Sunday, 10 December 2017

|| आमचे मायबाप ||

|| आमचे मायबाप ||
=============
जमाना
विजारीचा आहे
पण
आमचा बाप
अजूनही
लक्तरे धोतर नेसून फिरतोय
हे पाहून
अधिक गहिवरून येतंय..
अन
वाहतुकीच्या सुकाळात
अनवाणी
लेकरास खांद्यावर घेऊन
उन्हातान्हात
त्याला फिरताना पाहून
काळीज
पिळवटून जातंय..!!

आमची माय
तीही अजूनही
एका भाकरीच्या चंद्रासाठी
स्वतःच्या हाताला
डाग लावून घेतेय
हे पाहून काळजाचं
पाणी पाणी होतंय..
अन
नऊवारी विरळ झाल्या
सहावारी शिफॉनच्या जमान्यात
तीला अजूनही
जीर्ण झाल्या साडीचंच
पोलकं शिवताना पाहून
माझ्या बाहीचा शेव
ओला चिंब होतोय..!!
जमाना बदलला
समाज बदलला (काही अंशी)
वेष बदलला
लोक बदलले
शहरात, गावात, खेड्यात
जगतिकरणाचे वारे वाहू लागले
इतकेच काय
कवितेने सुद्धा
कालानुरूप
आपले रुपडे बदलले
पण
आमची माय आणि आमचा बाप
अजूनही
त्याच वावरात वावरताहेत
मला वाटतं
ते कवितेला सावरताहेत..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment