Sunday, 31 December 2017

|| मंथन ||

|| मंथन ||
======
उगवत्यास
नमन करणाऱ्या मानसिकतेत
मावळत्यास
कोण विचारतो दिनकरा..?
इथे
पूर्वपार दाटलेला अंधार
प्रत्येक मनात
तू व्यर्थच करतोस
क्षितिजोत्सव साजरा..!!

आशाळभूत सारे
केवळ एका कवडशासाठी
कशा ओळखाव्यात
त्यांच्या धूर्त नजरा..?
त्यांनीच गोठवल्या
त्यांच्या सकल संवेदना
तू नाहक देऊ पाहताेस
मायेचा उबारा..!!
तो तप्त गोळा
न जाणे
कुठे विलीन होतो..?
किती विशाल खोली
तुझ्या अंतराची ती रत्नाकरा..
न धजावत कोणी
त्यात उतरण्यास सहसा
ज्याला त्याला प्रिय दिसतो
केवळ कोरडा किनारा..!!
हा पुनवेचा सोस
उधाण आणतो रात्रीला
अथांग निळाईचा पदर फाडतो
मदमस्त उन्मत वारा..
डागाळतो कलेकलेने
दुधाळ चंद्राचा चेहरा
चांदण्यांच्या वस्तीभोवतो
दिसतो
अंधकारी अवसेचा घेरा.!!
न जाणे का भावतो
त्यांस
विखारी डंखाचा संकुचित आसरा..
मंथनातून जन्मलेला
प्रत्येक अमृतकुंभ
का बनून राहतो केवळ
उपेक्षित अन उपरा..!!
***सुनिल पवार..✍🏼

No comments:

Post a Comment