्किंग अथवा चॅनेलचा पगडा आहे की स्पर्धेच्या ह्या युगात त्याने स्वतःस तसे घडवून घेतले आहे न जाणे.
तशी काळाचीही गरज आहे म्हणा एक पाऊल पुढेच राहायला हवे किंबहुना पाऊल जपून टाकायला हवे तरच येणाऱ्या संकटावर मात करण्यात यशस्वी होता होता येते.
तर सांगण्याचं तात्पर्य असं की, आजच्या पिढीत हे गुण प्रामुख्याने दिसून येतात याची प्रचिती मला आमच्या चिरंजीवांनी कपाटवर चिकटलेल्या त्या कागदावरून आली ज्यावर त्याने काही मजकूर लिहून ठेवला होता.

आता तुम्ही म्हणाल मजकूर लिहिण्याचा आणि स्मार्ट होण्याचा काय संबंध.? तर तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तर झालं असं..
दिवाळीच्या दिवसात चिरंजीव म्हणाले पप्पा आम्ही आज सर्व मित्र अमुक एका हॉटेलमध्ये जाणार आहोत पार्टी करायला.खरं तर शेवटचा पेपर झाल्यानंतर जाणार होतो.पण उशीर होईल म्हणून नाही गेलो. तर आज आम्ही जाणार आहोत.
यावर मी विचारले अरे पण पार्टी म्हणजे नक्की काय.? आणि पार्टी गरजेची आहे का.?
तर तो उत्तरला, पप्पा आमची पार्टी म्हणजे काय? एखाद दुसरा पिझा आणि आईस्क्रीम झाली पार्टी. त्यावर मी पुन्हा विचारले दौरा कुठपर्यंत आहे तर तो उत्तरला जास्त लांब नाही स्टेशन पर्यंत दोन तासात येईन परत. त्यावर मी जास्त न ताणता म्हटले बरं ठीक आहे पण.. 2 तास म्हणजे 2 तास त्यापुढे जर का वेळ लागला तर मात्र माझ्याशी गाठ आहे. त्यावर तो नाराजीने म्हणाला पण पप्पा वेळ मागे पुढे होऊ शकतो ना.? मग 10 पंधरा मिनिटं ग्रेस मिळायला काय हरकत आहे.? त्याच्या उत्तरावर मी त्याला न दर्शविता मनात हसलो व म्हणालो बरं तू म्हणतो तर ठीक आहे दिला तुला अर्धा तास अधिक (थोडा कडक आवाजात) मात्र त्याहून अधिक वेळ झाला तर पाठीला तेल लावून तयार रहा. त्यावर तो हसला म्हणाला तुम्ही बघाच वेळेत येतो की नाही. असं म्हणून तो निघून गेला.
काही वेळातच मी सुद्धा बाहेर निघून गेलो आणि त्यानंतर सौ.मुलीला घेऊन निघून गेली.
साधारण चार,पाच तासांनी घरी आलो.सौ.आणि मुलगी सुद्धा नुकतीच आली होती.मात्र चिरंजीवांचा पत्ता नव्हता. मी सहज सौ.ना चिरंजीवांबद्दल विचारले तर ती म्हणाली,ठाऊक नाही तो आला की नाही कारण मी आले तेव्हा दाराला टाळे होते. त्यावर मी रागातच म्हटले,येऊ दे आता त्याला त्याची पार्टीच बाहेर काढतो. मी असं बोलतो न बोलतो तोच मुलीचं लक्ष कपाटाकडे गेलं व जोरात हसत म्हणाली पप्पा तुमचा चिरंजीव येऊन गेला. हे पहा त्याने कागदावर काय लिहून ठेवलयं. सौ.ने सुद्धा तो मजकूर वाचला आणि हसत म्हणाली, घ्या तुमचा चिरंजीव तुमच्या पेक्षा दोन पाऊलं पुढेच दिसतोय आता बोला. आता घ्या बघू हजेरी त्याची.
मी सावधपणे कपाटाजवळ येऊन तो मजकूर वाचू लागलो त्यावर लिहलं होतं.
" मी घरी येऊन गेलो हाये.
[Please do not shout me]
ok
Rudra
वाचून आलेलं हसू आवरत मी म्हणालो, हू..स्मार्ट पिढीचे हे स्मार्ट फंडे भलतेच स्मार्ट झालेत. बापाच्या रागाचा बुमरँग चक्क बापवर उलटवला. माझ्या या वाक्यावर मायलेकी खळखळून हसल्या व म्हणाल्या सावध रहा.. ही झाकी आहे अजून पिक्चर बाकी आहे.
***सुनिल पवार...✍🏼

|| तेच प्रश्न ||

|| तेच प्रश्न ||
========
सापडत नाहीत काही प्रश्नांची उत्तरे
शब्दांचे धांडोळे चाळून..
वरवरचीच ठरते मलमपट्टी
मात्र हात जातात पूर्ण पोळून..!!

