Sunday, 10 December 2017

|| पण-ती ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| पण-ती ||
========
ती :
सूर्य लाली फेरतो
चंद्रमाही आरक्त होतो
सांगशील का..
ही जादू
कोण आणि कशी करतो..?
तो :
सागर उसळतो
न कोणास कळतो.?
पुनवेचा चांद
खळबळ अंतरी माजवतो..
भरती ओहोटीचा खेळ रंगतो
बघ ना..
आरक्त गाल तेच सांगतो..!!

ती :
अवचित भिजवतो
मनास छळतो
असो वा नसो
जीव नित्य हुरहूरतो
पण सांग ना
भाव कितीसा कळतो..?
तो :
दाह क्षमविण्या
आभाळ होतो
सप्तरंगी स्वप्न खुलवतो
तरीही त्यास बोल लागतो
सांग ना
रंग पाण्यास कुठे असतो..??
आणि बघ ना
भाव मृदुलेचा काय सांगतो..!!
ती :
कधी फुंकर का वादळ बनते.?
क्षणात सारे चित्र बदलते
अंतरबाह्य मन कोलमडते
हे प्रेम म्हणावे तरी कसले.?
जे निष्ठुरतेची साक्ष देते..
तो :
निर्वात पोकळी न फुंकर मारते
ती नव्या वादळा जन्म देते
विषमतेच्या कसोटीवरचे
अग्निकुंड हे धगधगते
कोण त्यावर हात शेकते
कोण त्याचा निषेध करते
कोणी त्यावर कवन करते
पण-ती..?
ती मात्र रात्रंदिवस जळते..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment