Sunday, 10 December 2017

|| घेतला वसा ||

|| घेतला वसा ||
==========
डोकावयाचं नाही मज
जगाच्या धूसर आईन्यातून..
हुजरेगिरीच्या प्रांतातील
देह दूषित वाहिन्यातून..!!

गोंजारायचे तरी किती
शब्दांचे साबण बुडबुडे..
पर कायेचे रंग तयांचे
भलामणीचे फाटके जोडे..!!
उधळावे तरी कशाला
उदो उदोचे भंपक गुलाल..
अंधार माखल्या गाभाऱ्याचे
ते सोवळ्यातले दलाल..!!
खंत नसे मज यत्किंचितही
आले वाट्यास जरी उपेक्षित..
मीच ठरवणार आहे माझे
काय असेल जे मज अपेक्षित..!!
मात्र इतके निक्षून सांगेन
उतणार नाही मातणार नाही..
तुम्ही खुशाल सोडा कटीचे
मी घेतला वसा सोडणार नाही..!!
***सुनिल पवार...✍🏼😊

No comments:

Post a Comment