किती प्यावे हे जहरिले अनुभव
कोळून साखरेत घोळून..?
हृदय तरी छिन्न विछिन्न
स्वप्न जाते क्षणात जळून..!!
गुलाबांच्या काट्याची सल
हल्ली बाभळीस अधिक सलते..
गल्लो गल्ली तोच खल
ही वेदना अधिक मनास खलते..!!
नव्या युगाचा डंका पिटत
येतात तेच प्रश्न,तीच उत्तरे,
अन अंतपुरात ही दरवळणारी
नकोशी वाटतात सुवासिक अत्तरे..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| तव शब्दमोत्यांस्तव ||

|| तव शब्दमोत्यांस्तव ||
==============
लिहलेल्या शब्दातून
तुला वाचू पाहतोय..
वेदनेच्या आभाळात
थेंब साचू पाहतोय..!!

झाले हृदय चाळणी
शब्द शब्द झरतोय..
नजरेत धुके दाट
शब्द त्यात विरतोय..!!
अदमास पावसाचा
आज खरा ठरतोय..
तव शब्द मोत्यांस्तव
हस्त मी पसरतोय..!!
चिंब भिजल्या मनाने
शब्दगारा वेचतोय..
रंग हिरव्या सयीचा
तीव्र गडद होतोय..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| दिवाळी एक उहापोह ||

|| दिवाळी एक उहापोह ||
================
ते म्हणाले
कशी गेली दिवाळी..?
मी म्हटले
अजून यायची आहे
ते म्हणाले
मग गेली ती काय..?
मी म्हटले
ते दिवाळे होते..
होते नव्हते ते धुऊन नेले
आता
झुलणाऱ्या कंदीलाची लक्तरे निघतील
विझलेले दिवे कोनाड्यात निजतील
रंगोळ्यांचे रंग फिके पडतील
पुन्हा
भिंतीवर जळमटे चिकटतील
माणसे
केवळ उहापोह करतील
आणि
सवयीने विसरून जातील
पुढची दिवाळी येईपर्यंत..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| चंद्र होता ||

|| चंद्र होता ||
========
ती म्हणाली
तुझ्या माझ्या प्रेमाला
बघ
चंद्र आहे साक्षीला
अन
मी न्याहाळले चंद्राला
तेव्हा
बहरलेली पौर्णिमा होती
पण
दिवस सरत गेले
अन
चंद्र कलेकलेने क्षीण होत
लुप्त झाला अवसेला
तेव्हापासून
मीही म्हणू लागलो
चंद्र होता साक्षीला..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| भाऊबीज ||

|| भाऊबीज ||
=========
तेव्हा
दोघे लहान होते
ती कमवत नव्हती
तो कमवत नव्हता
मात्र प्रेम रग्गड होतं
म्हणूनच
बापाकडे हट्ट असायचा
बापही
खुशीने पुरवत होता
आणि भाऊबीज
दोघांच्या प्रेमाची
पर्वणी ठरत होता..!!

आता
ती कमावते
तिचा हिशोब नवऱ्याकडे
कारण तिचं लग्न झालंय
तोही कमावतो
त्याचा हिशोब बायकोकडे
कारण त्याचंही लग्न झालंय
कदाचित त्यामळेच
प्रेम व्यवहारी झालंय
आणि भाऊबीज
ती मात्र वाट पाहतेय
प्रेमाचं कवाड
खऱ्या अर्थाने उघडण्यास
कोण उत्सुक आहे..?
***सुनिल पवार...✍🏼
*तरीही भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा*

काय शिकावे..?

काय शिकावे..?
=========
हे कावळे बेरकी
किती सुरात गातात..
अनाहूत सल्ले त्यांचे
ऐन भरात येतात..!!

त्या धूर्त तरसांची
दहशत अशी जंगलात..
की एकट्याने फिरण्यास
आता वाघही बिथरतात..!!
किती कसावी लगाम
यश मिळे ना त्यात..
इथे लंगडे घोडेही
बेताल उधळतात..!!
बुजवावी वाटते
गळकी लेखणी कुलुषित..
अक्षरी किडे घृणीत
डबक्यात वळवळतात..!!
काय शिकावे तरी
मी त्यांच्या शाळेत..
जिथे विद्यार्थ्यांनाच गुरू
मस्तकात पाळतात..!!
***सुनिल पवार..✍🏼